पुणे, ता. २० : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागातील तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. १४ हजार ४४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातून सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे. शासनाकडून आवाहन होण्यापूर्वीच स्वेच्छेने हा निर्णय घेतल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ आणि त्याच्याशी संलग्न विविध तांत्रिक अधिकारी, कर्मचारी संघटनांनी या उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब जेजुरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. सप्टेंबरच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने कपात करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, तसेच संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी पत्रातून केली आहे.
कृषी विभागातील १८ हजार ६२२ पदांपैकी तांत्रिक संवर्गातील १४ हजार ४४५ अधिकारी-कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या काळात शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि अन्य अडचणींमध्ये त्यांना मदतीचा हात देण्याच्या सामाजिक भावनेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी हा कृषी विभागाच्या कामाचा केंद्रबिंदू असून, संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे ही सामाजिक बांधिलकी असल्याची भूमिका महासंघाने घेतली आहे.
आम्ही नेहमीच शेतकऱ्यांबरोबर राहून त्यांच्या सेवार्थ कामकाज करीत आहोत. कोणी आवाहन करण्यापूर्वीच आम्ही एक पाऊल पुढे जाऊन स्वखुशीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे.
- बाबासाहेब जेजुरकर, अध्यक्ष, राज्य कृषी सेवा महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.