राजेगाव, ता. ११ : पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांचे जाळे विस्तारले असून, येथे कार्यरत शेकडो मजुरांची पोलीस किंवा प्रशासनाकडे कोणतीही नोंद नाही. यामुळे परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महामार्गालगतच्या मोकळ्या जागा भाड्याने घेऊन भंगार विक्री, टायर कटिंग आणि पंक्चर काढण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या मजुरांची आधार कार्ड किंवा पोलिस पडताळणी झालेली नाही. यापूर्वी परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, या अनधिकृत अड्ड्यांवरील संशयास्पद हालचाली चिंतेचा विषय ठरत आहेत. नोंदणी नसल्याने गुन्हेगारांचा शोध घेताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे.
पोलिस प्रशासन, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामपंचायतीने संयुक्तपणे मोहीम राबवणे गरजेचे आहे. महामार्गालगतच्या सर्व अनधिकृत व्यवसायांची तपासणी करून तेथे काम करणाऱ्या प्रत्येक परप्रांतीय कामगारांचे बायोमेट्रिक व पोलिस पडताळणी तातडीने सक्तीची करावी, तसेच नियमबाह्य व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्वामी चिंचोली व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
महामार्गालगत व्यवसाय करणारे मूळ मालकांच्या नावाने ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत कार्यालयात येऊन घेऊन जातात. मात्र प्रत्यक्षात परप्रांतीय व्यवसाय करताना दिसत आहेत. मुळ जागा मालकांनी या सर्व कामगारांच्या नोंदी ग्रामपंचायतीकडे सादर कराव्यात अन्यथा त्यांना सुविधांचा लाभ दिला जाणार नाही.
पूनम मदने,
प्रशासक, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.