पुणे, ता. ३१ ः ‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेचा मॉडेल स्कूल प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहे. समूह शाळांच्या माध्यमातून हा उपक्रम केवळ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता, राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे काम उभे करा,’’ असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी केले.
देओल यांनी हवेली तालुक्यातील लोणीकंद आणि पुरंदर तालुक्यातील खानवडी व सोनोरी येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. यावेळी डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स, स्किल, एआर-व्हीआर आणि अटल टिंकरिंग लॅबची पाहणी करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनातील वापर, कौशल्याधारित शिक्षण तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.
देओल म्हणाले, ‘‘मॉडेल स्कूल प्रकल्पामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत आहे, ही समाधानाची बाब आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. रोबोटिक्स, स्टेम, स्किल आणि एआर-व्हीआर लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कौशल्ये विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांना नासा, युरोपियन स्पेस सेंटर आणि इस्रोसारख्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळणे, हीदेखील महत्त्वाची बाब आहे. समूह शाळांच्या माध्यमातून उपलब्ध शैक्षणिक संसाधनांचा प्रभावी वापर करून राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल, अशी शिक्षणपद्धती विकसित करावी.’’
या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमोल झेंडे, शिक्षणाधिकारी ललिता दहितुले आणि भाऊसाहेब कारेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.