पुणे जिल्ह्याच्या विकासाची नांदी...
बदलत्या पुणे जिल्ह्याचा वेध घेणारा ‘सकाळ’चा ‘नांदी’ हा दिवाळी विशेषांक वाचकांच्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. ‘गावगाडा ते ग्रोथ हब’ या संकल्पनेतून साकारलेल्या या अंकाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग, बदलते स्वरूप, नव्या संधी, आव्हाने आणि या परिवर्तनाच्या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या माणसांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
‘विद्येचे माहेरघर’, ‘सांस्कृतिक पुणे’ अशी समृद्ध ओळख असलेल्या पुणे जिल्ह्याने आता विकासाच्या क्षेत्रातही मोठी गरुडझेप घेतली आहे. शिक्षण, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, सहकार, शेती, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत जिल्ह्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत पुणे जिल्हा एका नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. कालपर्यंत गावगाड्याच्या चौकटीत असलेली अनेक गावे आज औद्योगिक, व्यावसायिक आणि शहरी विकासाची केंद्रे बनत आहेत. त्यामुळेच ‘गावगाडा ते ग्रोथ हब’ ही केवळ या अंकाची संकल्पना नसून, बदलत्या पुणे जिल्ह्याच्या प्रवासाचे प्रतिबिंब आहे.
विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काळानुसार विकासाच्या संकल्पना बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात आणि त्यातून नव्या संधी निर्माण होतात. पुणे जिल्ह्याच्या बाबतीतही हे परिवर्तन प्रकर्षाने जाणवते. एकीकडे पुणे शहराचा विस्तार होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातही विकासाची नवी केंद्रे आकाराला येत आहेत. चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर यांसारख्या औद्योगिक आणि व्यावसायिक पट्ट्यांनी जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि उद्योजकतेच्या माध्यमातून गावांच्या अर्थकारणात बदल घडत आहे.
या विकासप्रवासात पायाभूत सुविधांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पुणे जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. विमानतळामुळे उद्योग, व्यापार, निर्यात, रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पुणे रिंगरोडच्या माध्यमातून जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्याबरोबरच शहर आणि ग्रामीण भागातील अंतरही कमी होणार आहे. वाहतूककोंडीवरील उपाय, औद्योगिक क्षेत्रांना मिळणारी जोडणी आणि नव्या नागरीकरणाच्या शक्यता यामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाचा नकाशाच बदलण्याची क्षमता या प्रकल्पांमध्ये आहे.
अलीकडेच झालेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेने पुणे जिल्ह्याला जागतिक नकाशावर नेण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील रस्ते, डोंगरदऱ्या, घाट वाटा आणि पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्य जगासमोर प्रभावीपणे आले. मुळशी, मावळ, जुन्नर, भोर, राजगड (वेल्हे) अशा निसर्गसमृद्ध भागांमध्ये पर्यटनाच्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात, याची जाणीव या निमित्ताने झाली. पुणे जिल्ह्याची ओळख केवळ उद्योग आणि शिक्षणापुरती मर्यादित नसून, निसर्ग, साहसी पर्यटन, ऐतिहासिक वारसा आणि ग्रामीण संस्कृती यांचाही मोठा ठेवा जिल्ह्याकडे आहे. या ठेव्याचे संवर्धन करीत पर्यटनाला शाश्वत विकासाची जोड देणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्याच्या विकासाची चर्चा करताना शेतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बदलत्या हवामानाचा सामना करीत जिल्ह्यातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत आहेत. आधुनिक सिंचन पद्धती, पीकपद्धतीतील बदल, कृषी प्रक्रिया उद्योग, पूरक व्यवसाय, निर्यातक्षम उत्पादन आणि बाजारपेठेच्या नव्या संधींचा शोध घेतला जात आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत अनेक शेतकऱ्यांनी यशाचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या कष्टातून केवळ स्वतःचे आर्थिक चित्र बदलले नाही, तर परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा दिली आहे. या अंकात अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथांना स्थान देताना शेतीतील बदलत्या प्रवाहाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
विकासाच्या या प्रवासात पुणे जिल्ह्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा विसरता कामा नये. मावळातील ऐतिहासिक घराणी, पिढ्यानपिढ्या जपलेले वाडे, ग्रामदैवतांच्या यात्रा, वारकरी संप्रदायाची परंपरा, अष्टविनायक क्षेत्रे, ज्योतिर्लिंगे, लोककला आणि आदिवासी संस्कृती या सगळ्यांनी पुणे जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख समृद्ध केली आहे. गावागावांतील परंपरा, लोकजीवन आणि माणसांच्या जगण्यातील वेगळेपण हेच या जिल्ह्याचे खरे वैभव आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करताना हा वारसा जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
या विशेषांकाची निर्मिती करताना केवळ विकास प्रकल्पांची माहिती देण्यापेक्षा त्या विकासामागची माणसे, त्यांचे अनुभव, संघर्ष आणि स्वप्ने मांडण्यावर भर दिला आहे. प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन केलेले रिपोर्ताज, बदलत्या परिसराचे चित्रण, विकासाच्या नव्या वाटा, शेतीतील प्रयोग, प्रेरणादायी यशोगाथा आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक जीवनाचे दर्शन या अंकाचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच कथा, कविता आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून वाचकांसाठी समृद्ध अक्षरभांडार उपलब्ध करून दिले आहे.
पुणे जिल्हा आज एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गावगाड्याची माती, संस्कृती आणि परंपरा जपत जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडले जाण्याची संधी जिल्ह्याला मिळत आहे. ‘नांदी’ म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात. बदलत्या पुणे जिल्ह्याच्या या नव्या पर्वाची ही नांदी वाचकांना निश्चितच नवे विचार, नवी माहिती आणि विकासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल, असा विश्वास वाटतो.
सर्व वाचक, जाहिरातदार आणि विक्रेते यांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.