पुणे, ता. ७ ः चॉकलेटचे आमिष दाखवून सात वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या साठ वर्षीय नराधमाला पिंपरीच्या विशेष न्यायालयाने वीस वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला.
आरोपीविरोधात मुलीने नोंदविलेली साक्ष तिच्या आईच्या साक्षीशी आणि वैद्यकीय व घटनास्थळावरील पुराव्यांशी सुसंगत ठरली. या प्रकरणी ६० वर्षीय आरोपीविरोधात तत्कालीन भारतीय दंड संहितेनुसार बलात्कार आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना २० सप्टेंबर २०२२ ला दुपारी दीडच्या सुमारास घडली. घटनेच्या दिवशी मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले. काही वेळाने मुलगी दिसत नसल्याने तिची आई शोध घेत आरोपीच्या घराजवळ पोहोचली. तेथे बालिकेची चप्पल आढळून आली आणि घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने आईने दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपी मुलीवर अत्याचार करत असल्याचे आढळले. पूर्वीही चार ते पाच वेळा असे कृत्य केले असल्याचे तिने सांगितले.
दंडाची रक्कम मुलीला देण्यात यावी ः
या खटल्यात विशेष सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये मुलीची आई, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार आणि तपास अधिकारी यांचा समावेश होता. आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा केला असून, त्याला कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. अग्रवाल यांनी केला. आरोपीकडून दंडाची रक्कम वसूल झाल्यास ती मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियमांनुसार मुलीला नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.