पुणे, ता. ५ : शहरातील हजारो स्वच्छतागृहांची स्थिती अतिशय गंभीर असताना आता खास महिलांसाठी म्हणून १०० स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे केवळ दोन वर्षांसाठी एका स्वच्छतागृहाचा खर्च हा तब्बल ४० लाख रुपये इतका असणार आहे. त्यामुळे हे स्वच्छतागृह नेमके कोणाच्या फायद्याचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे शहरात सध्या एकूण १२०० स्वच्छतागृहे असून, त्यामध्ये १५ हजार सीट आहेत. त्यापैकी १० हजार सीट या पुरुषांसाठी तर ५ हजार सीट या महिलांसाठी आहेत. शहरात महिलांची संख्या मोठी असली, तरी त्या तुलनेत त्यांच्या स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते अशा ठिकाणी महिलांच्या स्वच्छतागृहांची गरज आहे. ती अस्तित्वात आहेत, पण त्यांची स्थिती अतिशय विदारक आहे. नियमित स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती होत नसल्याने अनेक महिला महापालिकेचे स्वच्छतागृह वापरण्याचे टाळतात. नाइलाजास्तव त्यांना बाजारपेठांमधील उपाहारगृहांमध्ये जाऊन तेथील स्वच्छतागृह वापरावे लागते.
पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी १०० स्वच्छतागृहे उभारणार असल्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केली होती. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या निविदेत दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. मात्र, तांत्रिक कारण देऊन ही निविदा रद्द करून फेर निविदा काढली आहे. घनकचरा विभागाच्या पूर्वगणनपत्रकानुसार हे स्वच्छतागृह जी.आय. पत्र्यांचे उभारले जाणार असून, त्याचा खर्च १७ लाख रुपये आहे. तर दोन वर्षांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च १७ लाख रुपये आहे. ‘जीएसटी’सह एका स्वच्छतागृहासाठी महापालिका ४० लाख रुपये मोजणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी जागा मिळेना?
महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, रविवार पेठ, शुक्रवार पेठ या भागांतील बाजारपेठेत महिलांची गर्दी मोठी असते. त्या भागात स्वच्छ, प्रशस्त आणि सुरक्षित ठिकाणी स्वच्छतागृहाची गरज आहे. महिलांसाठी खास स्वच्छतागृह उभारले जाणार असताना या भागात जागा मिळविणे प्रशासनाला अवघड झाले आहे. काही ठिकाणी जुने स्वच्छतागृह पाडून ते नव्याने ४० लाख रुपयांचे स्वच्छतागृह उभारावे लागणार आहे.
असे असेल स्वच्छतागृह
- २०० चौरस फूट जागा आवश्यक
- सिमेंट काँक्रिटचा पाया करून त्यावर स्टीलमधील स्वच्छतागृह उभारले जाणार
- एका स्वच्छतागृहात चार सीट, चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष याचा समावेश असणार
- सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत स्वच्छतागृह खुले असणार
- स्वच्छतागृहात दोन सत्रांमध्ये प्रत्येकी एक महिला कर्मचारी कार्यरत असणार
- सध्या फिनिक्स मॉलजवळ प्रायोगिक तत्त्वावर स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे.
‘आकांक्षी’ स्वच्छतागृहे विनावापर
तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारतर्फे पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जात असताना राज्यातील मोठ्या शहरांत ‘आकांक्षी’ स्वच्छतागृह उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी शासनातर्फे प्रतिसीट दीड लाख रुपयांचे अनुदान दिले होते. त्याद्वारे पुणे महापालिकेने दोन कोटी ७५ लाख रुपये खर्च करून ११ ‘आकांक्षी’ स्वच्छतागृहे बांधली. यात पेपर नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन व विल्हेवाट लावण्याचे यंत्र, अंघोळीची सोय असेल, असा दावा केला होता. प्रत्यक्षात ही स्वच्छतागृहे उभारली असली तरी त्यांचा हेतू साध्य झाला नाही. त्यामुळे हा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला.
पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी १०० स्वच्छतागृहे उभारण्यासाठी तरतूद आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली असून, त्यासाठी आता फेरनिविदा काढण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांना चांगली स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- संतोष वारूळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
दृष्टिक्षेपात...
एकूण १००
- महिलांसाठी स्वच्छतागृहे
४० कोटी रुपये
- एकूण अंदाजित खर्च
४० लाख रुपये
- एका स्वच्छतागृहाचा २ वर्षांसाठीचा खर्च
१७ लाख रुपये
- एका स्वच्छतागृहाच्या उभारणीचा खर्च
२०० चौ. फूट
- एका नव्या स्वच्छतागृहासाठी आवश्यक जागा
१७ लाख रुपये
- दोन वर्षांचा देखभाल-दुरुस्तीचा खर्च
१,२००
- पुण्यात सध्या असलेली एकूण स्वच्छतागृहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.