पुणे

सांस्कृतिक हंगामात यंदा कोट्यवधींची उलाढाल

CD

महिमा ठोंबरे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २३ : संगीत महोत्सव, साहित्य संमेलन, पुस्तक महोत्सव, चित्रपट महोत्सव, दिवाळी पहाट मैफिली... पुढील तीन महिन्यांत ‘सांस्कृतिक राजधानी’ असलेल्या पुण्यात अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यंदाच्या या सांस्कृतिक हंगामात शहरात सुमारे शंभर कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. यातून कलाकारांसह तंत्रज्ञ, कार्यक्रम व्यवस्थापक, जाहिरात व्यावसायिक आणि पूरक व्यवसायांनाही रोजगाराच्या नव्या संधी मिळत आहेत.

दिवाळी पहाटच्या मैफिलींनी या हंगामाची नांदी होते. त्यानंतर थंडीची चाहूल लागताच रसिकांना वेध लागतात ते निरनिराळ्या सांस्कृतिक महोत्सवांचे. डिसेंबर-जानेवारीमध्ये तर देशभरातील प्रख्यात कलाकार आणि साहित्यिकांची मांदियाळी पुण्यात जमलेली असते. यात ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’सह वसंतोत्सव, स्वरझंकार, गानसरस्वती, तालचक्र असे संगीत महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे पुस्तक महोत्सव अशा निरनिराळ्या महोत्सवांचा समावेश असतो. त्याशिवाय यंदा तर शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देखील पुण्यात होणार आहे.

तीन ते पाच दिवस चालणाऱ्या मोठ्या सांगीतिक महोत्सवांपासून पुस्तक महोत्सव, चित्रपट महोत्सव आणि साहित्य संमेलनांपर्यंत विविध कार्यक्रमांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. याशिवाय पाडवा पहाट मैफिली, दिवाळीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र संगीत मैफिली, नाट्यमहोत्सव आणि नियमित नाट्यप्रयोग यांचीही मोठी संख्या आहे. या कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक क्षेत्राभोवती आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र साखळी निर्माण झाली आहे.

यातील प्रत्येक महोत्सवातील रंगमंच उभारणी, ध्वनियंत्रणा, प्रकाशयोजना, सजावट, छायाचित्रण, व्हिडिओ निर्मिती, प्रसिद्धी, तिकीटव्यवस्था, सुरक्षा आणि प्रेक्षक व्यवस्थापन अशा अनेक कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ लागते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार काही दिवसांपासून ते अनेक महिन्यांपर्यंत विविध व्यावसायिकांना काम मिळते. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थापन ही स्वतंत्र सेवा म्हणून विकसित होत असून, या क्षेत्रात तांत्रिक कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची मागणीही वाढत आहे.

कलाकार, वादक, गायक आणि निवेदक यांच्याबरोबरच ध्वनी व प्रकाशयोजनेचे तंत्रज्ञ, ग्राफिक डिझायनर, जाहिरात व्यावसायिक, मुद्रक आणि इव्हेंट मॅनेजर हे या आर्थिक साखळीचा भाग आहेत. मोठ्या कार्यक्रमांमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांनाही काम मिळते. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची वाढती संख्या ही केवळ रसिकांसाठी पर्वणी नसून, अनेकांच्या उत्पन्नाचे साधन ठरत आहे.

हॉटेलपासून खाद्यव्यवसायापर्यंत अनेकांना उत्पन्नाच्या संधी
सांस्कृतिक कार्यक्रमांचा आणि महोत्सवांचा परिणाम हा आयोजनस्थळापुरता मर्यादित राहत नाही. महोत्सवांसाठी बाहेरगावाहून येणारे कलाकार, साहित्यिक, प्रकाशक आणि रसिक यांच्यामुळे हॉटेल, वाहतूक, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही व्यवसाय मिळतो. महोत्सवांमध्ये कार्यक्रमस्थळी उभारले जाणारे स्टॉल हे खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी आणि अन्य व्यावसायिकांसाठी देखील उपयुक्त ठरतात. जाहिरातदार आणि प्रायोजक यांच्यामुळे आर्थिक उलाढालीची व्याप्ती आणखी वाढते.

महोत्सवांच्या आयोजनाचा खर्च
- १ ते ३ कोटी रुपये : मोठ्या सांगीतिक महोत्सवांचा खर्च
- ६ ते ७ कोटी : साहित्य संमेलनाचा अंदाजे खर्च
- २५ ते ३० लाख : भव्य ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचा खर्च
- २ ते ३ लाख : छोटेखानी सांस्कृतिक, सांगीतिक मैफिलींचा खर्च

यंदाच्या हंगामातील लक्षवेधी कार्यक्रम
‘सकाळ लिट फेस्ट’ : १२ ते १५ नोव्हेंबर
‘सकाळ स्वास्थ्यम्’ : ४ ते ६ डिसेंबर
पुणे पुस्तक महोत्सव : १२ ते २० डिसेंबर
वसंतोत्सव : ११ ते १७ जानेवारी
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : १३ ते १७ जानेवारी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : १४ ते २१ जानेवारी
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : २८ ते ३१ जानेवारी

निवेदक हाही एक कलाकार असतो. पुण्यातील सांस्कृतिक महोत्सवांनी निवेदकांना आर्थिक आधार तर दिलाच; मात्र त्यासह प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. या महोत्सवांमधील वातावरण माणूस म्हणून अंतर्बाह्य समृद्ध करणारे असते. एखाद्या महोत्सवाशी निवेदकाचे नाव जोडले जाणे, असा अनुभव देखील काही वेळा येतो. ‘सवाई गंधर्व’ आणि आनंद देशमुख हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
- मिलिंद कुलकर्णी, निवेदक

संगीत महोत्सव हे केवळ कलाकारांच्या सादरीकरणाचे व्यासपीठ नसून अनेक व्यावसायिक आणि सेवा पुरवठादारांना कामाच्या संधी देणारे माध्यम आहे. आम्ही ‘स्वरझंकार’ संगीत महोत्सवासह विविध महोत्सवांच्या आयोजनात स्थानिक व्यावसायिकांना संधी देण्याचा प्रयत्न करतो. औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्राचाही आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.
- तेजस व राजस उपाध्ये, व्हायोलिन वादक व महोत्सव संयोजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT