खेळाच्या मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खच
पुसेगावमध्ये नागरिक हैराण; स्वच्छतेकडे दुर्लक्ष, धाक कोणाचा राहिना
ऋषिकेश पवार : सकाळ वृत्तसेवा
पुसेगाव, ता. २० : येथील दहिवडी मार्गावरील मैदान आणि टेकड्यांच्या परिसराला मद्यपींनी आपले मद्यप्राशन स्थळ बनविले आहे. या परिसरावर नजर टाकल्यास दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो, तर खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे, प्लॅस्टिकचे ग्लास, सिगारेटची खाली पाकिटे जागोजागी दिसून येतात. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असला तरी अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
पुसेगावात दहिवडी मार्गावर सातारा-लातूर महामार्गालगत विस्तीर्ण मैदान आहे. या मैदानाचा उपयोग खेळासाठी आणि विरंगुळा म्हणून केला जातो; परंतु रात्री या मैदानाचा वापर मद्यपानासाठी केला जात आहे. या ठिकाणी निवांत व कमी पैशात आपला शौक भागविता येत असल्याने रात्र होताच येथे समूहा-समूहाने मद्यपी बसलेले आढळून येतात. दारू पिऊन झिंगणारे त्याच ठिकाणी कचरा करून मोकळे होतात. त्यामुळे सकाळी या ठिकाणी घाण पसरलेली असते. मैदानावर सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक, खेळाचा सराव करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंना याचा दररोज त्रास सहन करावा लागतो.
खेळाच्या मैदानात आणि टेकड्यांच्या परिसरातील रस्त्यांवर काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकचा कचरा पडून असतो. फुटलेल्या बाटल्यांच्या काचा विखुरलेल्या असतात. त्यामुळे अनवधानाने अनेकांना जखमीसुद्धा व्हावे लागते. सोबत सिगारेटचे पाकिटेही असतात. ठिकठिकाणी सिगारेटचे तुकडे पडून दिसतात. कुणाची आडकाठी नसल्याने या परिसरात उशिरा रात्रीपर्यंत अनेकांची चांगलीच मैफल जमते.
हॉटेलमध्ये बसल्यास वेळेचे बंधन असते, तसेच त्या ठिकाणी गोंधळ, आरडाओरडा करता येत नाही. विशेष म्हणजे बारमधील दारू वाईन शॉपपेक्षा महाग असते. त्यामुळे खुल्यावरच पार्टी रंगविण्याकडे तरुणांचा कल वाढल्याचे नागरिक सांगत आहेत.
नागरिकांना त्रास
पुसेगावमधील खुल्या मैदानात मद्यपींची बैठक रंगलेली असते. झिंग चढल्यानंतर शिवीगाळ करणे, आरडाओरड करण्याचे प्रकारही सुरू असतात. विशेष म्हणजे ही सर्व ठिकाणे लोकवस्तीला लागून आहेत. अनेक वसाहती या भागात आहेत. लागूनच मुख्य रस्ता आहे. या मार्गाने मुले, महिला व नागरिकांची रहदारी सुरू असते. तरीही कोणाची भीती न बाळगता हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. कोणाच्या तक्रारी व ओरड नसल्याने दिवसेंदिवस या मद्यपींचे साहस वाढत चालले आहे. या प्रकारावर तातडीने पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.
फोटो
01363
पुसेगाव : मैदानाच्या कडेला पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकचा कचरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.