पुणे, ता. २ ः पुणे महापालिकेचा डोलारा सांभाळताना प्रशासन, नगरसेवकांच्या नाकी नऊ येत आहे, अशी स्थिती असताना पुणे महापालिकेचे सत्ताधारी आणि प्रशासनातील अधिकारी हे वेगवेगळ्या शासकीय परदेश दौऱ्यांवर गेले आहेत. महापालिकेला तीन दिवस सुट्टी असली तरी एकही प्रमुख अधिकारी व पदाधिकारी शहरात नसल्याने महापालिकेचा कारभार रामभरोसे आहे. चुकून अप्रिय आपत्कालीन घटना घडली तर जबाबदारी कोण घेणार, अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
पुणे महापालिकेत एक आयुक्त आणि तीन अतिरिक्त आयुक्त आहेत. तर पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी आहेत. पुणे आणि जपानमधील ओकायमा शहर यांच्या मैत्रीला २० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ओकायमा शहरातर्फे पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना भेटीचे निमंत्रण आले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात महापौर मंजूषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पीएमपीचे संचालक अजय खेडेकर, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर हे शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा रविवारी संपणार आहे.
त्याच दरम्यान आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर हे गुरुवारी (ता. १) जर्मनी दौऱ्यावर गेले आहेत. ते पुढील १० दिवस दौऱ्यावर असणार आहेत. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे हे वैयक्तिक कारणास्तव रजेवर आहेत.
पुणे महापालिकेला सलग तीन दिवस शुक्रवार (ता. २), शनिवार (ता. ३) आणि रविवार (ता. ४) अशा सुट्ट्या आल्याने महापालिकेचे कामकाज बंद आहे पण अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहावे लागते.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांवरही ताण येत आहे. त्याच प्रमाणे अचानक उद्भवलेल्या आणीबाणीच्या स्थितीत प्रशासनाला आदेश देऊ शकणारे महापालिकेतील प्रमुख अधिकारी, महापौर व स्थायी समिती अध्यक्ष हे देशाबाहेर आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या दुर्दैवाने चुकीची घटना घडल्यास अशा वेळी यावर नियंत्रण कोण ठेवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आयुक्त राम यांनी त्यांचा कार्यभार कोणत्याही अधिकाऱ्याकडे सुपूर्त केलेला नाही.
एकच अतिरिक्त आयुक्त कार्यरत
महापालिकेतील सर्व प्रमुख अधिकारी शासकीय किंवा वैयक्तिक दौऱ्यावर आहेत. अतिरिक्त आयुक्त नायर हे सोमवारपासून सेवेत पुन्हा रुजू होणार आहेत. पुढील आठवडाभर त्यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार असण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित दोन अतिरिक्त आयुक्तांच्या खात्याचीही जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.
‘‘शासकीय दौऱ्यानिमित्त महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. आमच्यातील सामंजस्याने मी पुण्यात थांबण्याचे ठरले होते. काही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास प्रशासनाकडून कामे करून घेतली जातील.’’
- गणेश बिडकर, सभागृहनेते, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.