जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची ओढ
----
खरीप पिके संकटात; शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदरमध्ये दमदार सरींची प्रतीक्षा
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांत पावसाचे वितरण असमान राहिल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. १ जून ते २७ ऑगस्ट दरम्यान पुरंदर, शिरूर, बारामती आणि दौंडमध्ये सरासरीपेक्षा अधिक, तर इंदापूरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दमदार पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी असून, पिकांना वाढीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
पावसाळ्याचे जवळपास तीन महिने पूर्ण होत आले तरी पूर्व भागातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरींचे सातत्य राहिलेले नाही. काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो टप्याटप्याने अधूनमधून पडल्याने त्याचा शेतीला अपेक्षित फायदा झालेला नाही. विशेषतः हलक्या जमिनीतील खरीप पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसत आहे. त्यामुळे पिकांना खताची मात्रा द्यायची की नाही, या बाबत शेतकरी संभ्रमात आहेत.
पूर्व भागातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण आणि वितरण यावरच बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस यांसह अन्य खरीप पिकांची वाढ अवलंबून आहे. सुरुवातीच्या काळात पेरणीसाठी आवश्यक पाऊस झाल्यानंतर काही ठिकाणी पिकांची उगवण झाली. मात्र, त्यानंतर अपेक्षित दमदार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. पावसात खंड पडत असला तरी खरीप पिकांना पुढील काळात चांगला पाऊस मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. पावसाच्या एक-दोन दमदार सरी झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून पिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे.
इंदापूरमध्ये पावसाची तूट
यंदा १ जून ते २७ ऑगस्टदरम्यान इंदापूर तालुक्यात २१९.१ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरी २५६.७ मिलिमीटरच्या तुलनेत तो ८५.४ टक्के आहे. त्यामुळे या तालुक्यात पावसाची तूट सर्वाधिक आहे. पावसातील खंडामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकांवर ताण निर्माण झाला आहे. दौंडमध्ये या कालावधीत २१३ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरी २०७.१ मिलिमीटरच्या तुलनेत तो १०२.८ टक्के आहे. बारामतीत २११.२ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या २००.५ मिलिमीटरच्या तुलनेत तो १०५.३ टक्के आहे. शिरूरमध्ये २३७.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या २१८.४ मिलिमीटरच्या तुलनेत तो १०८.७ टक्के आहे. पुरंदरमध्ये ३४३.७ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरीच्या ३१८.९ मिलिमीटरच्या तुलनेत तो १०७.८ टक्के आहे.
-----
पावसाचे असमान वितरण
पूर्व भागातील तालुक्यांची एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी सरासरीच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक असली, तरी केवळ एकूण आकडेवारीवरून शेतीची स्थिती चांगली असल्याचे म्हणता येणार नाही. पावसाचे कालावधीतील वितरण, पावसातील खंड आणि गावनिहाय झालेला पाऊस यामुळे अनेक भागांत पिकांना पाण्याचा ताण जाणवत आहे. त्यामुळे पुढील काळात चांगल्या पावसाची गरज आहे.
चौकट ----
१ जून ते २७ आॅगस्टदरम्यान पावसाची स्थिती (मिलिमीटरमध्ये)
तालुका -- सरासरी पाऊस -- प्रत्यक्ष पाऊस -- टक्के
शिरूर -- २१८.४ -- २३७.४ -- १०८
बारामती -- २००.५ -- २११.२ -- १०५
इंदापूर -- २५६.६ -- २१९.१ -- ८५
दौंड -- २०७.१ -- २१३.० -- १०२
पुरंदर -- ३१८.९ -- ३४३.७ -- १०७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.