नसरापूर, ता. ५ : पुणे- सातारा महामार्गावर हरिश्चंद्री (ता. भोर) येथे उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावर मोटारीला मागून भरधाव येणाऱ्या मोटारीने ठोकर मारल्याने झालेल्या अपघात एक ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
ज्ञानदेव गणपती दळवी (वय ६५, रा. ठाणे) यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर त्यांच्या समवेत असलेले मोटार चालक नीलेश पांडुरंग पाटील (वय ३५), प्रिया अमोल दळवी (वय १०), दृष्टी अमोल दळवी (वय ७) व शारदा ज्ञानदेव दळवी (वय ५५) हे चौघे जखमी झाले आहेत. नीलेश पाटील यांनी याबाबत राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दळवी कुटुंबीयांसह ते मोटारीने (क्र.एम.एच. १२ एन.एफ. १०३७) साताऱ्याच्या दिशेने जात असताना शुक्रवारी (ता. ४) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास महामार्गावर पुणे- सातारा लेनवर हरिश्चंद्री गावाचा उड्डाणपूल सुरु होतानाच्या सेवा रस्त्यावर मागून येणाऱ्या मोटारीवरील (क्र.एम.एच. १२ आर.एफ. ७११३) चालक प्रसाद हनुमंत जाधव (वय ३०, रा. वरगळ, सातारा) याने दारू पिऊन त्याच्या ताब्यातील मोटार भरधाव चालवून पुढे चालणाऱ्या पाटील यांच्या मोटारीला जोरदार ठोकर मारली. या अपघातात ज्ञानदेव दळवी हे गंभीर जखमी होऊन त्यांच्या जागीच मृत्यू झाला, तर चालक नीलेश पाटील यांचा डावा हात, प्रिया दळवी हिचा उजवा हात, दृष्टी दळवी हिचा डावा पाय, तर शारदा दळवी यांचा डावा हात मोडला. त्यांच्यावर नसरापूर येथील खा,गी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुणे येथील रुग्णालयात दाखल केले.
याबाबत मागील मोटार चालक प्रसाद हनुमंत जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.