शिक्रापूर, ता. ७ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मतदार प्रतिनिधी ठरावाच्या वादातून कासारी (ता. शिरूर) येथील संचालक राजेंद्र रामचंद्र काकडे यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी सहा जणांवर शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ७) सकाळी घडली.
सुरज संभाजी भुजबळ, आकाश दिलीप भुजबळ, कृष्णा मधुकर भुजबळ, विशाल प्रकाश भुजबळ, अमोल कैलास भुजबळ व संभाजी काळूराम भुजबळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत राजेंद्र काकडे यांनी फिर्याद दिली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून कासारी येथील हनुमान विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी सकाळी नियोजित होती. या बैठकीत बँकेसाठी मतदान प्रतिनिधी देण्याबाबत ठराव संमत केला जाणार होता. फिर्यादी काकडे हे त्यांचे सहकारी संचालक गुलाब बबनराव सातपुते, संदीप भगवान रासकर, सुखदेव ज्ञानोबा भुजबळ, बापू खंडू नरके आणि लीलावती महादू रासकर यांच्यासमवेत सकाळी १०.५० च्या सुमारास सोसायटी कार्यालयाकडे जात होते. त्यावेळी संभाजी भुजबळ सोडून बाकी संशयित हे सोसायटी कार्यालयाबाहेर उभे होते. त्यांनी काकडे यांना अडवून, "तुम्ही सोसायटीत जायचे नाही, मतदार प्रतिनिधी आमच्याच विचारांचा दिला जाईल," असे सांगितले. यावर काकडे यांनी "हा निर्णय आपण बैठकीत घेऊ," असे म्हणताच, या पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. इतर संचालकांनी मध्यस्थी करून काकडे यांना कार्यालयात नेले. मात्र, काही वेळातच संभाजी काळूराम भुजबळ यांना सोबत घेऊन या पाचही जणांनी पुन्हा कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी काकडे यांना पुन्हा मारहाण करत, "आमच्या विरोधात ठराव दिला, तर तुला जिवंत ठेवणार नाही," अशी धमकी दिली व तेथून निघून गेले. यानंतर सोसायटीचे अध्यक्ष अनिल नानाभाऊ नवले घटनास्थळी पोहोचले असता, उपस्थित संचालकांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर काकडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून घटनेची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध जमाव जमवून मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.