सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २८ : पुणे शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित अंतर्गत (इनर) रिंगरोडच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
इनर रिंगरोडच्या अनुषंगाने शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त पुनम मेहता यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, संबंधित अभियंते, मोनार्च कन्सल्टंटचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत इनर रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची उपलब्धता, भूसंपादनाची सद्यस्थिती, संबंधित जमीनमालक, उपलब्ध शासकीय जमीन, भूसंपादनासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी म्हणाले...
- भूसंपादन प्रक्रियेत विविध स्तरांवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा विभागनिहाय आढावा घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी.
- संबंधित विभागांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ३१ ऑगस्टपर्यंत भूसंपादनाची प्रकरणे जिल्हा प्रशासनाकडे सादर करावीत.
- त्यानंतर संबंधित जमिनींची प्रत्यक्ष मोजणी, नकाशे व अन्य तांत्रिक बाबींची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत मोजणीची कार्यवाही सुरू करावी.
- मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित जागांच्या बाजारमूल्य व दर निश्चितीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत संबंधित विभागांची बैठक होईल. त्यादृष्टीने आवश्यक माहिती व प्रस्ताव तयार ठेवावेत.
भूसंपादनासाठी विलंब टाळा
इनर रिंगरोडच्या भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. येणाऱ्या अडचणींचे विभागीय पातळीवर निराकरण करून आवश्यक बाबी वरिष्ठ स्तरावर तातडीने निदर्शनास आणाव्यात. कालबद्ध नियोजनामुळे इनर रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला गती मिळून प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामकाजासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.