पुणे, ता. ४ : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १ हजार ३७२ आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ३ हजार अर्ज आले असून, ११ सप्टेंबरपर्यंत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, १५ ते २० सप्टेंबर दरम्यान मुलाखती घेऊन ५ ऑक्टोबर रोजी प्राथमिक यादी जाहीर केली जाणार आहे. अंतिम यादी २६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
नागरिकांना विविध दाखल्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्रात जावे लागते. राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या आधारे आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या निश्चित करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण भागासाठी ५ हजार लोकसंख्येला दोन केंद्रे असावीत, असा निकष लावण्यात आला आहे. त्यात २०११ च्या जनगणनेनुसार सध्या कार्यरत असलेल्या केंद्रांव्यतिरिक्त तसेच रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार ३७१ ठिकाणी केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात काढण्यात आली होती. त्यासाठी ३१ ऑगस्ट ही मुदत देण्यात आली होती. या मुदतीत जिल्ह्यातून २ हजार ९९४ जणांनी अर्ज केले आहेत.
या अर्जांची तपासणी करण्याचे काम सुरू असून, ११ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येणार आहे. अर्जदारांच्या मुलाखती १५ ते २४ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार असून, प्राथमिक निवड यादी ५ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवड यादीवर हरकती घेण्यासाठी पाच ते नऊ ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला आहे. अंतिम निवड यादी २६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या ५१० खासगी केंद्र सुरू असून, जिल्ह्यातील सुमारे तेराशे ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्यात आले आहे. मात्र, सध्या केवळ साडेतीनशे ग्रामपंचायतींमध्ये हे केंद्र सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांना वेळेत दाखले मिळावेत, यासाठी ही १ हजार ३७२ केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.