पुणे, ता. ९ : औंध जिल्हा रुग्णालयातील कोरोना काळात उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) साहित्याची आणि कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी याप्रकरणी सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.
तीनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयात १२ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर आहे. मात्र, कोरोना काळात शासनाने निधी उपलब्ध करत या ठिकाणी ५० खाटांचा आधुनिक अतिदक्षता विभाग उभारला होता. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यासंदर्भात आरोग्य कार्यकर्ते शरत शेट्टी यांनी २७ जुलैला तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, या ५० खाटांपैकी सध्या केवळ काहीच खाटा कार्यरत आहेत. उर्वरित आधुनिक उपकरणे, व्हेंटिलेटर, मॉनिटर्स, ऑक्सिजन व्यवस्था आणि इतर महागडे साहित्य नेमके कोठे आहे आणि त्याचा वापर कोण करत आहे, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. या गंभीर तक्रारीची दखल घेत आरोग्य विभागाने आता चौकशीचा बडगा उगारला आहे.
याप्रकरणी तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून सर्व उपकरणांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. खर्चाचा लेखाजोखा सार्वजनिक करून हा विभाग निष्क्रिय ठेवण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग किंवा गरज पडल्यास फौजदारी कारवाई करावी. तसेच आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून हा विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करावा, असेही निर्देशात म्हटले आहे.
सखोल चौकशीचे निर्देश
उपसंचालक डॉ. पवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक पुराव्यांसह आणि कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अभिप्राय सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या चौकशीत दिरंगाई झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची राहील, असा इशाराही पत्राद्वारे दिला आहे. या चौकशीमुळे आरोग्य विभागातील गैरव्यवहाराचे प्रकरण चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोना साथीच्या काळात शासनाने निधी उपलब्ध करत या ठिकाणी ५० खाटांचा अतिदक्षता विभाग उभारला होता. मात्र, ते साहित्य सध्या गायब असून त्याबाबत चौकशी करण्यात यावी याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना तसेच आरोग्य उपसंचालकांना दिले आहे. त्यानुसार आरोग्य उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. आता निष्पक्षपणे चौकशी होणे गरजेचे आहे.
- शरत शेट्टी, आरोग्य हक्क कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.