पुणे, ता. २८ : सोलापूर-पुणे ई-शिवाई बसला सोमवारी लागलेली आग उंदराने वायर कुरतडल्यामुळे लागल्याची प्राथमिक माहिती एसटीच्या तपासात समोर आली आहे. यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे बसचे सुमारे पन्नास लाखांचे नुकसान झाले असून, कंपनीचा अधिकृत अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.
सोलापूरहून स्वारगेटला येणाऱ्या ई-शिवाई बसला सोमवारी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास आग लागली. यात चालकाच्या प्रसंगावधानामुळे २० प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना पुणे विभागाच्या अखत्यारीत घडल्याने पुणे विभागाच्या यांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बस ताब्यात घेऊन तपास केला. यांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांना इंजिनमधील वायर कुरतडल्याचे आढळले. वायर कुरतडल्याने शॉर्ट सर्किट झाले, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत याचा अहवाल एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त होईल. दरम्यान, संबंधित ठेकेदारही ‘हायर’ कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून बसच्या आगीच्या कारणांचा शोध घेत आहे. तसेच, यासंबंधी विमा कंपनीनेदेखील सखोल तपास सुरू केला आहे.
उंदरांना वास आकर्षित करतो :
आधुनिक इलेक्ट्रिक बसमध्ये (ई-वाहन) मोठ्या प्रमाणावर सेन्सर आणि वायरिंगचे गुंतागुंतीचे जाळे असते. वाहन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ई-वाहनांच्या वायरच्या कोटिंगसाठी अनेकदा ‘इको-फ्रेंडली’ साहित्याचा वापर केला जातो, ज्याच्या वासाने उंदीर आकर्षित होतात. पूर्वी वाहनांच्या वायरला कव्हर करण्यासाठी पेट्रोलियम-आधारित प्लॅस्टिकचा वापर केला जायचा. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी ‘बायो-डिग्रेडेबल’ साहित्याचा वापर सुरू केला आहे. आता वायरचे कोटिंग बनवण्यासाठी सोयाबीन, शेंगदाणा तेल किंवा तांदळाच्या भुशापासून बनवलेल्या साहित्याचा वापर केला जातो. इंजिन किंवा बॅटरी गरम झाल्यानंतर या वायरमधून एक हलकासा गोड वास येतो, जो उंदीर आणि घुशींना अन्नासारखा वाटतो आणि ते त्याकडे आकर्षित होतात.
सर्व ई-बस तपासण्यास सुरुवात :
पुणे विभागाच्या विभाग नियंत्रकांनी पुणे विभागातील सर्व ई-बसची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यांत्रिक विभागाकडून बसच्या तपासणीस सुरुवात झाली आहे. यात सर्व ई-शिवनेरी व ई-शिवाई गाड्यांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात तपासणीचा अहवाल विभाग नियंत्रकांना प्राप्त होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.