पुणे, ता. १४ : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी जाण्याकरिता हडपसर स्थानकावर आलेल्या एका महिला डॉक्टरने प्रसंगावधान राखत फलाटावर बेशुद्ध पडलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविले. सलग पाच वेळा ‘सीपीआर’ (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) देऊन या डॉक्टरने व्यक्तीला जीवदान दिले. डॉ. तृप्ती चोपडे असे या देवदूत ठरलेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
डॉ. तृप्ती चोपडे या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फार्मसी विभागात ‘फार्म डी’ (क्लिनिकल फार्मासिस्ट) म्हणून कार्यरत आहेत. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्या शेगाव येथील घरी जाण्यासाठी स्थानकावर दाखल झाल्या. हडपसर-नागपूर या विशेष रेल्वेने त्यांचा नियोजित प्रवास होता. फलाट क्रमांक तीनवर त्यांना एका ठिकाणी प्रवाशांची गर्दी दिसली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत खाली पडली होती आणि तिची पत्नी घाबरलेल्या अवस्थेत मदतीसाठी आक्रोश करत होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. चोपडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुग्णाजवळ धाव घेतली. त्यांनी प्रथम रुग्णाची नाडी तपासली आणि मोठ्याने हाक मारून प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णाकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यांनी तात्काळ ‘सीपीआर’ देण्यास सुरुवात केली. सलग तीन ते चार वेळा ‘सीपीआर’ देऊनही रुग्णाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, तरीही डॉ. चोपडे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर पाचव्यांदा ‘सीपीआर’ दिल्यानंतर रुग्णाच्या शरीरात हालचाल दिसू लागली आणि त्याने प्रतिसाद दिला. रुग्णाने प्रतिसाद दिल्यानंतर डॉ. चोपडे यांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने स्ट्रेचरची व्यवस्था करण्यास सांगितले. काही वेळातच रुग्णवाहिका स्थानकावर दाखल झाली आणि पुढील उपचारांसाठी त्या व्यक्तीला रुग्णालयात हलविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.