ऐतिहासिक पुणे व संस्कृतीचे स्थित्यंतर
‘पुणे’ आणि ‘पुणेरी’ या अवघ्या दोन शब्दांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात तयार झालेल्या अढळ स्थानाला तोड नाही. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांना इतिहास आहे, मात्र पुण्याला स्वतःची अशी एक खास ‘संस्कृती’ आहे. काळाच्या ओघात विविध रूपे धारण करणारे पुण्यासारखे शहर क्वचितच सापडेल. आजचे हे सांस्कृतिक वैभव काही एका रात्रीत किंवा योगायोगाने उभे राहिलेले नाही; त्याच्या विकासाचे धागे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाशी, विशेषतः शिवकाळाशी घट्ट गुंफलेले आहेत. हे ऐतिहासिक धागे नीट उलगडल्याशिवाय पुण्याच्या आधुनिक प्रगतीचे आणि सांस्कृतिक संचिताचे रहस्य समजणार नाही.
- अनिकेत यादव
---------------
पुण्याच्या प्राचीन इतिहासात डोकावून पाहिल्यास हे शहर प्राचीन काळापासून अस्तित्वात होते याचे काही पुरावे आपल्याला आजही पाहायला मिळतात. आज जिथे तरुणाईची वर्दळ असते त्या फर्ग्युसन टेकडीजवळ, गोखले स्मारकाच्या खालच्या बाजूला बौद्धांनी इसवीसन पूर्व पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात खोदलेली लेणीवजा गुहा आहे, तसेच गणेशखिंडीतील टेकड्यांतूनही अशाच साध्या जुन्या गुहा आढळतात. ग्रीक इतिहासकार टॉलेमी याने इ. स. १५०च्या सुमारास आपल्या नोंदीत Punnata (पुन्नाटा) नावाच्या ज्या गावाचा उल्लेख केला आहे, तो पुण्यासंबंधीच आहे की, अन्य कोणत्या गावाबाबत, यावर संशोधकांमध्ये मतभेद असले, तरी प्राचीन काळापासून पुण्यावरून महत्त्वाचे व्यापारी मार्ग जात होते हे नक्की. पूर्वीच्या काळी बहुसंख्य व्यापारी व प्रतिष्ठीत वर्ग हा बुद्धांचा अनुयायी असल्याने व्यापारी मार्गांच्या आजूबाजूला बौद्ध भिक्खूंचे विहार असत. आजच्या खंडाळा घाटातील म्हणजेच बोरघाटातील जुना व्यापारी मार्गही पुण्यावरूनच गेलेला होता. शिवाजीनगर भागात असलेले आठव्या शतकातील दगडात खोदलेले पाताळेश्वराचे अखंड देऊळ हे पुण्याच्या प्राचीनत्वाचीच साक्ष देते.
पुण्याच्या नावाचा प्रवासही तितकाच रंजक आहे. पुणे जिल्ह्यात सापडलेल्या इ. स.७५८च्या राष्ट्रकुटांच्या एका ताम्रपटात पुणे परगण्याचा उल्लेख ‘पुण्यविषय’ असा आढळतो. विशेष म्हणजे, आज आपण ज्या भागांतून रोज फिरतो त्या बोपखेल, कळस, दापोडी व भोसरी या गावांचा उल्लेख त्या ताम्रपटात अनुक्रमे बोपरखलु, कलस, दर्प-पुडिका व भेसउरीग्राम असा केलेला सापडतो. त्यानंतर इ.स.७६८ च्या सुमारास कोरलेल्या राष्ट्रकुटांच्याच दुसऱ्या एका ताम्रपटात पुणे विभागाचा निर्देश ‘पूनकविषय’ असा केला असून त्यात कर्टे, खामगाव, बोरी, चोराची आळंदी, थेऊर व उरळी या गावांचे संदर्भ येतात. थोडक्यात सांगायचे तर, आठव्या शतकातील ‘पुण्य’ आणि ‘पूनक’चे दहाव्या शतकात ‘पूणक’ झाले आणि पुढील एक-दोन शतकांत त्याचेच रूपांतर आपल्या लाडक्या ‘पुणे’ या नावात झाले.
राजकीयदृष्ट्या पाहिल्यास पुण्याच्या स्थित्यंतराची सुरुवात राष्ट्रकुटांपासून झाली. इ.स. ७५४मध्ये राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने चालुक्य राजा दुसरा कांतिवर्मन याचा पराभव करून येथील बराचसा भाग आपल्या ताब्यात आणला. त्यानंतर इ.स. ९७३च्या सुमारास देवगिरीच्या यादवांनी राष्ट्रकुटांचा पाडाव केला आणि पुण्यावर तब्बल दोन-तीनशे वर्षे राज्य केले. या यादवकाळाने पुण्याला पहिले दृश्य सांस्कृतिक रूप दिले. मुठा नदीच्या काठावर यादवांनी सुंदर मंदिरे बांधली आणि त्यांना लागूनच नदीवर कोचदार बांधणीचे दगडी घाट बांधले. नेवाशाच्या यादवकालीन घाटांशी विलक्षण साम्य असणारे या घाटांचे अवशेष मुठा नदीकाठी थोरल्या व धाकट्या शेखसल्याच्या दर्ग्याजवळ पाहायला मिळतात. याच यादवकाळात संत नामदेव यात्रेच्या निमित्ताने फिरत असताना पुण्यात आले होते; त्यांनी आळंदीच्या पंचक्रोशीचे वर्णन करताना दक्षिणेस पुण्येश्वर व नागेश्वर ही प्राचीन देवळे असल्याचा उल्लेख केला आहे.
कोट आणि कसबा
तेराव्या शतकाच्या अखेरीस मात्र या शांत पुणेवाडीवर सुलतानी वादळे घोंघावू लागली. इ.स. १२९४मध्ये दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन याने देवगिरीच्या रामदेवराव यादव यांचा पराभव केला आणि पुढे त्याचा सरदार मलिक काफूर याने पुण्यासह दक्षिणेचा बराचसा मुलूख खिलजींच्या टाचेखाली आणला. इ.स. १३२०च्या सुमारास खिलजी जाऊन तुघलक घराणे आले आणि इ.स. १३३८मध्ये मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला, म्हणजेच दौलताबादला हलवण्याचा अजब तुघलकी निर्णय घेतला. त्यावेळी पुण्याजवळील कोंढाणा किल्याचा किल्लेदार नाग नाईक हा खिलजींच्या काळापासूनच बंडखोर वृत्तीने वागत होता. त्यामुळे तो किल्ला जिंकून घेण्यासाठी मुहम्मद तुघलकाने कोंढाण्याला वेढा घातला; परंतु त्यापूर्वी त्याला वाटेत लागणारे पुणे काबीज करावे लागले. तुघलकाने या भागाचा कारभार पाहण्यासाठी बरिया अरब नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली. या बरिया अरबाने प्रथम चाकण येथे किल्ला बांधला आणि पुढे पुण्यात वास्तव्य करून पुण्याभोवती भक्कम तटबंदी (कोट) उभारली. त्यामुळे पुण्यात वस्ती वाढून ‘पुणेवाडी’चे रूपांतर ‘कसबे पुणे’ असे झाले. याच काळात दिल्लीच्या निजामुद्दीन अवलियांचे शिष्य इस्लामच्या प्रसारासाठी दक्षिणेत आले होते. त्यांपैकी शेख सलाहउद्दीन गाझी चिश्ती ऊर्फ थोरला शेखसल्ला पुण्यात राहिला.
इ.स. १३४७मध्ये हसन गंगू बहामनीने तुघलकांची सत्ता उलथवून बहामनी राज्य स्थापन केले आणि पुढे इ.स. १४९०च्या सुमारास बहामनी राज्याचे तुकडे होऊन पुणे प्रांत अहमदनगरच्या निजामशाहीत गेले. या राजकीय धुमश्चक्रीतही पुण्याची ज्ञानपरंपरा अखंड सुरू होती, याचा एक पुरावा इ.स. १५१०च्या सुमारास मिळतो. बंगालचे प्रसिद्ध संत चैतन्य महाप्रभू भारतभ्रमण करत पुण्यात आले होते; त्यांच्यासोबत असलेल्या गोविंददास नावाच्या शिष्याने आपल्या ‘गोविन्दासेर कडचा’ या ग्रंथात पुण्याचा उल्लेख ‘पूर्णनगर’ असा केला आहे. ते लिहितात की, या पूर्णनगरात अनेक लोक विद्येत अत्यंत निपुण असून शेकडो पाठशाळांतून (चतुष्पाटीमध्ये) भागवताचे अध्ययन चालते; ज्याला भागवत येत नाही, त्याला इथले लोक पंडित मानतच नाहीत! म्हणजे सोळाव्या शतकापूर्वीपासूनच पुणेकरांचा बौद्धिक आणि शैक्षणिक निकष किती कडक होता, हे या बंगालच्या व्यक्तीनेही नोंदवून ठेवले आहे. याच निजामशाहीच्या काळात पुण्यात तीन नवीन पेठा वसल्या - पहिल्या मूर्तिजा निजामशहाच्या काळात (इ.स.१५६५-१५८६) नदीकाठी वसलेली मूर्तिजाबाद पेठ (पुढची शनिवार पेठ), प्राचीन नागेश्वर मंदिराजवळ वसलेली शाहपूर पेठ (पुढची सोमवार पेठ) आणि सतराव्या शतकाच्या आरंभी मलिक अंबरने वसवलेली मलकापूर पेठ (पुढची रविवार पेठ). मुठा आणि नागझरीच्या तीरावर बहरलेली ही वस्ती पाहिली की, इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणेच पुण्याची संस्कृतीही अस्सल नदीकाठची संस्कृती होती याचा प्रत्यय येतो.
जहागीर शाहजीराजांची
पुण्याच्या इतिहासाला खरी कलाटणी मिळाली ती भोसले घराण्याच्या प्रवेशाने. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे आणि विठोजीराजे यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर निजामशाहाकडून पुणे व सुपे परगण्यांची जहागिरी मिळवली. मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत धारातीर्थी पडल्यानंतर शाहजीराजांनी निजामशाहीची धुरा सांभाळली आणि इ.स.१६२०-२४ या काळात मलिक अंबरच्या खांद्याला खांदा लावून मुघलांशी गनिमी काव्याने लढा दिला. याच संघर्षात विजापूरच्या आदिलशाहाने पुणे परगणा जिंकून तिथे रायाराव नावाच्या सरदाराला नेमले होते; परंतु शाहजीराजांनी रायारावाचा पराभव करून पुणे परत जिंकले आणि मलिक अंबरने त्यांना पुणे व शिरवळ परगण्यांचा मोकासा दिला.
शाहजीराजांचे पुण्यावर अतिशय प्रेम होते, हे आपल्याला त्यांची संपूर्ण कारकीर्द पाहिल्यानंतर ध्यानात येते. शाहजीराजांकडे साधारण इ.स.१६२३पासून पुणे, सुपे, चाकण, शिरवळ व इंदापूर असे परगणे होते. इ.स. १६२४ ते १६३६पर्यंतच्या बारा वर्षांच्या काळात दख्खनच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. मलिक अंबरशी वितुष्ट आल्याने शाहजीराजे इ.स. १६२५मध्ये आदिलशाहीत गेले, १६२८मध्ये पुन्हा निजामशाहीत परतले, १६२९मध्ये सासरे लखुजी जाधवरावांच्या खुनानंतर निजामशाही सोडून स्वतंत्र झाले, दरम्यान काही काळ (१६३० ते १६३२) मुघलांकडे गेले, पुढे पेमगिरीला स्वतःची स्वतंत्र निजामशाही (१६३३ ते १६३६) उभी करून मुघल व आदिलशाहीच्या संयुक्त फौजांशी तीन-चार वर्षे एकाकी झुंज दिली आणि अखेर १६३६मध्ये निजामशाहीचा अस्त झाल्यावर आदिलशाहीत रुजू झाले. या बारा वर्षांत शाहजीराजांनी अनेक वेळा शाह्या बदलल्या, परंतु प्रत्येक वेळी केवळ स्वतःच्या अद्वितीय पराक्रमाच्या आणि दबदब्याच्या जोरावर त्यांनी आपला लाडका ‘पुणे परगणा’ स्वतःकडेच राहील याची कसोशीने काळजी घेतली. इतकेच काय, इ.स. १६३६मध्ये आदिलशहाने शाहजीराजांसारख्या महत्त्वाकांक्षी सरदाराला महाराष्ट्रात ठेवणे धोक्याचे वाटून बंगळूरची जहागीर देऊन दूर कर्नाटकात पाठवले.
मात्र या संघर्षाच्या काळात पुण्याला एका भयंकर महासंकटातून जावे लागले. शाहजीराजांना धडा शिकवण्यासाठी आदिलशाही सरदार मुरार जगदेव पंडित याने इ.स. १६३०-३१च्या सुमारास पुण्यावर क्रूर हल्ला चढवला. त्याने पुण्याचा जुना कोट बराचसा पाडून टाकला, प्रचंड लुटालूट, जाळपोळ आणि कत्तल केली. तरीही या माणसाचे समाधान झाले नाही; पुणे हे आक्काबाईच्या फेऱ्यात सापडलेले शापित गाव आहे हे दाखवण्यासाठी आणि तिथे पुन्हा कोणीही पाऊल ठेवू नये म्हणून त्याने चक्क अख्ख्या गावावरून गाढवाचा नांगर फिरवला आणि एक लोखंडी पहार जमिनीत खुपसून ठेवली! ‘पुन्हा याल तर याद राखा’ असाच तो निर्वाणीचा इशारा होता. त्यातच भर म्हणून की काय, इ.स. १६३०चा भीषण दुष्काळ पडला. अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटांनी घायाळ झालेले पुणे इ.स. १६३०पासून १६३७पर्यंत पूर्णपणे निर्मनुष्य, ओसाड आणि वैराण पडले होते. लोकांचे मनोधैर्य इतके खचले होते की, आता पुणे हे नाव फक्त इतिहासाच्या पानांतच उरते की काय, अशी भीती निर्माण झाली होती.
सोन्याचा फाळ
फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेणे हेच पुण्याचे प्राक्तन होते. शाहजीराजांना रणदुल्लाखानासोबत कर्नाटकच्या मोहिमेवर जावे लागल्याने त्यांनी पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी आपल्या पत्नी राजमाता जिजाबाई व धाकटे पुत्र बालशिवाजी यांना पुण्यात पाठवले. सुरुवातीला पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त असल्यामुळे जिजाऊ व शिवरायांची तात्पुरती सोय पुण्याजवळील कसबे खेड (खेड-शिवापूर) येथील वाड्यात करण्यात आली होती. पुण्यात पाऊल ठेवताच जिजाऊसाहेब व बालशिवाजीराजे यांच्यासमोर काय शिल्लक होते? तर गाढवाचा नांगर फिरलेले ओसाड गाव, मोडलेल्या बाजारपेठा आणि जमिनीत पुरलेली ती अशुभ लोखंडी पहार! मुरारपंताने गाढवाचा नांगर फिरवल्यामुळे पुणे हे भूतपिशाच्चांनी झपाटलेले गाव आहे, अशी भीती लोकांच्या मनात घर करून बसली होती. जिजाऊंनी धार्मिक विधी केले आणि त्यानंतर एका नांगराला दोन पांढरेशुभ्र बैल जोडून व त्याला चक्क सोन्याचा फाळ लावून पुण्याची जमीन पद्धतशीरपणे नांगरून काढली. या उपायाने जादू केली; लोकांच्या मनातील अंधार मिटला आणि आता पुण्यात काम सुरू झाले आहे असा विश्वास निर्माण झाला. केवळ धार्मिक विधी करून भागणार नव्हते, तर पोटापाण्याची सोय लावणे गरजेचे होते. जिजाऊंनी परागंदा झालेले गावचे पाटील, शेतकरी, कामगार यांना परत बोलावून घेतले. रयतेला अभयाचा कौल दिला, शेतीसाठी काही वर्षे सारामाफी जाहीर केली. अशा अनेक सुधारणांमुळे अवघ्या काही वर्षांत पुणे हे एक समृद्ध गाव बनले.
शिवरायांचा पदस्पर्श लाभलेला लाल महाल
पुण्यातील रहिवाशांना कायमस्वरूपी सुरक्षिततेचा विश्वास वाटावा, यासाठी जिजाबाईसाहेबांनी स्वतः पुण्यातच वाडा बांधून राहायचे ठरवले. यासाठी कसब्याच्या पश्चिमेला, बाह्य कोटाच्या अवशेषांपलीकडे असलेली झांबरे पाटील यांच्या वाड्याची जागा निवडण्यात आली. झांबरे पाटलांनी मोठ्या आनंदाने आपली जागा शाहजीराजांना दिली आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना कोटाबाहेर पूर्वेला नागझरीच्या काठी केदारवेस दरवाजाजवळची बागायती जमीन देण्यात आली. या जागेवर भव्य ‘लाल महाल’ बांधण्यात आला. यात शिवाजीराजांसाठी पूर्वाभिमुख महाल व त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यासाठी उत्तराभिमुख महाल असे दोन स्वतंत्र महाल होते; शिवाय भव्य राजसदर, कारंजी, पागा, गोशाळा, शिलेखाना, कचेरी, दप्तरखाना, धान्याची कोठारे आणि विहिरी असा सारा शाही थाट होता. पुढे इ.स.१७०२-०३मध्ये मुघल बादशहा औरंगजेब पुण्यात तळ ठोकून बसला होता, तेव्हा त्याने लाल महाल उद्ध्वस्त केला. त्यानंतर इ.स.१७३०च्या सुमारास थोरले बाजीराव पेशवे पुण्यात स्थायिक झाले; तेव्हा पुन्हा एकदा पुणे सत्तेच्या केंद्रस्थानी आले.
अष्टपैलू आणि अठरापगड घराणी
शिवकाळात पुण्याची जी सांस्कृतिक आणि सामाजिक वीण गुंफली गेली, तिने पुण्याला खऱ्या अर्थाने ‘सांस्कृतिक पुणे’ बनवले. बालशिवाजीराजे आणि जिजाऊसाहेब पुण्यात आले, तेव्हा कसब्यात राहणाऱ्या विनायकभट ठकार यांच्या घराजवळ गणपतीचे एक छोटे मंदिर होते. निजामशाहीच्या काळातही इ.स.१६१३-१४मध्ये हैबतखानाने या देवळाला देणगी दिल्याचे व १६१९मध्ये मलिक अंबरने ती कायम केल्याचे द्वैभाषिक फर्मान इतिहाससंशोधक निनाद बेडेकर यांनी शोधून काढले होते. जिजाबाईसाहेबांनी येथे दगडी देवालय बांधून त्याचा जीर्णोद्धार केला. आज पुण्याचे ग्रामदैवत असलेला ‘कसबा गणपती’ आणि काळ्या वावरात झाडाखाली उभी असलेली ग्रामदेवता ‘तांबडी जोगेश्वरी’ यांनी पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा श्रीगणेशा केला.
याच काळात कसबा पेठेत आणि आजूबाजूला जी प्रतिष्ठीत घराणी व कुटुंबे स्थायिक झाली, त्यांनी पुण्याच्या वैभवात मोलाची भर घातली. यामध्ये शिवपूर्वकाळापासून पुण्याचे देशमुख असलेले ‘शितोळे देशमुख’ हे प्रमुख होते. तसेच झांबरे पाटील, निरगुडकर, धडफळे, धर्माधिकारी, होनप, ठकार यांसारख्या अनेक कुटुंबांनी गावगाड्याचा कणा मजबूत केला. त्याचसोबत पुण्याच्या बौद्धिक व धार्मिक परंपरेचा पाया रचला तो कसब्यातील प्रसिद्ध ‘आठघरे’ (आठ घराणी) यांनी! ढेरे, शाळिग्राम, कानडे, वैद्य, कवलंगे (कलंगे), निलंगे, भाराईत आणि ढेकणे ही ती आठ घराणी होत. या घराण्यांसोबतच कुंभार, परीट, सुतार, नाभिक, चर्मकार, कासार, माळी अशा अठरापगड जातींच्या कष्टकरी व कारागीर कुटुंबांनी कसब्यात आणि पेठांमध्ये आपली घरे उभारली.
स्वराज्याचे केंद्रस्थान
दादाजी कोंडदेवांचे इ.स.१६४७ मध्ये निधन झाल्यानंतर शिवरायांनी पुण्याला आपल्या स्वराज्यस्थापनेच्या उपक्रमाचा मुख्य तळ बनवले. पुण्याच्या परिघात असलेले कोंढाणा, पुरंदर, राजगड, तोरणा हे अभेद्य डोंगरी किल्ले ताब्यात घेतले. पुढे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी आपला मुक्काम पुरंदर व नंतर राजगडावर हलवला. पुण्याचे नशीब असे की, इथे रक्ताचे पाट वाहवयास आलेल्या परकीय शत्रूंनीही नकळत पुण्याच्या नागरी विस्तारात भरच घातली. इ.स.१६६०मध्ये मुघल सरदार शायिस्ताखान स्वारीवर आला आणि त्याने लाल महालात तळ ठोकला. नागझरीच्या दोन्ही तीरांवर पसरलेल्या त्याच्या अवाढव्य फौजेच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पुण्याच्या जुन्या पेठा अपुऱ्या पडू लागल्या. तेव्हा खानाने आपल्या छावणीतच व्यापाऱ्यांना अभय देऊन एक नवीन पेठ वसविली; तिलाच ‘शास्तापुरा’ (अष्टापुरा) म्हणजेच आजची ‘मंगळवार पेठ’ म्हटले जाऊ लागले. एप्रिल १६६३च्या एका रात्री शिवरायांनी निवडक मावळ्यांसह लाल महालात घुसून शायिस्ताखानाची बोटे छाटली; याने घाबरलेला खान पुण्यातून पळाला तो कायमचाच.
पुढे इ.स.१७०३ मध्ये सिंहगड जिंकल्यावर औरंगजेब विश्रांतीसाठी पुण्यात आजच्या भवानी पेठेच्या जागी असलेल्या बोरवनात तंबू ठोकून राहिला होता. तिथेच त्याचा लाडका दहा वर्षांचा नातू, म्हणजेच कामबक्षाचा मुलगा मुहम्मद मोहिउल्-मिलात याचा मृत्यू झाला. त्याला धाकट्या शेखसल्ला दर्ग्याजवळ दफन करण्यात आले. या नातवाच्या स्मरणार्थ औरंगजेबाने पुण्याचे नाव बदलून ‘मुहियाबाद’ ठेवले आणि मूर्तजाबादच्या दक्षिणेला एक नवीन पेठ वसविली, जी ‘पेठ मुहियाबाद’ आणि पुढे पेशवेकाळात ‘बुधवार पेठ’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
अर्थात, पुण्याचे नाव ‘मुहियाबाद’ ठेवणाऱ्या औरंगजेबाचे मराठ्यांचे स्वराज्य संपवण्याचे स्वप्न याच मातीत गाडले गेले आणि १७०७मध्ये त्याचा दख्खनेतच अंत झाला. तोपर्यंत सतराव्या शतकाच्या अखेरीस कसबा आणि पाच पेठा मिळून पुण्याची लोकसंख्या दहा हजारांच्या घरात पोहोचली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही काळ निजाम-उल-मुल्कचा सरदार रंभाजी निंबाळकर याचा पुण्यावर अंमल होता. परंतु ज्या बाळाजी विश्वनाथ यांनी इ.स. १६९९मध्ये महाराणी ताराबाई यांचे आज्ञेने पुणे प्रांताचे सुभेदार म्हणून काम पाहिले होते, त्यांनीच पुढे छत्रपती शाहू महाराजांचे पेशवे झाल्यावर इ.स. १७१५मध्ये आपले अधिकारी वाकोजी ढमढेरे यांना फौजेसह पाठवून पुणे स्वतःच्या ताब्यात आणले. शाहजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांनी घातलेल्या या भक्कम पायावरच पुढे पेशवेकाळात पुण्याचे रूपांतर एका अवाढव्य आणि वैभवशाली राजधानीच्या नगरात झाले.
प्रबोधनाचे रणमैदान
इतिहासाची चक्रे फिरली आणि पेशवाईच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी शनिवारवाड्यावरील मराठेशाहीचा झेंडा खाली उतरवून तिथे युनियन जॅक फडकवला. पुण्याच्या पाडावानंतरच ब्रिटिशांना दख्खनची किल्ली आणि पर्यायाने अख्खा हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेता आला. आश्चर्याची गोष्ट अशी की, राजकीय सत्ता गेल्यानंतरही पुण्याचे महत्त्व तसूभरही कमी झाले नाही; उलट ते अधिकच वाढत गेले! तलवारीची जागा आता लेखणीने आणि वैचारिक लढ्याने घेतली. परकीय राज्यकर्त्यांशी राजकीय संघर्ष करायचा असो वा स्वतःच्या समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणायच्या असोत, पुणेकरांनी पुरोगामित्वाचा वसा घेत आधुनिक भारताच्या जडणघडणीचे नेतृत्व केले.
स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे ही अक्षरशः राष्ट्रपुरुषांची खाण आणि विद्येचे माहेरघर बनली. महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातच स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महाराष्ट्रातील पहिली महिला पदवीधर कॉर्नेलिया सोराबजी ही पुण्यातलीच! पुण्याला आधुनिक पुणेपण देणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, भारतीय असंतोषाचे जनक हे बिरुद सार्थ ठरवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ‘देव न मानणारा देवमाणूस’ म्हणून ओळखले जाणारे प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी गोपाळ गणेश आगरकर, आपल्या इंग्रजी भाषापटुत्वाने आणि नैतिकतेने ब्रिटिशांनाही धाक दाखवणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि स्त्रियांच्या अस्मितेचा आदर करत निष्ठेने स्त्री-शिक्षण संस्था उभारणारे महर्षी धोंडो केशव कर्वे या सर्व महापुरुषांची कर्मभूमी पुणेच होती.
त्या काळातील पुण्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच वेळी परस्परविरोधी विचारांचे प्रचंड रणकंदन माजत असे. अगदी राजकीय जहाल-मवाळवादापासून ते स्त्रियांनी साडी कशी नेसावी, म्हणजे नऊवारी सकच्छ की पाचवारी विकच्छ या सांस्कृतिक वादापर्यंत सारे संघर्ष पुण्याच्याच पारावर आणि सभागृहांत झडले! सनातनी धर्ममार्तंडांपासून ते कट्टर बुद्धिप्रामाण्यवाद्यांपर्यंत, ब्रिटिश सत्तेला ‘दैवी संकेत’ मानणाऱ्यांपासून ते हातात पिस्तूल घेणाऱ्या क्रांतिकारकांपर्यंत आणि अश्लीलमार्तंडांपासून ते संततीनियमनाच्या साधनांचा उघड प्रचार करणाऱ्यांपर्यंत सर्व टोकाच्या विचारांची माणसे पुण्यात एकाच वेळी सुखनैव संचार करत होती. पुण्यातच इतकी भांडणे आणि वाद का होतात? यावर न्यायमूर्ती रानडे यांनी १९१५मध्ये फार मार्मिक उत्तर दिले होते; ते म्हणाले होते, ‘‘भूतकाळाशी आणि समाजाशी नाते न तोडता एकाच दिशेने काम करण्याऐवजी एकाच वेळी अनेक दिशांनी सुधारणा करण्याची आमची वृत्ती आहे, आणि त्यात वैयक्तिक मतभेदांची भर पडल्याने इतरत्र कुठेही न दिसणारे वाद आपल्या या लाडक्या पुण्यात पाहायला मिळतात.’’ या वैचारिक घुसळणीतूनच पुण्यात एका आधुनिक संस्कृतीचा जन्म झाला. मार्गारेट कझिन्स या परदेशी महिलेने १९४१मध्ये आपल्या ‘इंडियन वूमनहूड टुडे’ या पुस्तकात भारतीय स्त्रीला ‘चूल आणि मूल’ या जोखडातून मुक्त करणारे क्रांतिकारी साधन म्हणून पुणेकर युवतींच्या या सायकलचा विशेषत्वाने गौरव केला होता.
पुण्याच्या भविष्याचा आरसा
हे झाले पुण्याच्या गौरवशाली इतिहासाबद्दल. पुण्याच्या इतिहासाबद्दल आजवर अनेकजण बोलले आहेत, अनेकांनी लिहिले आहे; परंतु आता वेळ आली आहे ती पुण्याच्या सांस्कृतिक भविष्यासमोर एक आरसा धरण्याची. आज कोणाही जुन्या, जाणत्या पुणेकराला भेटा; त्याच्या तोंडून पहिला शब्द बाहेर पडतो तो म्हणजे, ‘पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही.’
अलीकडच्या काळापर्यंत अस्सल पुणेकर मोठ्या तोऱ्यात सांगायचे की, ‘पुण्यात मुंबईच्या सर्व सोयी-सुविधा आहेत, परंतु मुंबईच्या गैरसोयी मात्र अजिबात नाहीत!’ तथापि आज आपल्या हृदयावर हात ठेवून सांगा, हे विधान आपण करू शकतो का? मुंबई-पुणे या जोडगोळीतील मुंबईने केवळ आर्थिक संपन्नतेचा आणि लक्ष्मीपती होण्याचा हव्यास धरला; त्यामुळे देशा-परदेशांतून तिथे येणाऱ्या माणसांचे लोंढे थांबायलाच तयार नाहीत. या अतिरेकी धनलोभापायी मोहमयी मुंबईची वाटचाल बघता बघता भयंकर बकालपणाकडे झाली. एका बाजूला गगनचुंबी संपन्नतेचे दर्शन, तर दुसऱ्या बाजूला काळजाला घरे पाडणाऱ्या विपन्नतेचे आणि झोपडपट्यांचे साम्राज्य! जेव्हा शहरातील जीवन-संघर्ष आणि सामाजिक ताण-तणाव शिगेला पोहोचतात, तेव्हा तिथला माणूस नागरिकशास्त्राची मूलतत्त्वेच (सिव्हिक सेन्स) विसरून जातो आणि शहराच्या सांस्कृतिक जीवनात एक भयाण खुरटेपण येते.
आज आपले सांस्कृतिक संचित लाभलेले पुणेही दुर्दैवाने मुंबईच्याच या विनाशकारी वाटेने सुसाट निघाले आहे का, असा गंभीर प्रश्न पडतो. झपाट्याने होणाऱ्या औद्योगिक आणि आयटी क्षेत्राच्या प्रगतीने पुण्याचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आहे. ज्या आंबिल ओढ्यावर शिवकाळात पहिले धरण बांधून बागायती फुलवली, ज्या मुठा आणि नागझरीच्या काठावर पुण्याची नदीकाठची संस्कृती जन्माला आली, त्या नद्या आणि ओढे आज सांडपाण्याचे आणि काँक्रीटचे गटार बनले आहेत. ज्या कसब्यात आणि पेठांमध्ये अठरापगड जाती आणि विद्वान पंडित गुण्यागोविंदाने नांदले, तिथले ऐतिहासिक वाडे आणि वारसास्थळे आज बिल्डरांच्या हातोड्याखाली आणि ट्रॅफिकच्या कर्कश हॉर्नखाली गुदमरत आहेत. एकेकाळी मुलींच्या सायकलने स्त्री-स्वातंत्र्याची क्रांती घडविणाऱ्या या शहरात आज फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यालाही बेशिस्त दुचाकीस्वारांच्या अरेरावीने जीव मुठीत धरून चालावे लागते, तेव्हा आपल्यातील नागरिकशास्त्राची मूलतत्त्वेही मुंबईसारखीच विस्मृतीत गेली आहेत हे मान्य करावेच लागते. याशिवाय भारतातील इतर महानगरांप्रमाणेच पुण्यालाही वाहतूक, पायाभूत सुविधा, गुन्हेगारी, नदी-वायू व ध्वनी प्रदूषण यांसारख्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत.
मग पुण्याचे सांस्कृतिक भविष्य वाचवायचे कसे? इटालियन विचारवंत अन्तोनिओ ग्रामची याने म्हटल्याप्रमाणे इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नसून तो ‘तळागाळाचा इतिहास’ (History from below) आणि ‘स्थानीय इतिहास’ (Local history) असतो. एखाद्या शहरातील नव्या पिढ्यांना आणि तिथे नव्याने वास्तव्यास आलेल्या लोंढ्यांना त्या शहराच्या जडणघडणीचा, तिथल्या मातीसाठी सोसलेल्या कष्टांचा आणि पूर्वजांच्या त्यागाचा इतिहास सतत सांगितला जातो, तेव्हाच त्यांच्या मनात शहराबद्दल खरी आत्मीयता निर्माण होते. आपल्या शहराची ही ऐतिहासिक ओळख आणि जुन्या आठवणी जपल्या गेल्या, तरच उद्याचे नागरिक या शहराला विद्रूप करण्याचे अपकृत्य करणार नाहीत आणि शहरातील बहुभाषिक, बहुधर्मीय समाजांचे सामंजस्य अबाधित राहील.
मुरार जगदेवाच्या गाढवाच्या नांगराने आणि मुघलांच्या तोफांनी जे पुणे कधीच नष्ट झाले नाही, ते पुणे आपल्याच बकाल शहरीकरणाच्या, सांस्कृतिक उदासीनतेच्या आणि धनलोभाच्या नांगराखाली उद्ध्वस्त होऊ नये, हीच आजच्या दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक पुणेकराने घ्यायची शपथ आहे. पुण्याला केवळ सिमेंटचे महानगर न बनवता पुन्हा एकदा विवेकाचे, संस्कृतीचे आणि प्रबोधनाचे ‘पूर्णनगर’ बनवणे, हेच आपल्या ऐतिहासिक वारशाचे खरे पांग फेडणे ठरेल!
संदर्भ :
(१) शहर पुणे : एका सांस्कृतिक संचिताचा मागोवा... (खंड १ व २), संपादक श्री. अरुण टिकेकर.
(२) पुणे शहराचा इतिहास (प्राचीन काळ ते पेशवाई अखेर), डॉ. अविनाश सोवनी.
(३) गॅझेटिअर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी, पुना. १८८५.
(लेखक ‘फोर्टस् अँड पॅलेसेस इन इंडिया’ या भारतातील चार हजार किल्ल्यांवरील ग्रंथांचे सहलेखक, आझादी के दिवाने, डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर स्मारक ग्रंथ व समग्र प्रमोद मांडे यांचे ग्रंथांचे संपादक, तसेच इतिहासाचे अभ्यासक व वक्ते आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.