पुणे, ता. १८ : ‘‘सहा एकरांत दरवर्षी ३०० पोती भात पिकायचा. यंदा ५० पोती तरी पदरात पडतील की नाही, याची खात्री नाही. भाताची उंची खुंटली, रोपांना दाणे लागले नाहीत आणि शेतात भेगा पडल्या आहेत. डोळ्यांदेखत पीक करपत आहे. पाऊस पडला नाही तर खाण्यापुरताही भात मिळणार नाही. भाताबरोबरच पेंढ्याचा चाराही हातचा जाणार आहे,’’ अशी व्यथा ताभांड (ता. भोर) येथील शेतकरी विठ्ठल सोंडकर यांनी मांडली.
जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर यंदाचा भाताचा हंगाम हातातून निसटत आहे. उशिरा आलेला पाऊस, लांबलेली लागवड, वाढलेली उष्णता आणि पाण्याअभावी भाताची करपू लागलेली पीक, यामुळे भात उत्पादकांची चिंता वाढली आहे. काही शेतांमध्ये आताच ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बारामती, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खेड, भोर, राजगड या आठ तालुक्यांत आणि दुसऱ्या टप्प्यात आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांत समावेश करण्यात आला आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत.
अशी आहे सध्याची स्थिती
- उभ्या पिकाला पाणी देण्यासाठी धडपड सुरू
- वीजपुरवठ्याच्या समस्येमुळेही अडचणी वाढल्या
- वर्षभराची मेहनत आणि शेतीवर केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया जातोय
- आता पाऊस पडला तरच किमान घरापुरता भात मिळण्याची आशा आहे.
पंचनामे झाले; आता मदतीची प्रतीक्षा
दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होत असताना पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, नुकसान नोंदविल्यानंतर प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पिके वाचविण्यासाठी पुरेसे पाणी नाही, विजेची समस्या कायम आहे आणि उष्णतेमुळे जमिनीतील ओलावाही टिकत नाही. त्यामुळे केवळ यंदाच्या भाताच्या उत्पन्नावरच नव्हे, तर जनावरांसाठी मिळणाऱ्या पेंढ्याच्या चाऱ्यावरही संकट आले असल्याचे बारामती येथील सागर मोरे हे शेतकरी सांगत होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पंचनाम्यांची नोंद आणि पुढील ऑनलाइन प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष शेतात पीक हातचे जात असताना प्रशासकीय प्रक्रिया लांबू नये, अशी आमची अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या पिकांची नोंद घेऊन भरपाईची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
- शरद इंगळे, शिरूर