पुणे, ता. ३ : शहरात श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांत होणारी भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने ४ आणि ५ सप्टेंबरला वाहतुकीत बदल केले आहेत. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर दहीहंडी फुटेपर्यंत गर्दी असल्याने हे बदल लागू असतील, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
- फरासखाना व विश्रामबाग विभाग (५ सप्टेंबर) : दुपारी चार वाजल्यापासून शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी वाहनधारकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडोजी बाबा चौक, टिळक चौक मार्गे जावे. बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पूरम चौकातून टिळक रस्ता व अलका टॉकीज चौकाचा वापर करावा. बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असेल. सोन्या मारुती चौकाकडून सेवासदन चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
- बंडगार्डन विभाग (५ सप्टेंबर) : सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत तीन तोफा चौक ते ब्ल्यू नाईल चौक (इस्कॉन मंदिर) रस्ता बंद राहील. याऐवजी ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौक हा मार्ग दुतर्फा करण्यात येईल.
- वानवडी विभाग (५ सप्टेंबर) : दुपारी ४ वाजल्यापासून शिवरकर रस्त्यावरील वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी संविधान चौकातून डावीकडे वळून साळुंखे विहार रस्त्याचा वापर करावा.
- लष्कर विभाग (५ सप्टेंबर) : दुपारी ४ पासून गोळीबार मैदान चौकाकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक वाय जंक्शन येथे बंद करून खाणे मारुती चौकाकडे वळवण्यात येईल. बाबाजान चौक, व्होल्गा चौक आणि महावीर चौक परिसरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
- वारजे विभाग (४ व ५ सप्टेंबर) : आंबेडकर चौकाकडून चर्च चौकाकडे जाणारी वाहतूक कर्वे रस्त्याने वारजे जंक्शनकडे वळवण्यात आली आहे. राजाराम पूल ते आंबेडकर चौक दरम्यानची वाहतूक वनदेवी मार्गे कर्वे रस्त्याने जाईल. याशिवाय समर्थ, काळेपडळ आणि फरासखाना (फडके हौद परिसर) या विभागांतही ४ व ५ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत विविध मार्गांवर बदल करण्यात आले. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भाजीभाकरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.