पुणे, ता. ३१ : दरवर्षी एक एकर भातशेतीतून चांगले उत्पादन मिळते. यंदा मात्र भाताचे दाणे भरण्याआधीच पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना झगडावे लागत आहे. डोळ्यांदेखत पीक करपू लागल्याने थोपटेवाडीतील (ता. हवेली) ज्ञानेश्वर थोपटे यांनी ते वाचविण्यासाठी टँकरचा आधार घेतला. आठ दिवसांत ४० टँकरने पिकाला पाणी दिले. एका टँकरसाठी एक हजार रुपये मोजले. एवढे करूनही पिकाची स्थिती सुधारेल की नाही, याची खात्री नाही. टँकरच्या पाण्यामुळे थोडेफार पीक हाती येईल, एवढीच आशा आता त्यांना उरली आहे.
हवेलीमधील थोपटेवाडीतील ज्ञानेश्वर थोपटे यांची जमीन काहीशी खडकाळ आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत फार काळ टिकत नाही. दरवर्षी पावसाच्या पाण्यावर भातशेती चांगली होते. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने भातपिकाला पाण्याची तीव्र गरज भासू लागली. पीक हातचे जाऊ नये म्हणून थोपटे यांनी टँकरने पाणी आणण्याचा निर्णय घेतला. एका टँकरसाठी एक हजार रुपये खर्च येत होता. आठ दिवसांत ४० टँकर पाणी शेतात सोडण्यासाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च झाले. एक एकर क्षेत्रातील भातपीक वाचविण्यासाठी त्यांनी ही धडपड केली.
नेहमीचे उत्पादन यंदा मिळणे अशक्य
भातपिकाच्या नुकसानीची तीव्रता थोपटेवाडीतील शेतकऱ्यांच्या अनुभवातून समोर येत आहे. पांडुरंग थोपटे यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी ५० किलो वजनाच्या २५ कट्ट्यांपर्यंत भाताचे उत्पादन मिळते. यंदा मात्र भाताचा एकही दाणा हाती लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. पावसाअभावी पिकाची झालेली अवस्था पाहता नेहमीइतके उत्पादन मिळण्याची अपेक्षाही करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये हवेली तालुक्याचा समावेश नाही. त्यामुळे पावसाच्या कमतरतेमुळे भातपिकाचे नुकसान झाले असतानाही थोपटेवाडी परिसरातील भातपिकांचे पंचनामे झाले नसल्याची खंत पांडुरंग थोपटे यांनी व्यक्त केली. एका बाजूला पीक वाचविण्यासाठी शेतकरी टँकरने पाणी आणून खर्च करीत आहेत, तर दुसरीकडे पिकाच्या नुकसानीची नोंदही झालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
दृष्टिक्षेपात...
जिल्ह्यातील भात लागवड : ५९ हजार ३२४ हेक्टर
गतवर्षीचे भात लागवड क्षेत्र : ५९ हजार ९३१ हेक्टर
भात लागवडीचे सरासरी क्षेत्र : ६१ हजार १०१ हेक्टर
63195, 63187
63195, 63187
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.