पुणे, ता. १२ : महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स आणि बॅनरवर कारवाई सुरू असली, तरी शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीला आळा बसलेला नाही. रस्ते, चौक, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, जयंती तसेच धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फ्लेक्स-बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत असून, पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिंगमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो, हे यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांमधून स्पष्ट झाले आहे. तरीही जानेवारी महिन्यापासून अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई थंडावली होती. ‘सकाळ’ने या प्रश्नाकडे लक्ष वेधल्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. सप्टेंबर महिन्यात अनधिकृत होर्डिंगविरुद्धची कारवाई गतीने करण्यात आली. शहराच्या विविध भागांतील ४२ अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. त्याचबरोबर अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर हटविण्याची मोहीमही सुरू करण्यात आली.
महापालिकेची कारवाई सुरू असतानाही शहरात सार्वजनिक मालमत्ता, रस्त्यांच्या कडेला, चौकांमध्ये आणि पदपथांवर विनापरवानगी राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, स्वागत समारंभ, जयंती आणि धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने फ्लेक्स-बॅनर लावले जात आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याबरोबरच वाहतूक सिग्नलच्या परिसरात लावण्यात येणाऱ्या फ्लेक्समुळे वाहनचालकांना अडथळे निर्माण होतात.
अनधिकृत फ्लेक्स-बॅनर हटविण्यापुरतीच कारवाई मर्यादित राहत असल्याने पुन्हा जाहिरातबाजी केली जात आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे आणि गरजेनुसार गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात नाही. त्यामुळे कारवाईनंतरही पुन्हा असे प्रकार होत आहेत. अनधिकृत फ्लेक्सबाजीवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडून नियमित तपासणी, तक्रारींवर कारवाई आणि संबंधितांवर कठोर दंडात्मक उपाययोजना करणे आणि गुन्हे दाखल करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे, अन्यथा एकीकडे कारवाई सुरू असताना, दुसरीकडे शहरात पुन्हा फ्लेक्सबाजीचे चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.