पुणे, ता. ७ : वर्षानुवर्षे पदोन्नतीसाठी वाट पाहायची, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मागे तगादा लावायचा अन् मोठ्या मेहनतीने पदोन्नती घ्यायची. त्याचा आनंद व्यक्त करतो न करतो तोच यामध्ये नियमांचे उल्लंघन झाले आहे, अशी तक्रार केली जाते. आणि लगेच दोन दिवसांत पदोन्नतीला स्थगिती देण्याचे आदेश काढले जातात. हा प्रकार घडला आहे पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदावरून शाखा अभियंता पदाच्या पदोन्नतीच्या प्रक्रियेत. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यावर भाष्य करण्यासाठी तयार नाहीत.
महापालिकेत १६ हजार ३६९ मंजूर पदांपैकी आठ हजार ३२८ पदे भरलेली असून उर्वरित रिक्त आहेत. वर्ग तीन व चारमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ठरावीक सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर पदोन्नती दिली जाते. अनेक कर्मचारी यासाठी सातत्याने पाठपुरावा करतात. ज्येष्ठता, शासनाचे नियम आणि न्यायालयीन आदेशांचा विचार करून पदोन्नती दिली जाते. मात्र प्रशासनाकडून निर्णयास विलंब होत असल्याने अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेतच निवृत्त होतात. त्यामुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागते.
पुणे महापालिकेत अभियंत्यांची कमतरता असल्याने त्याचा परिणाम विकास कामांसह दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामांवरही होत आहे. त्यासाठी महापालिकेने यापूर्वी १३५ आणि त्यानंतर १४६ कनिष्ठ अभियंत्यांची भरती केली. महापालिकेत शाखा अभियंता पदाच्या संपूर्ण १२७ जागा रिक्त होत्या. त्याचाही परिणाम कामावर होत होता. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ८१ कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता या पदावर पदोन्नती दिली होती. त्यानंतरही जवळपास ४३ जागा रिक्त राहिल्या आहेत.
पदोन्नतीचा प्रवास
- महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ४३ पैकी २५ जागा या पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी २५ कनिष्ठ अभियंत्यांची यादी तयार केली.
- विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत ही यादी मान्य करून त्यांना शाखा अभियंतापदी पदोन्नती देण्याचा निर्णय २२ सप्टेंबरला घेतला होता.
- त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच २४ सप्टेंबरला अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशाने या पदोन्नतीला स्थगिती दिली आहे.
- यासंदर्भात उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार देत अतिरिक्त आयुक्तांकडे विचारणा करा, असे सांगितले.
सामान्य प्रशासन विभागाचा सावळा गोंधळ
महापालिकेच्या हजारो कर्मचारी, अधिकाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या सामान्य प्रशासन विभागात नियमानुसार काम होणे गरजेचे आहे. पण येथे अनेक कर्मचारी हे चुकीचे नियम दाखवून, काही आदेश दडवून ठेवून कामे करत आहेत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची कामे रखडलेली आहेत. त्याचाच प्रत्यय या पदोन्नतीच्या निमित्ताने आला आहे.
अपात्र अभियंत्यांना पदोन्नती
महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार कनिष्ठ अभियंता पदावरून शाखा अभियंता पदावर पदोन्नती हवी असेल, तर तीन वर्षांत किंवा तीन संधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पण महापालिकेने चार वर्षांत तीन संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. त्यास अन्य कनिष्ठ अभियंत्यांनी यांना चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याने आमच्यावर अन्याय होणार आहे, अशी तक्रार आयुक्तांकडे केली. त्यानंतर आयुक्तांनी चुकीच्या पद्धतीने दिलेली पदोन्नती स्थगित करण्याचे आदेश दिले.
‘मेटा’ची परीक्षा देणे अनिवार्य
अभियांत्रिकी क्षेत्रात किंवा शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये पदोन्नतीसाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिकतर्फे (मेटा) पदोन्नतीसाठी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अभियंत्यांचे तांत्रिक ज्ञान, शासकीय अंदाजपत्रके, बिल तयार करणे, कामाचे लेखापरीक्षण, शासकीय नियम आदींबाबत प्रश्न विचारले जातात. पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांना तीन वर्षांत तीन संधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.