आळंदी, ता. ३ : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात इंदोरच्या धर्तीवर प्रभावी घनकचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी केले आहे.
बारामती, लोणावळा, दौंड, चाकण, देहू, आळंदी या नगरपरिषदांचा समावेश या कार्यशाळेसाठी केला आहे. ही कार्यशाळा गुरुवारी (ता. ५) सकाळी १० ते ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न होणार आहे. याबाबतचे पत्र पुणे जिल्हाधिकारी, नगरपरिषद प्रशासन शाखा प्रमुख सहायक आयुक्त ऍलीस पोरे यांनी काढले आहे.
कार्यशाळेस जिल्ह्यातील चाकण, बारामती, लोणावळा, देहू, आळंदी व दौंड येथील मुख्याधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित असून, त्यांच्यासोबत आरोग्य विभाग प्रमुख, पाणीपुरवठा अभियंता व शहर समन्वयक यांनीही उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संबंधित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व स्वच्छता समिती सभापती यांनाही उपस्थित राहण्याबाबत विनंती केली आहे.
या कार्यशाळेमध्ये नागरिकांचा सहभाग, लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग, स्वयंसेवी संस्था, शाळा, सामाजिक मंडळे आदी सर्व घटकांना सोबत घेऊन शहर स्वच्छ, सुंदर व शाश्वत ठेवण्यासाठी आवश्यक मूलभूत पायाभूत सुविधा व नियोजनाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच, घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी एसओपी (SOP) तयार करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या शहरासाठी सक्षम, परिणामकारक व दीर्घकालीन घनकचरा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.