Municipal officials carry out an encroachment drive along Laxmi Road in Pune.

 

esakal

पुणे

Pune News: अतिक्रमण कारवाईला हरताळ ,केवळ फलकच हटविले ,व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर पालिकेची माघार

Pune Encroachment Drive : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर अतिक्रमण कारवाईदरम्यान ४० ते ५० दुकानांच्या दर्शनी भागांची तोडफोड झाल्याने व्यापारी आक्रमक झाले. महापौरांनी कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुकानांसमोरील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले. मात्र, आयुक्तांच्या आदेशाचा उद्देश बाजूला ठेवून विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय आणि आकाशचिन्ह विभागाने लक्ष्मी रस्त्यावरील केवळ दुकानांच्या फलकांवरच कारवाईचा दिखावा केला. वाहतुकीला अडथळा नसलेल्या सुमारे ४० ते ५० दुकानांच्या दर्शनी भागांची तोडफोड करण्यात आल्याने व्यापारी आक्रमक झाले. त्यांच्या विरोधामुळे प्रशासनाला अखेर कारवाई अर्धवट सोडावी लागली.

रस्ते, पादचारी मार्ग, फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन, रहदारीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी सांगितले होते. आयुक्तांचे आदेशही त्याबाबत एकदम स्पष्ट होते. पण दुकानांच्या नामफलकांवर कारवाई करून व्यापाऱ्यांना त्रास देणे योग्य नाही. या चुकीच्या कारवाईमुळे संबंधितांवर आयुक्त कारवाई करतील. अतिक्रमणांवर कारवाई सुरूच राहील.

- मंजूषा नागपुरे, महापौर

१६ ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शुक्रवारी शहरातील १६ ठिकाणी अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यात औंध-बाणेर, कोंढवा-उंड्री, छत्रपती शिवाजीनगर-घोले रस्ता, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, बिबवेवाडी, वानवडी, वारजे-कर्वेनगर आणि हडपसर-मांजरी या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने करिश्मा सोसायटी, जी. ए. कुलकर्णी पथ, सिटी प्राइड कोथरूड, शाहू कॉलनी आणि स्पेन्सर चौक परिसरात कारवाई केली. यात अनधिकृत हॉटेल, दुकाने, शेड, काउंटर, ओटे आणि कट्टे हटविण्यात आले. घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने कुसाळकर चौकात कारवाई केली. धनकवडी-कात्रज-आंबेगाव परिसरात फळपथारी, नाश्त्याचे टेबल आणि शेड हटविण्यात आले. अन्य क्षेत्रीय कार्यालयांनीही रस्ते, पदपथ आणि इमारतींच्या फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणांवर कारवाई केली.

व्यापाऱ्यांना आठ दिवसांची मुदत

शनिवारवाडा ते बेलबाग चौक आणि बेलबाग चौक ते गणपती चौक यादरम्यान विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, आकाशचिन्ह विभाग आणि बांधकाम विभागाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत चार शेड हटविण्यात आली. आकाशचिन्ह विभागाने तीन-चार फूट बाहेर आलेले दुकानांचे नामफलक काढले, तर बांधकाम विभागाने तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामे हटविली. व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे कारवाई थांबविण्यात आलेली नाही. नामफलक स्वतःहून काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे मुदत देण्यात आली आहे. आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी उद्यापासून प्रत्येक दुकानात जाऊन पाहणी करतील आणि दुकानांची माहिती संकलित करतील, अशी माहिती विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांनी दिली.

Maharashtra: ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन; प्रशासकीय यंत्रणेवर वॉच, मंत्र्यांना उपस्थिती बंधनकारक

Petrol-Diesel Price: पेट्रोलवर 3 रुपये, तर डिझेलवर तब्बल 25 रुपयांचा तोटा! 21 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर; 1 लिटर कितीला?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण! 18 कॅरेट 93 हजारांवर

IND vs NZ, 1st Test: केएल राहुलने १३६ धावा करत गावसकरांचा ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, पण गौतम गंभीरपासून एक रन दूर राहिला!

Rajasthan Panchayat Election Results : राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा दारूण पराभव; काँग्रेसची मोठी आघाडी; मंत्र्यांच्या मतदारसंघांतही धक्का

SCROLL FOR NEXT