पुणे, ता. ६ : धर्मादाय संस्थांचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) मुंबई येथील मुख्य धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अपलोड केल्यावर त्याच्या प्रती पुन्हा स्थानिक धर्मादाय कार्यालयात दाखल करणे आवश्यक नाही, असे परिपत्रक राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती यांनी जारी केले आहे.
सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अपलोड झाल्यावर त्याची ऑनलाइन पोहोच पावती प्राप्त होते. त्या न्यासांना विशिष्ट यूजर आयडी देण्यात येतो. या ऑनलाइन पोहोच पावतीसह तीन विश्वस्तांच्या आणि सनदी लेखापालांच्या नावे आणि सह्यांसह लेखापरीक्षण अहवालाचा संच म्हणजेच वार्षिक ताळेबंद (बॅलन्स शीट), वार्षिक उत्पन्न आणि खर्चाचे विवरण, ‘फॉर्म ९ ड’नुसार सर्व विश्वस्तांची पूर्ण नावे आणि पॅन कार्ड क्रमांक आणि संबंधित ट्रस्टला फक्त देशांतर्गत व्यक्ती आणि संस्थांकडूनच देणगी मिळाली असल्याचा सनदी लेखापालांचा दाखला लेखापरीक्षण अहवालासोबत जोडून जिल्ह्यातील न्यास नोंदणी कार्यालयाच्या लेखा (अकाउंट) शाखेत जमा करून आतापर्यंत पोहोच घेतली जात होती. मात्र अशी कोणतीही तरतूद महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमात नाही, असे या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
विश्वस्तांना आणि सनदी लेखापालांना या परिपत्रकामुळे दिलासा मिळणार आहे. मात्र संस्था चालकांनी ऑनलाइन अपलोड केलेल्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालाचा संच आणि पोहोच पावती संस्था कार्यालयामध्ये भावी संदर्भासाठी जतन करून ठेवावी.
- ॲड. शिवराज कदम जहागिरदार, माजी अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.