पुणे, ता. १५ ः मुळशीतील दुधाळे वस्ती येथील तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह तळ्यात फेकून दिल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी एकाला अटक केली. आरोपीने त्याच्या साथीदारासमवेत लूटमार करण्याच्या उद्देशाने तरुणाचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
गोपाल ऊर्फ राज साधन बिस्वास (वय २०, रा. गाझीपूर, दिल्ली, मूळ रा. बीबीपुली, पश्चिम बंगाल) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह आणखी एकावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महेंद्रकुमार ओमप्रकाश बंजारे (वय २६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची पत्नी सुनीता बंजारे (वय २२, दोघे रा. दुधाळे वस्ती, मूळ रा. देवगाव, छत्तीसगड) हिने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदाराचा पती महेंद्रकुमार ३० ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास घरातून बाहेर पडला. मात्र, तो परत आला नाही. पोलिस त्याचा शोध घेत असताना, दोन सप्टेंबर २०२६ रोजी लवळे येथील शेडगेवस्तीजवळील तळजाईदेवी मंदिराच्या तळ्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या मृतदेहाचे हातपाय टी-शर्टने बांधलेले होते आणि पायाला दगड बांधून तळ्यात टाकल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत आढळली.
लूटमार करण्याच्या उद्देशाने अपहरण ः
आरोपी गोपालने त्याच्या साथीदारासमवेत लूटमार करण्याच्या उद्देशाने महेंद्रकुमारचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा संशय असून, गुन्ह्याचा हेतू तपासायचा आहे, लुटीची रक्कम जप्त करायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील भाग्यश्री डांगळे-संचेती यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.