पुणे, ता. १० : पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली असून, पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे चित्र आहे. एकट्या मुळशी धरण क्षेत्रात १० ऑगस्टपर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार ४५० मिलिमीटर अधिक (एकूण सहा हजार २२३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. पवना, पानशेत आणि खडकवासला धरण क्षेत्रातही वरुणराजाने भरघोस दान दिल्याने गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे जूनमध्ये पाऊस थांबल्याने धरणे भरणार की नाही, अशी भिती व्यक्त होत होती, मात्र जुलैमध्ये दोन टप्प्यात आणि ऑगस्टमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणे भरली असून, यंदा पाण्याचे चित्र दिलासादायक आहे. मुळशीपाठोपाठ पानशेतमध्ये यंदा दोन हजार ४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी एक हजार ९१८ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पानशेतमध्ये १२७ मिलिमीटर अधिक पाऊस झाला. पवना परिसरात दोन हजार ६६३ मिलिमीटर पाऊस झाला असून, गेल्यावर्षी दोन हजार ३८८ मिलिमीटर पाऊस झाला होता, येथे २७५ मिलिमीटरची वाढ झाली आहे.
टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा गेल्यावर्षीपेक्षा काहीशी घट झाली आहे. गेल्यावर्षी १० ऑगस्टपर्यंत दोन हजार ८१८ मिलिमीटर पाऊस झाला होता; यंदा दोन हजार ९८१ मिलिमीटर पाऊस नोंदला असून, सुमारे १६३ मिलिमीटरची घट आहे. तर वरसगाव धरणक्षेत्रात २३ मिलिमीटर कमी पाऊस झाला आहे. तर खडकवासला धरणात गेल्यावर्षीच्या ६९० मिलिमीटरच्या तुलनेत यंदा ७०३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणीही पावसाची अधिक नोंद झाली आहे. त्यामध्ये यवत, केडगाव, दौंड, शेटफळ, पळसदेव आणि इंदापूरमध्येही अधिक पाऊस नोंदविला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले.
धरणक्षेत्रात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
धरण : १० ऑगस्ट २०२६ : १० ऑगस्ट २०२५
खडकवासला : ७०३ : ६९०
टेमघर : २,८१८ : २,९८१
पानशेत : २,०४५ : १,९१८
वरसगाव : १,९२६ : १,९४९
पवना : २,६६३ : २,३८८
मुळशी : ६,२२३ : २,७७३
धरणक्षेत्रात यावर्षी कमी कालावधीत अधिक पाऊस झाला. परिणामी गेल्यावर्षीपेक्षा धरणक्षेत्रात अधिक पावसाची नोंद झाली आहे. एल निनोचा प्रभाव आहे. पाऊस चांगला झाल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची, तसेच शेतीच्या सिंचनाची चिंता कमी झाली आहे.
- किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.