पुणे

भक्ती आणि आनंदाचा पिढ्यान्‌पिढ्यांचा उत्सव

CD

भक्ती आणि आनंदाचा पिढ्यान्‌पिढ्यांचा उत्सव
किंवा
श्रद्धेचे रंग लोकजीवनाचा गंध

गावाच्या वेशीवरून आत शिरताना कानावर पडणारा ढोल-ताशांचा गजर, मंदिराच्या कळसावर फडकणारी पताका, गुलालाने रंगलेले रस्ते आणि देवाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा... यात्रा म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते ते गावाच्या आनंदाचे हेच चित्र! वर्षभर कामानिमित्त गावापासून दूर गेलेली माणसे या निमित्ताने पुन्हा एकत्र येतात. कुठे देवाचे लग्न लागते, कुठे बगाड फिरते, तर कुठे कुस्त्यांचे आखाडे आणि लोककलांचे फड रंगतात. पुणे जिल्ह्यातील अशा असंख्य यात्रा-जत्रा म्हणजे केवळ धार्मिक सोहळे नाहीत; तर श्रद्धा, परंपरा, लोकजीवन आणि सामाजिक एकोप्याचा पिढ्यान्‌पिढ्या वाहत आलेला सांस्कृतिक उत्सव आहे.

- प्रणव पाटील
------------------------------------------------

पुणे जिल्ह्यातील यात्रा-जत्रांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गावाने आपल्या ग्रामदैवताभोवती स्वतंत्र परंपरा विणली आहे. पुरंदरच्या डोंगररांगांपासून दौंडच्या पठारी प्रदेशापर्यंत आणि खेड-जुन्नरच्या ग्रामीण पट्ट्यापासून मुळशी-मावळच्या सह्याद्रीपर्यंत ही परंपरा वेगवेगळ्या रूपांत दिसते. कुठे देवाचा विवाहसोहळा असतो, तर कुठे भविष्याचा वेध घेणारी भाकणूक. कुठे काट्यांमध्ये उड्या मारण्याची परंपरा, तर कुठे शेकडो वर्षांपासून चालत आलेली सोंगे. या प्रत्येक प्रथेमागे गावाच्या जगण्याचा, श्रद्धेचा आणि सामूहिक स्मृतीचा एक धागा दडलेला आहे.
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा आणि जोगेश्वरी देवीचा विवाहसोहळा हा जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्सवांपैकी एक. माघ शुद्ध पौर्णिमेपासून माघ वद्य दशमीपर्यंत सुमारे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात संपूर्ण गाव वऱ्हाडी बनते. माघ शुद्ध द्वादशीला विवाहाचे निमंत्रण दिले जाते. घरांसमोर रांगोळ्या सजतात, सुवासिनींकडून हळदीचा कार्यक्रम होतो. मध्यरात्रीनंतर वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघते आणि म्हस्कोबा-जोगेश्वरीचा विवाहसोहळा पार पडतो. एखाद्या घरातील मंगलकार्याप्रमाणे गावकरी या सोहळ्यात सहभागी होतात. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक. माघ वद्य पंचमीपासून पाऊस, शेती आणि पीकपाण्याबाबत भाकीत केले जाते. शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत निसर्गाच्या लहरींना किती महत्त्व आहे, याचे प्रतिबिंब या परंपरेत दिसते. यात्रेच्या अखेरच्या दिवशी रंगणारा ''मारामारी'' उत्सवही भाविकांसाठी खास आकर्षण असतो. गुलाल आणि रंगांच्या उधळणीत भाविक सहभागी होतात. सोमवती अमावस्येला पालखी मिरवणूक, नीरा नदीतील देवाचे स्नान, घोडे उड्डाण आणि दीडरात्रीचा गोंधळ असे धार्मिक कार्यक्रमही होतात.
पुरंदर तालुक्यातील जेजुरी म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबाची नगरी. चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्येला येथे मोठ्या यात्रा भरतात. मणी-मल्ल दैत्यांच्या वधाच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. ''येळकोट येळकोट जय मल्हार''च्या जयघोषात गडावर भंडाऱ्याची मुक्त उधळण होते आणि अवघी जेजुरी सोन्याच्या रंगात न्हाऊन निघते. सोमवती अमावस्येला खंडोबाची पालखी कऱ्हा नदीकाठी नेण्याची परंपरा आहे. भव्य दगडी पायऱ्या, दीपमाळा, ऐतिहासिक कमानी आणि कडेपठाराचे मूळ देवस्थान यांमुळे जेजुरीला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध समाजघटकांचे कुलदैवत असलेला खंडोबा जेजुरीच्या यात्रेतून श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा जागर घडवतो.
पुरंदरमधीलच गुळुंचे गाव ज्योतिर्लिंगाच्या काटेबारस यात्रेमुळे परिचित आहे. दिवाळीच्या काळात कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून या यात्रेला सुरुवात होते. स्वयंभू शिवपिंडीवर अभिषेक आणि धार्मिक विधी झाल्यानंतर पालखी गावाबाहेरील देवाच्या काठीच्या भेटीसाठी निघते. या वेळी बाबळीच्या काट्यांशी संबंधित पारंपरिक विधी होतात. काट्यांमध्ये उड्या मारणाऱ्या व्यक्तींना ''देव'' संबोधून त्यांच्या गळ्यात हार घातले जातात आणि गुलाल लावला जातो. श्रद्धा आणि परंपरेचा हा अनोखा संगम या यात्रेला वेगळी ओळख देतो. धालेवाडी येथील सटरफटर महाराजांची पुण्यतिथीही स्थानिक श्रद्धेने साजरी केली जाते.

लोककलेच्या रंगमंचावर अवतरतात पौराणिक पात्रे
दौंड तालुक्यातील राहू-पिंपळगाव येथील शंभू महादेवाची गुढीपाडव्याला भरणारी यात्रा लोककलेच्या समृद्ध परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. महादेवाच्या कावडीची आणि विविध सोंगांची सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा येथे जपली जाते. भक्त पुंडलिक, मारुती, सरस्वती, मार्कंडेय ऋषी, काळभैरव, जोगेश्वरी, दैत्य-भवानी, सत्यवान-सावित्री, चांगदेव-ज्ञानेश्वरांची भिंत, पांडव, पोतराज अशा अनेक पौराणिक आणि पारंपरिक व्यक्तिरेखा साकारल्या जातात. विनोदी फार्सही सादर केले जातात. रंगभूषा, वेशभूषा आणि अभिनयाचा हा आविष्कार पाहण्यासाठी परिसरातील गावांमधील लोक रात्रभर जागतात. या यात्रेतील सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारी आणखी एक परंपरा म्हणजे रंगपंचमीला चांदशाहबाबा या मुस्लिम देवस्थानासमोर होणारा तमाशाचा कार्यक्रम. धार्मिक परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी लोककलेच्या माध्यमातून त्यांच्यात निर्माण झालेला संवाद आणि आपुलकी ग्रामीण संस्कृतीचे मोठेपण अधोरेखित करते.
खेड आणि शिरूर तालुक्यांतील यात्रांनाही अशीच समृद्ध परंपरा आहे. रणमळा येथील भैरवनाथ महाराज, मांडवगण फराटा येथील वाघेश्वर महाराज आणि मलठण येथील मल्लिकार्जुन यांच्या यात्रा परिसरात प्रसिद्ध आहेत. धार्मिक विधींबरोबरच कुस्त्यांचे आखाडे, लोककला आणि बैलगाड्यांच्या शर्यती या यात्रांना लोकउत्सवाचे स्वरूप देतात.
खेड तालुक्यातील पाईट येथील नवखंडेनाथ महाराजांची यात्रा सामाजिक एकोप्याचा सुंदर आदर्श घालून देते. सर्व जाती-धर्मांतील लोक एकत्र येऊन आपल्या घरून जेवणाच्या पाट्या आणतात. नवखंडेनाथांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि सामुदायिक भोजनाचा आनंद घेतला जातो. बैलगाड्यांच्या शर्यती आणि कुस्त्यांचे आखाडेही येथे भरतात. एकाच पंगतीत बसून भोजन करण्याची ही परंपरा गावातील माणसांमधील समानतेची आणि आपुलकीची भावना अधिक दृढ करते.

सह्याद्रीच्या कुशीत देवराईचा जागर
मुळशी आणि मावळ तालुक्यांच्या सह्याद्रीच्या कुशीत ग्रामदैवतांबरोबरच देवराई आणि निसर्गाशी जोडलेल्या श्रद्धास्थानांची परंपरा जपली गेली आहे. वाघजाई, वाघोबा, विनोबा, कमळजाई आणि बापदेव अशा देवतांची ठाणी या परिसरात आढळतात. चैत्र पौर्णिमेच्या आसपास या देवतांच्या यात्रा भरतात. काही ठिकाणी बगाड आणि आत्मपीडेशी संबंधित पारंपरिक विधीही केले जातात.
आज माहिती-तंत्रज्ञान उद्योगामुळे जागतिक नकाशावर पोहोचलेल्या वाकड-हिंजवडी परिसरातील संयुक्त यात्रेतही बगाडाची परंपरा जपली जाते. या बगाडासाठी आवश्यक लाकूड आणण्याकरिता ग्रामस्थ मुळशीतील बारपे गावापर्यंत पायी जातात. आधुनिक शहरीकरणाच्या वेगातही जुन्या ग्रामपरंपरांशी असलेली ही नाळ लक्षवेधी आहे.
मावळ, मुळशी, राजगड आणि भोरच्या डोंगराळ भागातून कोकणात जाणाऱ्या जुन्या घाटवाटांवर धनगर समाजाच्या पूर्वजांची स्मृतिस्थळे आणि मंदिरे आहेत. घोटवडे, काळे कॉलनी, डांगे चौक, काळेवाडी आणि कुसगाव येथील अशा मंदिरांमध्ये माघी पौर्णिमेला यात्रा भरते. वर्षभर शांत असणारा परिसर या दोन-तीन दिवसांत गजबजून जातो. वेगवेगळ्या ठिकाणचे धनगर बांधव एकत्र येतात. भाकणुकीच्या कार्यक्रमात काही व्यक्तींच्या अंगात पूर्वजांचे वारे येत असल्याची श्रद्धा आहे. त्यातून समाजाच्या प्रश्नांवर तोडगे, पावसाचे अंदाज आणि भविष्याविषयी भाकिते मांडली जातात. या यात्रांमधून धनगर समाजाची सामूहिक ओळख आणि पूर्वजांशी जोडलेले नाते अनुभवायला मिळते. मुळशी तालुक्यातील उरवडे येथील नवखंडेनाथाची यात्राही विशेष उल्लेखनीय आहे. सत्यनारायण पूजा, लोकनाट्य आणि कुस्त्यांचे आखाडे हे येथील आकर्षण. मात्र यात्रेचा खर्च वजा जाता शिल्लक राहणारा निधी गावातील शाळेच्या इमारतीसाठी दिला जातो. श्रद्धेच्या उत्सवातून शिक्षणाच्या विकासाला हातभार लावण्याची ही भूमिका निश्चितच प्रेरणादायी आहे.

भैरवनाथांच्या यात्रांनी फुलतो लोकउत्सव
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील यात्रा-जत्रांमध्ये काळभैरवनाथ, मुक्ताबाई आणि नाईकबाबा यांच्या देवस्थानांना विशेष स्थान आहे. नारायणगाव येथील श्री मुक्ताबाई देवी आणि काळाबा देवाची यात्रा सहा दिवस चालते. धार्मिक कार्यक्रम, कुस्त्या, लोकनाट्य, शोभायात्रा आणि दारूकाम यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असते. या यात्रेच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि शिवजयंती संयुक्तपणे साजरी करण्याची परंपराही जपली जाते. त्यामुळे धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक महापुरुषांच्या विचारांनाही येथे स्थान मिळते.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील श्री काळभैरनाथाची यात्रा नारळ आणि पेढ्यांच्या मोठ्या खरेदी-विक्रीसाठी ओळखली जाते. यात्रेत सुमारे दहा हजार नारळ आणि दोन हजार किलो पेढ्यांची विक्री होत असल्याचे सांगितले जाते. बैलगाड्यांच्या मिरवणुका हेही येथील आकर्षण. यात्रेमुळे स्थानिक व्यापारी, विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांना मिळणारी आर्थिक चालना लक्षात घेता या उत्सवांचा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सहभागही स्पष्ट होतो. ओतूर परिसरातील उदपूर येथे काळभैरनाथ आणि मुक्ताबाई देवीच्या यात्रेत ''गाडी बगाडा''ची मिरवणूक काढली जाते. जमिनीपासून सुमारे १२५ फूट उंचीवर असलेल्या लांब आडावर बगाड फिरवण्याची परंपरा येथे जपली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. जुन्नर तालुक्यातील देवेवाडी येथे चैत्र महिन्यात भरणारी नाईकबाबांची यात्रा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकातील भाविकांनाही आकर्षित करते.

महाप्रसादातून जपली जाते संतपरंपरा
यात्रा-जत्रांमध्ये देवदर्शन, मिरवणुका आणि लोककलेइतकेच महत्त्व महाप्रसादालाही आहे. देहू येथील संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी यांच्या जीवनातील एका प्रसंगाशी शेवयांच्या महाप्रसादाची परंपरा जोडली गेली आहे. तुकोबाराय वैकुंठगमनानंतर पाचव्या दिवशी आपल्या मुलीला भेटण्यासाठी प्रकट झाले आणि त्या वेळी भागीरथीबाईंनी त्यांना शेवया खाण्यास दिल्या, अशी आख्यायिका सांगितली जाते. या स्मरणार्थ रंगपंचमीला अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण, पूजा-अभिषेक आणि कीर्तनाचे आयोजन केले जाते. त्यानंतर भाविकांना शेवयांचा महाप्रसाद दिला जातो.

जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र आणे येथे पौष शुद्ध चतुर्दशीला श्री रंगदास स्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. आमटी-भाकरीचा महाप्रसाद हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य. पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आमटी आणि भाकरी तयार करून भाविकांना वाटली जाते. दानशूर भाविकांच्या मदतीतून हा अन्नदानाचा सोहळा पार पडतो. शेवया असोत किंवा आमटी-भाकरी, या महाप्रसादातून भक्तिभावाबरोबरच सामुदायिक सहकार्याची परंपरा पुढे जाते. शिवभक्तीशी जोडलेल्या काही वेगळ्या प्रथाही जिल्ह्यात पाहायला मिळतात. शिवनेरी परिसरातील प्राचीन पंचलिंग शिवालय मंदिरात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तांदळाच्या पाच पिंडी तयार करून दर्शनासाठी ठेवल्या जातात. खेड तालुक्यातील दोंदे आणि ओतूर येथील कपर्दिकेश्वर मंदिरातही श्रावण सोमवारी तांदळाच्या पिंडींचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.

परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड
पुणे जिल्ह्यातील यात्रांचे आणखी एक आश्वासक चित्र म्हणजे धार्मिक श्रद्धेला सामाजिक विकासाची जोड देण्याचे प्रयत्न. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील श्री अंबरनाथ देवस्थानाची यात्रा आणि इंदापूरमधील अकलूज रस्त्यावरील ज्योतिबाची यात्रा स्थानिक धार्मिक परंपरेचा भाग आहेत. निमगाव येथील खंडोबाची यात्रा माघ आणि चैत्र पौर्णिमेला भरते. बैलगाड्यांची घाटवारी आणि गुलालाची उधळण यामुळे या यात्रेला विशेष रंगत येते.
ओतूरजवळील मिंगावाडी येथे म्हसोबाच्या यात्रेत पशुहत्या टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून वाचलेल्या पैशांचा उपयोग समाजमंदिर बांधण्यासाठी करण्यात आला. खेड तालुक्यातील कोये गावाने तर यात्रा रद्द करून त्यासाठी होणारा खर्च गावाच्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. उरवडे येथे यात्रेच्या शिल्लक निधीतून शाळेच्या इमारतीसाठी मदत केली जाते. या निर्णयांतून गावाच्या विकासासाठी सामूहिक इच्छाशक्ती कशी उपयोगी पडू शकते, हे दिसून येते.

पालखी विसावते; पण नात्यांचा उत्सव सुरूच राहतो...
पुणे जिल्ह्यातील यात्रा-जत्रांचा हा पट पाहिला की प्रत्येक गावाची एक स्वतंत्र सांस्कृतिक ओळख असल्याचे जाणवते. कुठे देवाचे लग्न असते, कुठे भाकणूक होते, कुठे काट्यांशी संबंधित अनोखी प्रथा असते, तर कुठे उंच बगाड फिरवले जाते. कुठे रात्रभर सोंगे रंगतात, तर कुठे सामुदायिक भोजनातून सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जातो. या सगळ्या परंपरांचा बाह्य आविष्कार वेगळा असला, तरी त्यांना जोडणारा समान धागा म्हणजे श्रद्धा आणि लोकसहभाग.
आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि शहरीकरणामुळे गावांचे स्वरूप बदलत आहे. गावातील तरुण रोजगारासाठी शहरांकडे जात आहेत. जुन्या पिढीने जपलेल्या अनेक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आव्हानही उभे आहे. मात्र यात्रा आली की गावाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली जाते. परगावी गेलेली माणसे घरी परततात. वर्गणी गोळा होते, कार्यक्रमांचे नियोजन होते, कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि गावातील लहान-मोठी माणसे एकत्र येतात. या उत्सवांचे खरे महत्त्वही याच सामूहिकतेत आहे. केवळ धार्मिक विधी पार पाडणे किंवा वर्षातून एकदा देवदर्शन करणे एवढ्यापुरत्या यात्रा मर्यादित नाहीत. त्या गावाच्या इतिहासाच्या, लोककलेच्या, सामाजिक संबंधांच्या आणि सांस्कृतिक अस्मितेच्या वाहक आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार अनावश्यक रूढी बाजूला सारत परंपरेतील चांगलेपण जपणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि यात्रांना ग्रामविकासाची जोड देणे गरजेचे आहे.
शेवटी यात्रा संपते. पालखी मंदिरात विसावते. ढोल-ताशांचा आवाज थांबतो. गुलालाची उधळण खाली बसते. बाजारपेठ पुन्हा शांत होते. मात्र यात्रेच्या निमित्ताने भेटलेली माणसे, एकत्र घालवलेले क्षण आणि गावाच्या मातीतून मिळालेला आपलेपणाचा अनुभव मनात कायम राहतो. पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत प्रत्येक जण आपापल्या वाटेने निघतो. गाव मात्र पुढच्या यात्रेची आतुरतेने वाट पाहत राहते. कारण यात्रा ही काही दिवसांची असली, तरी ती जपणारी श्रद्धा, संस्कृती आणि माणसांमधील नाती वर्षानुवर्षे टिकणारी असतात. हाच पुणे जिल्ह्याच्या यात्रा-जत्रांचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे.

यात्रा म्हणजे गावाच्या अर्थकारणालाही बळ
यात्रा-जत्रा या धार्मिक उत्सवांबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरतात. अवसरी खुर्द येथील काळभैरनाथाच्या यात्रेत नारळ आणि पेढ्यांची मोठी उलाढाल होते. जिल्ह्यातील गावागावांत भरणार्या यात्रा-जत्रांमुळे खाद्यपदार्थ विक्रेते, छोटे व्यावसायिक, खेळणी विक्रेते, फेरीवाले आणि स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी मिळतात. यात्रेच्या काळात गावातील बाजारपेठ फुलते. काही दिवसांसाठी का होईना, गावाच्या अर्थकारणाला नवी गती मिळते. त्यामुळे यात्रा ही श्रद्धेबरोबरच ग्रामीण बाजारपेठेचीही महत्त्वाची संधी ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT