प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २० : पुणे-सोलापूर-वाडी दरम्यान मांजरी स्थानकापासून (४१२ किलोमीटर) तिसऱ्या व चौथ्या मार्गिकांच्या भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. पुण्यात ९२ एकर, तर सोलापुरात ५३० एकर जमिनीचे संपादन केले जात असून, १६ हजार कोटींच्या या प्रकल्पामुळे रेल्वेचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढणार आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार या नवीन मार्गिकेवरून ३२ प्रवासी रेल्वे, तर ४० हून अधिक मालगाड्या धावणार आहेत. यामुळे पुणे-सोलापूर-वाडी दरम्यान रेल्वे वाहतूक अधिक गतिमान होणार आहे.
पुणे-सोलापूर-वाडी या मार्गावरून दररोज सरासरी १०० हून अधिक प्रवासी रेल्वे गाड्यांची वाहतूक होते, तर सोलापूर ते वाडी दरम्यान ६० मालगाड्यांची वाहतूक होते. होटगी व कुडगी येथे ‘एनटीपीसी’चे मोठे प्रकल्प असल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक होते. कोळशाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांची संख्या जास्त असल्याने प्रवासी रेल्वेगाड्यांना याचा फटका बसत आहे. हे लक्षात घेत रेल्वे बोर्डाने नॅशनल रेल्वे प्लॅनची (एनआरपी) आखणी केली आहे. त्यानुसार २०३० पर्यंत देशातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर अतिरिक्त मार्गिका टाकण्यात येणार आहेत. यात पुणे ते वाडी याचा देखील समावेश केला आहे. भविष्यात वाढणारी प्रवाशांची संख्या, रेल्वे गाड्यांची संख्या, रेल्वेची गती यासाठी मार्गिकेचे जाळे अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.
अपलाइनच्या बाजूलाच नवीन मार्गिका
पुण्यात मांजरी स्थानकापासून तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. ही मार्गिका पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेच्या (अपलाइन) बाजूला असणार आहे. पुणे-दौंड-कुर्डुवाडीपर्यंत अशीच मार्गिका असेल. सोलापूरजवळ मात्र ही मार्गिका शहराच्या बाहेरून जाणार असून सोलापूर स्थानकाला ती बायपास करेल. सोलापूरजवळच्या ‘तिलाटी’ स्थानकाजवळ या दोन्ही मार्गिका जोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांना असा होणार फायदा
- सध्या पुणे ते वाडी दरम्यान दोन मार्गिका आहेत, आणखी दोन मार्गिकांमुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढेल.
- रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने प्रवाशांची सोय होईल.
- गाड्यांना क्रॉसिंग अथवा छोट्या स्थानकाच्या लूपलाइनवर थांबावे लागणार नाही.
- प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल.
एका किलोमीटरसाठी ३९ कोटींचा खर्च
तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी प्रति किलोमीटर सुमारे ३९.४० कोटी रुपये, तर प्रति ट्रॅक किलोमीटर १६.७६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे भूसंपादनाचा खर्च वगळल्यास प्रति ट्रॅक किलोमीटरसाठी १२.८७ कोटी रुपये खर्च होणार आहे. भूसंपादनामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला आहे.
पुणे-सोलापूर-वाडी दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम अस्तित्वात असलेल्या मार्गिकेच्या बाजूने करण्याचे नियोजन आहे. यासाठी पुणे आणि सोलापूर या दोन्ही भागांत भूसंपादनाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे १६ हजार कोटी आहे.
- बी. के. सिंग, मुख्य अभियंता, मध्य रेल्वे, मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.