विधान परिषदेच्या मतमोजणीत चुरस
पुणे, ता. २७ : राज्यातील विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांच्या मतमोजणीमध्ये कमालीची चुरस दिसून आली. मध्यरात्रीनंतरही मतमोजणी सुरू होती आणि दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत होते.
राज्यात पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन पदवीधर मतदारसंघात, तर पुणे आणि अमरावती या शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची बनविल्यामुळे चर्चेत आलेल्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीकडे सर्वांचेच लक्ष होते. पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात चुरशीने लढत होत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर यांच्याबरोबरच शिवसेना पुरस्कृत सचिन सानप आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात चुरशीची लढत होत आहे. सायंकाळी साडेसहा वाजणच्या सुमारास पुणे शिक्षक मतदारसंघातील वैध- अवैध मतांची मोजणी पूर्ण झाली. यात ५१ हजार ५११ मते वैध ठरली. तर, एक हजार ६७३ मते अवैध ठरली. त्यांनतर विजयासाठी २५ हजार ७५६चा कोटा निश्चित करण्यात आला. तर पदवीधर मतदारसंघाचा रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वैध-अवैध मतांची मोजणी पूर्ण झाली. सुमारे दोन लाख २६ हजार मते वैध ठरली आहेत. त्यानंतर सुमारे एक लाख १३ हजारांचा कोटा निश्चित करण्यात आला.
औरंगाबाद मतदारसंघामध्ये दुपारी तीननंतर टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामध्ये ५१५ पोस्टल मतांपैकी २१ मते बाद झाली. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यात लढत होत आहे. प्रत्यक्षात दुपारी तीननंतर टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण ५१५ पोस्टल मतांपैकी सतीश चव्हाण यांना १८७, तर महाविकास आघाडीच्या प्रताप पाटील यांना १५९ मते मिळाली. सतीश चव्हाण यांनी पोस्टल मतांमध्ये २८ मतांची आघाडी घेतली.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी ३९०३ मते मिळवत आघाडी घेतली आहे. तर, शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांनी २२०९ मते घेतली आहेत. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना पहिल्या फेरीत १,३१९ मते मिळाली, तर सुरेश देवकर यांना १,५८२ मते मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी महत्त्वाच्या नागपूर पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यामध्ये चुरशीने निवडणूक झाली. अपक्ष नीतेश कराळे यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.