हडपसर, ता. ६ : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत या प्रस्तावित उन्नत महामार्गासाठी मोजणी आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सुमारे २० वर्षांपूर्वी झालेल्या भूसंपादनातील त्रुटींची पूर्तता तसेच त्याचा मोबदला अद्याप अनेक मिळकतदारांना मिळालेला नाही. त्यातच नव्याने होणाऱ्या भूसंपादनाबाबतही बाधित शेतकऱ्यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बाधित मिळकतदार आणि शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.
२००४ किंवा त्यापूर्वी झालेल्या भूसंपादन प्रक्रियेत काही ठिकाणी त्रुटी राहिल्या असून, त्यावेळी संपादित केलेल्या जमिनीपैकी अनेक मिळकतदारांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यावेळी निश्चित केलेली भूसंपादनाची हद्द आणि सध्या प्रस्तावित मार्गासाठी निश्चित केली जाणारी हद्द याबाबतही मिळकतदारांमध्ये संभ्रम आहे. तसेच, नव्याने संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला कोणत्या पद्धतीने दिला जाणार, याबाबतही स्पष्टता नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर योग्य माहिती घेण्यासाठी माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मिळकतदार आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली.
यापूर्वीच्या भूसंपादन प्रक्रियेत सलगता न राखता आवश्यकतेपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात आल्याची तक्रारही शेतकऱ्यांनी केली. सध्याच्या प्रस्तावित उन्नत महामार्गासाठी भूसंपादन करताना प्रत्येक ठिकाणच्या बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि महामार्गासाठी प्रत्यक्षात आवश्यक तेवढीच जमीन संपादित करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य बाजारभावानुसार आणि नियमानुसार मोबदला द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रकल्प अधिकारी विठ्ठल उदमले यांचीही भेट घेतली.
कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, शेवाळेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब मोरे, माजी नगरसेवक शिवाजी पवार, संभाजी हाके, विजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, अमित गुंड, राजेंद्र काळभोर, नानासाहेब कुंजीर, विजय गायकवाड, शुभम तुपे, प्रशांत वाघ, गणेश आढाव, सम्राट चौधरी, विशाल चौधरी, संतोष देवकर, मनोज वाघ, निखिल काळभोर, निवृत्ती आंबेकर, संतोष कांचन, प्रसाद भोर, संदीप कांचन आदी बैठकीस उपस्थित होते.
संपादनासाठी बाधित शेतकऱ्यांना नव्याने नोटिसा द्याव्यात, प्रत्येक सर्व्हे क्रमांकाचा स्पष्ट उल्लेख करावा, नोटीस संबंधित शेतकऱ्यालाच प्रत्यक्ष द्यावी, प्रत्येक गावात स्वतंत्र बैठक घेऊन हरकती, सूचना आणि अडचणी जाणून घेतल्यानंतरच पुढील मोजणीची प्रक्रिया सुरू करावी.
- राहुल शेवाळे, माजी उपसरपंच, शेवाळेवाडी
‘एमएसआयडीसी’च्या माध्यमातून होणाऱ्या उन्नत महामार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्यावर किंवा मिळकतदारावर अन्याय होणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळेल. मागील संपादन व मोबदल्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.