पुणे

सर्वसामान्यांचा गळा घोटण्याचाच प्रकार

CD

पुणे, ता. ३ : ‘‘ध्वनिप्रदूषणाविरोधातील विद्यानंद बापट यांची भावना सर्वसामान्य पुणेकरांचीच भावना आहे. धर्म, परंपरा तसेच सण उत्सवांवर गुंडशाही ताबा मिळवत असून, जनतेत दहशत निर्माण केली जात आहे. बापट यांना मारहाण हा सर्वसामान्य नागरिकांचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे,’’ अशा शब्‍दांत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, विविध संघटना यांच्‍याकडून विद्यानंद बापट यांच्‍यावर झालेल्‍या मारहाणीच्‍या घटनेचा निषेध नोंदविण्‍यात आला.

मुद्द्याने उत्तर द्या; गुद्द्याने नव्हे ः अंनिस
ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न हा कोणत्याही एका धर्माचा, उत्सवाचा किंवा व्यक्तीचा प्रश्न नाही. नागरिकांचे आरोग्य, शांततेने जगण्याचा अधिकार आणि कायद्याचे पालन यांच्याशी तो संबंधित आहे. या प्रश्नावर कोणाचे मत वेगळे असेल, तर त्याला उत्तर युक्तिवादाने, चर्चेने आणि लोकशाही मार्गाने देता येते. मात्र एखाद्याच्या भूमिकेला उत्तर देता येत नसेल म्हणून त्याच्यावर हात उचलणे, धक्काबुक्की करणे अथवा धमकावणे हा लोकशाही मूल्यांवरच हल्ला आहे. मुद्दे खोडता येत नसतील, तर गुद्द्यांचा आधार घेणे, ही प्रवृत्ती अत्यंत धोकादायक आहे. बापट यांच्यावर मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध.
- मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, राज्य कार्यकारी समिती सदस्य, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

गुंड शक्तींपासून उत्सवांचे रक्षण करा
मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तींना तातडीने आळा घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. गुंडशाही धर्म, परंपरा तसेच सण उत्सवांवर ताबा मिळवत असून, जनतेत दहशत निर्माण करत आहे. नागरिकांचा शांततेने जगण्याचा अधिकार पायदळी तुडवला जात आहे. अशा झुंडशाही प्रवृत्तींपासून आपल्या सण उत्सवांचे रक्षण करण्यासाठी जनतेने जागे व्हावे. सर्व लोकशाही प्रेमी, शांतता प्रेमी नागरिकांनी अशा प्रवृत्ती विरोधात उभे राहावे.
- कॉ. गणेश दराडे, कॉ. प्रा. अजित अभ्यंकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, पुणे जिल्हा कमिटी

कायदेशीर कारवाई करावी
कोणताही सण म्हणजे वाटेल तसा धांगडधिंगा घालण्याचे स्वातंत्र्य नव्हे, हे बापट यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांची ही भावना सर्वसामान्य पुणेकरांचीच आहे. डीजे तसेच रस्त्यात घातलेल्या मंडपांमुळे सामान्य लोकांना खूप त्रास होतो, हे गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. बापट यांच्या मागण्यांशी आम्ही सहमत असून, ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी. पोलिस आणि सत्ताधारी भाजपने आपण ‘कायद्याच्या राज्या''च्या बाजूचे आहोत, हे दाखवून द्यावे.
- मेधा थत्ते, प्रा. शरद जावडेकर, सीमा काकडे, मिलिंद चव्हाण, दत्तात्रेय जाधव, सचिन देसाई, जवाब दो, पुणे

‘डीजे’ बंदीसाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा
सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत ‘डीजे’ विरुद्ध आवाज उठवणाऱ्या बापट यांना मारहाण हा सामान्य नागरिकांचा गळा घोटण्याचाच प्रकार आहे. ही झुंडशाही, गुंडशाही पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात पोसली जाते, यासारखे दुर्दैव नाही. न्यायालयानेच ध्वनिप्रदूषणावर निर्बंध लादले असताना कुणाच्या वरदहस्ताने ही गुंडगिरी पोसली जाते, हे न कळण्याइतकी जनता दूधखुळी नक्कीच नाही. आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवायलाच हवे.
- सुनीता वाणी, पुणे

भ्याड हल्ल्याचा निषेध
लोकशाहीत विचारांना विचारांनीच उत्तर द्यायचे असते, गुंडगिरीने नाही. अशा भ्याड कृत्याचा निषेध. पुण्यासारख्या शहरात अशा घटना घडणे हे निषेधार्ह आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून बापट यांना संरक्षण द्यावे.
- संजय आल्हाट, प्रमोद राजगुरू, दत्तात्रेय राजगुरू, विजय आटवल, विजय कदम आणि के. सी. पवार, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) एससी एसटी आघाडी आणि जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ


विद्यानंद बापट यांना मारहाण करणारे जे आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. या गोष्टीचे भाजप समर्थन करत नाही. भाजपही बापट यांच्या पाठीशी आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेते, भाजप

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना आरोग्यविषयक त्रास होत आहेत. बापट यांना मारहाण म्‍हणजे पुण्यात सत्ताधारी भाजपची दादागिरी कशी वाढली आहे, याचे हे उदाहरण आहे. चुकीच्या प्रवृत्तींना सरकार किंवा सत्ताधाऱ्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्यांवर अशाप्रकारे हल्ले होणे किंवा पहाटे रिलस्टार संतोष पंडित यांना अटक होणे, ही हुकूमशाहीची लक्षणे आहेत.
- प्रशांत जगताप, काँग्रेस नेते

बापट हे त्यांच्या विचारांची मांडणी स्पष्टपणे करत होते. जर त्याला विरोध असेल तर तो मुद्दा चर्चेतून खोडून काढणे आवश्यक होते. पण अशा प्रकारे मारहाण करणे, हे योग्य नाही. अशा गोष्टींना पुणेकर थारा देणार नाहीत. या मारहाणीचा निषेध करतो.
- नीलेश निकम, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

कर्णकर्कश आवाजाबाबत बोलणाऱ्या आणि कायद्याची अंमलबजावणीची मागणी करणाऱ्या सामान्य पुणेकरांवर दहशत निर्माण करण्यासाठीच विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली. त्याचा तीव्र निषेध! आता पुणेकर मागे हटणार नाहीत, तर आपली कर्णकर्कश लाउडस्पीकर बंदीची मागणी रस्त्यावर उतरत अधिक जोरदारपणे, संघटितपणे मांडतील.
- मुकुंद किर्दत, पुणेकर अगेन्स्ट लाउडस्पीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ! मनोज जरांगे उपोषणावर ठाम; लाड म्हणाले, ''...नाहीतर मी उपोषणाला बसेन''

Pune News : तलाव, बंधाऱ्यांना मिळणार नवसंजीवनी; ३९ कामांसाठी ९.३७ कोटींचे बळ

Pune News : अडवणूक थांबणार, कामांना येणार गती; निविदा प्रक्रियेला विलंब केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘एनजीटी’च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

ATS Crime : अल हिंद सौतुल इस्लाम फाउंडेशनच्या नावाने बनावट संस्था उभारून फसवणूक; बीडमध्ये एटीएसची कारवाई

SCROLL FOR NEXT