पुणे, ता. ७ : रेल्वे प्रशासनाने हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण केले असून, ही मार्गिका लवकरच कार्यान्वित होणार आहे. या नवीन सुविधेमुळे मुख्य मार्गावरील ताण कमी होणार असून, पुणे स्थानकावरील रेल्वे आणि इंजिनची वाहतूक अधिक सुलभ व जलद होण्यास मदत होईल.
पुणे ते हडपसर स्थानकादरम्यान सध्या दोन मार्गिका उपलब्ध आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यातच हडपसर टर्मिनलवरून सुटणाऱ्या गाड्यांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. ही गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने हडपसर-पुणे दरम्यान सुमारे २.५ किलोमीटर लांबीच्या स्वतंत्र मार्गिकेचे काम हाती घेतले होते. हे काम आता पूर्ण झाले असून, यामुळे रेल्वे वाहतुकीतील ‘क्रॉसिंग’चा मोठा अडथळा दूर झाला आहे.
या नवीन मार्गिकेमुळे वाहतुकीसाठी पूर्वी अवलंबली जाणारी ‘क्रॉस’ पद्धत बंद होणार आहे. परिणामी, प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांना विनाकारण थांबावे लागणार नाही. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. हडपसर स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करणे आता शक्य होणार असून, पुणे स्थानकावरील वाहतुकीचा ताण विभागला जाणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि हडपसर परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तिसरी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर या भागातील रेल्वे संचलनात कमालीची सुधारणा होईल, असा विश्वास रेल्वे सूत्रांनी व्यक्त केला आहे. ही मार्गिका प्रत्यक्ष सेवेत आल्यानंतर पुणे स्थानकावरील इंजिन बदलणे किंवा गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळेत अधिक अचूकता येण्याची शक्यता आहे.
---------------------------
मार्गिकेचे हे आहेत फायदे...
- रेल्वे डबे अथवा इंजिनला पुणे स्थानकावरून घोरपडी येथील पिट लाइनवर जाण्यासाठी सोलापूर किंवा मिरज मार्गिकेचा वापर करावा लागणार नाही.
- त्यामुळे मार्गिका ब्लॉक होणार नसून, त्या रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध राहतील.
- प्रवासी रेल्वे गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही.
- प्रवाशांच्या वेळेत बचत होईल.
- भविष्यात हडपसर स्थानकावरून रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी ही मार्गिका फायदेशीर ठरणार
---------
तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, लवकरच त्या मार्गिकेवरून रेल्वेची वाहतूक सुरू होईल. यामुळे पुणे स्थानकावरची वाहतूक सुलभ व जलद होणार आहे. प्रवाशांच्या वेळेत देखील बचत होणार आहे.
- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.