परिंचे, ता. ३ : तोंडल (ता. पुरंदर) येथील शेडगे वस्ती येथील वीर-सारोळा रस्त्यावर रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरून चाललेल्या चार ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात चालकावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत ज्या शेतकऱ्याच्या शेतात ऊसतोड सुरू होती ते शेतकरी दिनेश प्रकाश निगडे (वय ३२ रा. गुनंद, ता. भोर) यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांच्या शेतात ऊसतोडीचे काम करणारे चार कामगार सोमवारी (ता. २) रात्री ९च्या सुमारास मोटारसायकलवरून (क्र. जी जे २१ आर १३२७) जात होते. यावेळी सारोळ्याकडून वीरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता वाहन घेऊन पसार झाला.
हरिश शिवराम बरडे (वय २६), प्रदिप वसंत मोरे (वय २६), अमित सनेश चौधरी (वय २७), मुरलीधर सोन्याभाई महाला (२२) हे चार मजुर जखमी अवस्थेत दिसले. जखमी मजुरांना तातडीने सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हे चारही मजूर गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील असून अवघड वळणावर सारोळ्याकडून वीरच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता वाहन घेऊन पसार झाला. मंगळवारी पहाटे सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते त्यांच्या मूळ गावी गुजरात येथे रवाना करण्यात आले आहेत.
सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व हवालदार विशाल जाधव, संदीप पवार गुन्ह्याचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने वाहनाचा शोध सुरू आहे. या अपघाताबाबत किंवा धडक देऊन पळून गेलेल्या वाहनाबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास, ९०११०७९६२२ या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार असल्याचे कुमार कदम यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.