पुणे, ता. २८ : शाळांमध्ये विषय शिक्षक नसल्याने वर्षानुवर्षे गणित, विज्ञान आणि इंग्रजीचे धडे अपुरे राहत होते. कधी इतिहास शिकवणाऱ्या शिक्षकाला गणिताचा तास घ्यावा लागायचा, तर कधी तासाला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ बसून राहावे लागायचे. मात्र, ‘पवित्र’ पोर्टलमार्फत ‘शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरती २०२५’मधील पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीसाठी शिफारशी झाल्याने राज्यातील शेकडो शाळांमधील विषय शिक्षकांची गंभीर समस्या अखेर सुटणार आहे.
गणित, विज्ञान आणि इंग्रजी या कळीच्या विषयांना तब्बल तीन हजारांहून अधिक विषय शिक्षक मिळाले असून आता शाळांमध्ये त्या-त्या विषयांचे वर्ग नियमित आणि दर्जेदार पद्धतीने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त होती. त्यात, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विषयनिहाय शिक्षकच नसल्याने अन्य विषयांच्या शिक्षकांना संबंधित विषयांचे तास घ्यावे लागायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संबंधित विषयाचा पाया कच्चा राहत होता.
दरम्यान, भरतीत विषयनिहाय पदांना शिक्षक मिळाल्याने शाळांमधील अध्यापनाचा चेहरामोहरा बदलणार आहे. राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी एकूण १२ हजार ६७१ जागा रिक्त होत्या, त्यातील सात हजार ५४१ जागांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. हे शिक्षक प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. मुलाखतीशिवाय या प्रकारातील शिक्षक भरतीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
अखेर विज्ञान, गणिताला मिळाले शिक्षक
राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात पाच हजार ४२१ शिक्षकांची पदे रिक्त होती. त्यात जवळपास तब्बल ६४.९० टक्के गणित आणि विज्ञान विषयातील शिक्षकांची पदे रिक्त होती, तर नववी आणि दहावीच्या वर्गात ३९.२९ टक्के गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकांची पदे रिक्त होती. या भरती प्रक्रियेत गणित, विज्ञान यांसह भाषा, भूगोल, इतिहास, सामाजिकशास्त्र अशा विषयांतील शिक्षकांसाठी शिफारशी करण्यात आल्या आहेत.
भाषेचीही वाढणार गोडी
इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना ७०५ मराठी शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या, या जागांवर ५०७ उमेदवारांची शिफारस केली आहे. याशिवाय याच वर्गांना इंग्रजी विषयाचे ४५९ नवे शिक्षक रुजू होत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील इंग्रजी विषयाची भीती दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
विषयनिहाय शिफारस केलेल्यांची संख्या
विषय : पदसंख्या : शिफारस केलेली पदसंख्या
*इयत्ता सहावी ते आठवी :
मराठी : ७०५ : ५०७
इंग्रजी : ४९० : ४५९
गणित-विज्ञान : ३,५१८ : २,८३३
*इयत्ता नववी-दहावी :
मराठी: १२१ : ९१
इंग्रजी : १८९ : १३१
गणित-विज्ञान : ५१० : ४८६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.