पुणे : देशात कोरोनाने हाहाकार माजवला होता. कोरोना प्रतिबंधासाठी जगभरातील देश लसीसाठी प्रयत्न करत होते. त्यात काही देशांना प्रौढांसाठीची लस बनवण्यात यश आले. पण शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठीची कोरोना लस अद्याप आलेली नाही. त्यामुळे मुलांची काळजी घेणे कसे आवश्यक आहे, याबाबतच्या बातम्या माध्यमांमधून झळकू लागल्या होत्या. सरकारनेही मुलांकरिता विशेष कोरोना वॉर्ड बनवायला सुरवात केली होती. यामुळं मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधक लस लवकर यावी आणि याचा लहान मुला-मुलींना फायदा व्हावा, असे मनोमन वाटत होते. त्यातच ही लस तयार आली आणि या लसीच्या प्रायोगिक चाचणीसाठी स्वयंसेवक होण्याची इच्छा मी वडील संतोष मोरे यांच्याकडे व्यक्त केली. वडिलांनी माझ्या इच्छेला तत्काळ होकार दिला. त्यामुळेच या लसीच्या भारतातील तिसऱ्या टप्प्यातील प्रायोगिक चाचणीसाठी महाराष्ट्रातील पहिली स्वयंसेवक होण्याचा मान मिळाल्याचे पुण्यातील विठ्ठलवाडी येथील महाविद्यालयीन युवती राधा संतोष मोरे सांगत होती.
पुण्यातील राधा मोरे ही लहान मुलांवरील झायकोव्ह-डी या कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रायोगिक चाचणीत ही लस टोचून घेणारी राज्यातील पहिली स्वयंसेवक ठरली आहे. आतापर्यंत तिचे लहान मुलांसाठीच्या या कोरोना प्रतिबंधक लसीचे तीनही डोस पूर्ण झाले आहेत. लहान मुलांसाठीच्या या लसीची खरेदी करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. यामुळे येत्या डिसेंबरपासून लहान मुलांसाठी या लसीचे डोस देण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. राधा सध्या पुण्यातील कन्नड संघाच्या कावेरी कॉलेजमध्ये बीबीए करत आहे.
वडिलांनी या लसीच्या प्रायोगिक चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिल्यानंतर पहिल्यांदा माझी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोरोनाची आरटीपीसीआर ही चाचणी घेतली गेली आणि ही चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यानंतर प्रायोगिक चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी माझी स्वयंसेवक म्हणून निवड झाली. यासाठी निवड झाली तेव्हा १७ वर्षे वय होते. या निवडीनंतर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात प्रत्येकी २८ दिवसांच्या फरकाने या लसीचे तीन डोस देण्यात आले. यापैकी पहिला डोस २१ एप्रिल, २०२१ ला, १९ मे २०२१ ला दुसरा आणि १६ जून २०२१ ला तिसरा डोस देण्यात आल्याचे राधाने सांगितले.
राधा म्हणाली, ‘‘कोरोनाच्या साथीच्या या अवघड काळात लोकांना रुग्णालयात जाण्याचीसुद्धा भीती वाटते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल, मे महिन्यात दररोज वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि वाढते मृत्यूची संख्या पाहून, या लसीच्या प्रायोगिक चाचणीत सहभागी व्हावे वाटत होते. त्यातच माझ्या
वडिलांनी ऑक्सफर्ड अल्ट्रा झेलंका लसीच्या चाचणीत दुसऱ्या टप्प्यात भाग घेतला होता. आता ती लस मोठ्या संख्येने जगभर लोक घेत आहेत. परंतु मुलांकरिता लस कधी येईल, ही गोष्ट मला सतत त्रास देत होती. त्यामुळे या कामासाठी पुढे येणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, ही भावना मला माझ्या आई- वडिलांनी पटवून दिली आणि यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले.’’
माझ्यावर घेण्यात आलेल्या या चाचण्यांमुळे या लसीच्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल आणि सर्वसामान्य मुलांपर्यंत ही लस लवकरच उपलब्ध होण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी माझी आशा आहे. या चाचणीत सहभागी होण्यात काहीसा धोका नक्कीच होता. पण या चाचण्या लवकरात लवकर यशस्वी होऊन बाजारात ही लस लवकरात लवकर पोहोचावी, एवढी अपेक्षा आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मानवाची थोडीशी सेवा करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
- राधा संतोष मोरे
विठ्ठलवाडी, पुणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.