पुणे, ता. १० : टिळक स्मारक मंदिर नाट्यगृहात प्रयोग सुरू झाल्यावर कलाकारांचे आवाजच पोहचत नसल्याने आणि उकाड्याने सारे हैराण झाल्यामुळे अवघ्या १० मिनिटांत नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची नामुष्की शनिवारी ओढवली. नाट्यगृहातील अव्यस्थेने कळस गाठल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला.
शनिवारी रात्री या नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ या नाटकाचा प्रयोग होता. मात्र प्रयोग सुरू झाल्यापासूनच कलाकारांचे आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हते. कलाकारांनी कितीही प्रयत्न केले; तरी नाट्यगृहाच्या ध्वनीव्यवस्थेत बिघाड असल्याने प्रेक्षकांना संवादच ऐकू येत नव्हते. शिवाय वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने प्रचंड उकाड्याने प्रेक्षक हैराण झाले होते. एसीला पर्याय म्हणून काही पंखे लावले होते. मात्र त्याचा पुरेसा परिणाम झाला नाही.
अशा भयानक परिस्थितीत प्रयोग सुरू ठेवणे अशक्य असल्याने १० ते १५ मिनिटांतच नाटक थांबविण्यात आले. भरत जाधव यांनी नाइलाजाने प्रयोग थांबवावा लागत असल्याचे सांगत पडदा टाकला. शिवाय मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी रसिकांना तिकिटांचे पैसे परत केले. प्रत्यक्ष तिकिट काढलेल्या रसिकांना तेथेच तिकीट खिडकीवर रोख रक्कम परत देण्यात आली; तर ऑनलाइन पद्धतीने तिकिट काढलेल्या रसिकांना दोन दिवसांत खात्यात पैसे परत करणार असल्याचे सांगण्यात आले. भरत जाधव यांना मात्र नाट्यगृहाचे भाडे आणि प्रेक्षकांना परत द्यावे लागलेले तिकिटाचे पैसे, असा भुर्दंड सोसावा लागला. नाट्यगृहातील दुरवस्थेवर त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली.
टिळक स्मारक मंदिराचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे आहे. महापालिकेच्या अन्य नाट्यगृहांपेक्षा या नाट्यगृहाचे भाडे सर्वाधिक आहे. तीन तासांच्या सत्रासाठी तब्बल २५ हजार रुपयांचे भाडे येथे आकारले जाते. असे असतानाही मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याने प्रेक्षक आणि कलाकारांनी संताप व्यक्त केला. याबाबत टिळक स्मारक मंदिराच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नाट्यगृहात ध्वनिव्यवस्था सक्षम असणे, ही मूलभूत अपेक्षा आहे. भाडे भरूनही जर मूलभूत सुविधा मिळत नसतील, तर ते निराशाजनक आहे. कलाकार कष्टाने नाटक करत असतात आणि रसिक आपला अमूल्य वेळ देऊन व तिकीट काढून नाटक पाहण्यासाठी येत असतात. त्यांना काय अनुभव देत आहोत, याचा नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने विचार करावा.
- भरत जाधव, ज्येष्ठ अभिनेते
तुमचे मत मांडा...
ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांना टिळक स्मारक मंदिरातील अपुऱ्या सुविधांमुळे प्रयोग रद्द करण्याची नामुष्की आली. वेळ काढून आलेल्या प्रेक्षकांनाही नावीलाजास्तव घरी परतावे लागले. याबाबत तुमचे मत मांडा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.