PMPML sakal
पुणे

‘ओ शेठ’का केली बंद, बससेवा थेट?

पीएमपीच्या नव्या योजनांमुळे प्रवासाचा वेळ, खर्चही वाढला

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा

पुणे : उपनगर ते शहराचा मध्यभाग यांना जोडणाऱ्या कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, कोथरूड आदी मार्गांवरील बस पीएमपीने खंडित केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मध्यावर उतरून दुसऱ्या बसमध्ये बसावे लागत आहे. परिणामी त्यांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाढत आहे. त्यामुळे पीएमपीने सलग वाहतूक सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोंढवा, मार्केटयार्ड, सहकारनगर, पद्मावती, धनकवडी, सिंहगड रस्ता, कोथरूड येथून प्रवाशांना पूर्वी शिवाजीनगर अथवा महापालिका भवनपर्यंत थेट जाता येत होते. परंतु, अटल बस सेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू केल्यापासून पीएमपीने मार्गांत बदल केला आहे. त्यामुळे बिबवेवाडीतील प्रवाशाला शनिपार किंवा अप्पा बळवंत चौकात जायचे असल्यास त्याला स्वारगेटला उतरावे लागते. तेथून दुसऱ्या बसमधून प्रवास करून इच्छितस्थळी जावे लागते. सिंहगड रस्त्यावरील प्रवाशालाही स्वारगेटला उतरून तर कोथरूडच्या प्रवाशाला डेक्कनला उतरून पुढे दुसऱ्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. या प्रकारामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून तिकिटाचा खर्चही वाढत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. उपनगरांतून शहरात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना विशेषतः कष्टकऱ्यांना दोन वेळा बस बदलावी लागत असल्यामुळे त्यांचा वेळ वाढत असून आर्थिक भुर्दंडही वाढला आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी बस हवी! मार्गांत बदल करताना पीएमपीने प्रवाशांची गरज बघितली पाहिजे. उपनगरांत जास्त प्रवासी असतील तर, त्यांच्या सोयीने मार्ग तयार केले पाहिजे. त्यासाठी शास्त्रीय सर्वेक्षणाची गरज आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या मागणीप्रमाणे अनेक मार्गांवर बससेवा सुरू केल्यामुळे त्या बस रिकाम्या जात आहेत. त्यातून पीएमपीचा तोटा वाढत आहेत. त्यामुळे पीएमपीने अभ्यास केला पाहिजे. राजकीय नेत्यांच्या हौसेखातर मार्ग सुरू केले तर, पीएमपीचे आणि प्रवाशांचे नुकसान वाढणारच आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीची सेवा सक्षम पाहिजे. मार्गांत बदल म्हणजे शहर स्मार्ट होत नाही, तर त्याचा प्रवाशांना उपयोग होऊन त्यांचा वेळ आणि पैसा वाचला पाहिजे, असे सिंहगड रस्ता येथील संगणक अभियंता श्रीष ढेरे यांनी सांगितले.

"उपनगर ते शहर यांना जोडणाऱ्या बस खंडित केल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होत आहे. एका मार्गावर प्रवास करताना प्रवाशांनीही आता दोन वेळा बस बदलण्याची सवय करून घ्यावी. अटल आणि दस मे बस प्रवासामुळे त्यांची सुविधा वाढली आहे. शहराच्या मध्यभागात १० रुपयांत दिवसभर प्रवास देत आहोत. त्याचा त्यांनी वापर करावा. कात्रज - स्वारगेट, कोथरूड- डेक्कन, सिंहगड रोड- स्वारगेट मार्गावर दर पाच- दहा मिनिटांना बस आहे. स्वारगेटवरून पुढे दर ५ मिनिटाला बस उपलब्ध आहे."

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

सर्वाधिक उत्पन्नाचे मार्ग बंद

कात्रज-शिवाजीनगर, अप्पर इंदिरानगर-शिवाजीनगर, कोथरूड-हडपसर, कोंढवा-शिवाजीनगर, मार्केट यार्ड-शिवाजीनगर, सिंहगड रोड-शिवाजीनगर

प्रवासी म्हणतात....

स्वाती समुद्र (तावरे कॉलनी) : "तावरे कॉलनी येथून शिवाजीनगरला जाण्यासाठी सिटी प्राइड येथून स्वारगेटला जावे लागते, तेथून शिवाजीनगरला जाण्यासाठी ‘दस मे बस’ सेवेचा लाभ घेण्यासाठी स्वारगेटवरूनच ही बससेवा असल्याने यामध्ये वेळ जातो आणि पैसे जादा जातात. यापेक्षा कात्रज ते शिवाजीनगर थेट सेवा सुरू करावी."

अनिता जगधने (बिबवेवाडी) : "मी घरेलू कामगार असून कामासाठी पेठांमध्ये जावे लागते. त्यासाठी शिवाजीनगर बस उपयुक्त होती. परंतु बस बंद झाल्याने स्वारगेटपर्यंत बसने जाऊन पुढे जाण्यासाठी बस अथवा प्रवासी वाहनांचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळ वाया जात असून प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.'

प्रकाश टिंगरे (बिबवेवाडी) : "शिवाजीनगर बस बंद झाल्याने स्वारगेटपर्यंत बस ने येऊन पुन्हा दुसरी बस पकडून जावे लागत आहे. त्यामुळे वेळ लागत असून बस भाड्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे."

हर्षदा लाड (जांभूळवाडी ) : "किमान कात्रज ते शिवाजीनगर, पुणे स्टेशन, डेक्कनपर्यंत थेट बससेवा असावी, त्यामुळे प्रवाशांना उपयोग होईल."

अभिजित वडाणे (कोथरूड) ः "कोथरूडवरून पूर्वी थेट बसमधून स्वारगेट किंवा टिळक रस्त्यावर जाता येत होते. आता डेक्कनवर बस बदलावी लागते. तेथून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या बसची फ्रिक्वेन्सी पुरेशी नाही. पूर्वी १५ रुपयांत होणाऱ्या प्रवासाला आता २० रुपये मोजावे लागतात."

नीलेश जाधव (धायरी) ः "सिंहगड रस्त्यावरून शनिपारला जाण्यासाठी आता बसच उपलब्ध नाही. स्वारगेटला बस बदलून पुढे जावे लागते. एका बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये चढणे, हे ज्येष्ठ नागरिकांना अवघड होत आहे. त्यातच पैसेही अधिक जात असल्यामुळे रिक्षाचा पर्याय सोयीचा वाटतो."

नीता पारवे (मार्केट यार्ड) ः "मार्केट यार्डवरून गणेश पेठेत मला कामाला जावे लागते. परंतु, आता तेथून पुणे स्टेशनची बस बंद झाली आहे. त्यामुळे स्वारगेटला उतरून दुसरी बस करावी लागते. त्यात वेळ खूप जातो आणि पैसेही जास्त द्यावे लागतात. त्यामुळे पहिल्या सारखीच बस सुरू करावी."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT