पुरी, ता.३ (पीटीआय) ः ओडिशातील पुरीतील जगन्नाथ मंदिराकडे जवळपास एक हजार ९१२ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आहेत. देशभरात ६० हजार ८२१ एकर जमीन मंदिराच्या मालकीची आहे. याशिवाय मंदिराच्या रत्न भांडारात सोने, हिरे आणि अन्य मौल्यवान वस्तू असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने आज निवेदनाद्वारे प्रसिद्घ केली.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या (एसजेटीए) माहितीनुसार, ३१ ऑगस्टपर्यंत मंदिराच्या नावावर बँकांमध्ये तीन योजनांमध्ये १,८११.१० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. त्यापैकी १,३११.१० कोटी रुपये विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, तर उर्वरित ५०० कोटी रुपये ओडिशा सरकारने दिलेला राखीव निधी असून मंदिराच्या नफा-तोटा खात्यात त्याची नोंद आहे. याशिवाय विविध बचत, चालू आणि ‘फ्लेक्सी’ खात्यांमध्ये १००.७१ कोटी रुपये होते. त्यामुळे मंदिराच्या एकूण बँक ठेवी १,९११.८० कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. बाराव्या शतकातील हे मंदिर १९५५च्या श्री जगन्नाथ मंदिर कायद्यानुसार ओडिशा सरकारच्या कायदा विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.
चोरीच्या सात घटना
गेल्या २५ वर्षांत मंदिरातून रोख रक्कम, दागिने आणि मूर्तींच्या चोरीच्या किमान सात घटना नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फेब्रुवारी २०२४मध्ये देणगीच्या रकमेची मोजणी सुरू असताना एका मंदिर कर्मचाऱ्याने ३१ हजार ९४० रुपये चोरल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळले. त्याच्या एक वर्ष आधी मोजणीदरम्यान ८०० रुपये चोरल्याच्या आरोपावरून एका शिपायाला अटक करण्यात आली होती.
उत्पन्नाचे स्त्रोत व खर्च
-भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्या, मंदिराच्या मालकीच्या दगडखाणी व खाणींमधून मिळणारे उत्पन्न, मुदत ठेवींवरील व्याज, जमिनीची विक्री व खरेदी तसेच सरकारी अनुदान
- मंदिर निधीतून मंदिराचा दैनंदिन खर्च भागविला जातो
- उर्वरित रक्कम मुदत ठेवींमध्ये ठेवली जाते
- मंदिराच्या सर्व मालमत्तेची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची प्रमुख जबाबदारी
- मंदिरातील हुंडीतील देणग्यांची होते दररोज मोजणी
- पारदर्शकता राखण्यासाठी माहिती माहिती फलकांवर तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली जाते
- यंदाच्या १५ जुलैच्या रथयात्रेपूर्वी ‘समर्पण’ हे डिजिटल देणगी व्यासपीठ सुरू
- ‘समर्पण’मध्ये जगभरातील भाविकांना देणगी देता येते आणि त्याची पावतीही मिळते
- या माध्यमातून ३१ ऑगस्टपर्यंत ५६.७१ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या
- मंदिराच्या मालकीची देशभरातील ६० ८२१ एकर जमीनपैकी ६०,४२६ एकर जमीन ओडिशातील २४ जिल्ह्यांत आहे
- उर्वरित ३९५ एकर जमीन पश्चिम बंगालसह अन्य सहा राज्यांत आहे
- मंदिरातील सोने, हिरे आणि अन्य मौल्यवान वस्तू कडेकोट सुरक्षेत रत्न भांडारात
- मौल्यवान वस्तूंची यादी तब्बल ४८ वर्षांनंतर पुन्हा तयार करण्याचे काम सध्या सुरू
“उत्पन्नातील काही हिस्सा राखीव निधी आणि अन्य हिस्सा फाउंडेशन निधी म्हणून मुदत ठेवींमध्ये ठेवला जातो. उर्वरित रक्कम मंदिर निधीत ठेवली जाते.
अरविंद पाधी, मुख्य प्रशासक, ‘एसजेटीए’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.