पुतीन यांच्या घरावरील हल्ल्याबाबत मोदींकडून चिंता व्यक्त
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३० ः- रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या निवासस्थानावरील ड्रोन हल्ल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच रशिया आणि युक्रेन यांनी शत्रुत्व समाप्त करण्यासाठी मुत्सद्देगिरीवर भर द्यावा, असे आवाहन केले.
युक्रेन आणि रशिया शांतता कराराच्या पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले आहेत, असा अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला असताना या ड्रोन हल्ल्याच्या वृत्तामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’द्वारे आपली चिंता व्यक्त केली. मोदींनी म्हटले, की रशियाच्या अध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या बातम्या अत्यंत चिंताजनक आहेत. सध्या सुरू असलेले मुत्सद्देगिरीचे प्रयत्न शत्रुत्व समाप्त करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वात व्यवहार्य मार्ग उपलब्ध करून देतात. सर्वांनी या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करावे आणि त्यांना कमकुवत करू शकणाऱ्या कोणत्याही कृतीपासून दूर राहावे, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले.
दरम्यान, रशियाकडून दावा करण्यात आला आहे, की युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या ९१ ड्रोननी मॉस्कोच्या उत्तरेला असलेल्या नोवगोरोड प्रदेशातील अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी दूरचित्रवाणी निवेदनात सांगितले की, या ड्रोन हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही, कारण हे ड्रोन पाडण्यात आले. मात्र, योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याचा हक्क रशिया राखून ठेवत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.