पुणे

पाणपक्ष्यांचे संमेलन

संदीप जगदाळे

हडपसर - पांढऱ्या मानेला काळ्या पंखांचे आवरण, पाण्यातून वाढ काढत चिटुकल्या चोचीने भक्ष्य टिपणारा शेकाट्या... पाण्यात विहार करताना पंखांवर सूर्यकिरणे पडल्यावर लक्ष वेधून घेणारी चक्रवाक बदके... डोक्‍यावरचा शुभ्र तुरा मिरवत चमच्यासारख्या आकाराची लांबसडक चोच दलदलीत घुसळून मासे टिपणारा चमचा करकोचा आणि आकाशातून पाण्यात ‘लॅंड’ होताना लक्ष वेधून घेणारे गुलाबी-काळ्या पंखाचे चित्रबलाक... थंडीची चाहूल लागताच कवडीपाट येथे मुळा-मुठा नदीपात्रात स्थलांतरित पाणपक्ष्यांचे संमेलन भरले आहे.

पक्ष्यांचे स्थलांतर
कवडी पाट येथे परदेशी स्थलांतरित पक्ष्यांबरोबरच स्थानिक स्थलांतरित (भारतीय) पक्ष्यांमध्ये राखी बदक (स्पॉटबिल्डक), टिबुकली (डॅबचिक), पाणकावळा (लिटल कॉर्मोरेंट), काळा शराटी (ब्लॅक आयबिस), पांढरा शराटी (व्हाइट आयबिस), ताम्र शराटी (ग्लॉसी आयबिस), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क), राखी बगळा (ग्रे हेरॉन), पाणथळ चरचरी (पॅडी फील्ड पिपिट), वंचक (पॉन्ड हेरॉन), मोठा बगळा (लार्ज इग्रेट), गाय बगळा (कॅटल इग्रेट), छोटा बगळा (लिटल इग्रेट), तुतवार (कॉमन सॅंड पायपर), चष्मेवाला प्लवर (लिटल रिंग्ड प्लवर), काजळ घार (ब्लॅक ईअर्ड काईट), जंगल मैना आदी पक्षी दाखल झाले आहेत. 

कवडीच्या नदीकाठावर पोचताच पाखरांच्या कंठातून बरसणारी मधुर व मंजूळ गाणी कानावर येतात. चक्रवाक ‘आँग आँग’ असा आवाज करत असतात. टिटव्यांची ‘टिव टिव’ अखंडपणे सुरू असते. काठावरच्या चिखलात तुरुतुरू चालत कीडे-कीटक टिपणारे शेकाटे ‘पिउ पुउ’ असा गोड सूर आळवतात. धोबी किलकिलाटी तान हवेत सोडून देतो तर काठावरच्या काटेरी वनातून येणारी तांबोल्यांची कर्ण सुखद तान मन उल्हसित करते.

पक्षिप्रेमींना पर्वणी
दिवाळीनंतर रानावनातील हिरवे गवत हळूहळू पिकून पिवळे पडते. अंगाला झोंबणारा वारा गुलाबी थंडी घेऊन येतो. सृष्टी धुक्‍याची तरल चादर पांघरते. हिवाळ्यात लाखोंच्या संख्येने परदेशातील विविध प्रजातींचे पक्षी हिवाळा सुसह्य करण्यासाठी कवडी पाट मुक्कामी दाखल होतात. या पाहुण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी व अभ्यासासाठी पक्षीप्रेमी दुर्बीण, कॅमेरे सरसावून मुळा-मुठा नदीच्या किनारीच्या पाणवठ्यांवर गर्दी करू लागले आहेत. 

स्थलांतर हा पक्षिजीवनातील एक अनाकलनीय अध्याय आहे. पृथ्वीतलावर उत्तर धृवापासून दक्षिण धृवापर्यंत पक्ष्यांची निवासस्थाने आढळतात. मात्र हवामानातील तीव्र बदलामुळे या ठिकाणच्या पक्ष्यांना वर्षातील काही दिवस आपले मूळ वस्तीस्थान सोडून दुसरीकडे स्थलांतर करावे लागते. स्थलांतर करून आलेले हे पक्षी आपल्याकडे कवडी पाटबरोबरच पुण्याजवळील भिगवण, पाषाण तलाव, वीर धरण या परिसरांत पाहायला मिळतात. कवडी पाट येथे सध्या या पाहुण्या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षिप्रेमी गर्दी करत आहेत. 
- विशाल तोरडे, पक्षी अभ्यासक

पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कवडी पाट येथे हिवाळा सुसह्य करण्यासाठी सध्या लडाख, तिबेट, सैबेरियातून लाखोंच्या संख्येने स्थलांतरित झालेले विविध प्रजातींचे पक्षी दाखल झाले आहेत. नदी आणि काठच्या झाडीवर या पाहुण्यापक्ष्यांचे संमेलन पाहण्यासाठी पक्षिप्रेमींची गर्दी होत आहे. 

यंदा येथे आलेल्या पक्ष्यांमध्ये ब्लॅक विंग्ड स्टिल्ट (शेकाट्या), चक्रवाक (ब्राह्मणी शेल्डक), चक्रांग (कॉमन टिल), थापट्या (नॉदर्न शॉव्हेलर), भिवई (गार्गनी), राखी धोबी (ग्रे वॅगटेल), तुतारी (वुड सॅंडपाइपर), दलदल ससाणा (यूरेशियन मार्श हॅरियर), भोरडी (रोजी पास्टर), तांबोला (रेड थ्रोटेड फ्लाय-कॅचर), नदीसूरय (रिव्हर टर्न) आदी पक्ष्यांचा समावेश आहे.

कवडीपाटला असे जा - पुणे-सोलापूर महामार्गावर वसलेले कवडीपाट हे स्वारगेटपासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर आहे. तर हडपसरपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. स्वारगेटपासून उरुळीकांचन, लोणीकाळभोर, थेऊर या ठिकाणी जाणाऱ्या पीएमपी बसेसने कवडीला पोचता येते.

लोणीकाळभोरच्या अलीकडे तीन किलोमीटर कवडी फाटा आहे. महामार्गापासून दीड किलोमीटर आत जावे लागते. तिथे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT