पुणे

हवामान बदलास सक्षम रब्बी ज्वारीचे सुधारित तंत्रज्ञान

CD

रविवार पेस्टिंग

हवामान बदल सक्षम रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान

डॉ. अंबिका मोरे, प्रीतम भुतडा, डॉ. अंबालिका चौधरी
------------------------
एल निनोच्या प्रभावामुळे विदर्भात सरासरीपेक्षा २३% तर मराठवाड्यात २२% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विशेषतः घाट परिसरामध्ये सरासरीपेक्षा १६% जास्त पाऊस झाला आहे. पावसातील ही तूट, जमिनीत कमी झालेला ओलावा आणि वाढते तापमान यांमुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता दिसत आहे. खरिपात चारा पिकांचे उत्पादन कमी झाल्याने राज्यात गंभीर चारा टंचाई निर्माण होऊ शकते. अशा स्थितीमध्ये कमी पावसातही तग धरणारे आणि चारा उपलब्ध करणारे पीक म्हणून ज्वारी महत्त्वाचे ठरणार आहे.
ज्वारी हे एक कोरडवाहू क्षेत्रातील महत्त्वाचे पीक आहे. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जाऊन उपलब्ध ओलावा शोषतात. प्रकाश संश्लेषणाची क्रिया अधिक प्रमाणात होते. त्यात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे. कमी पावसात धान्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सोडविण्याची क्षमता या पिकात आहे.

योग्य वाणांची निवड
जमिनीच्या मगदुराप्रमाणे, पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाणांची लागवड करणे महत्त्वाचे आहे.
- हलक्या जमिनीत आणि कोरडवाहूसाठी : सिलेक्शन-३, फुले माउली आणि फुले अनुराधा या लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. त्यामुळे फुलोऱ्यानंतर येणारे अवर्षण (दुष्काळ) आपोआपच टळेल. हे वाण १०५ ते ११० दिवसांत पक्व होतात. इतर वाणांपेक्षा हे वाण १० ते १५ दिवस लवकर येत असल्यामुळे दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यामुळे येणारी उत्पादनातील घट टाळता येते. पाण्याचा ताण सहनशील आणि खोडमाशी व खोडकिड्याला प्रतिकारक्षम आहेत. सिलेक्शन-३ आणि मालदांडी ३५-१ पासून आपल्याला एकरी ४ ते ६ क्विंटल धान्याचे तर ६ क्विंटल कडब्याचे उत्पन्न मिळते; तर फुले अनुराधा या वाणांपासून एकरी धान्याचे ६ ते ८ क्विंटल आणि कडब्याचे १४ क्विंटल उत्पादन मिळते.
- मध्यम ते भारी जमिनीत कोरडवाहूसाठी : परभणी मोती, परभणी सुपर मोती, परभणी सुपर दगडी, फुले यशोमती, फुले वसुधा, अकोला क्रांती, फुले सुचित्रा, मालदांडी ३५-१, सीएसएच २२ इ. वाणांचा वापर करावा.
- सिंचनाची उपलब्धता असल्यास : तीन ते चार पाण्याची उपलब्धता असल्यास परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा व सीएसएच २२ या वाणांचा वापर करावा.
------------------
मध्यम ते भारी जमीन व मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या कोरडवाहू लागवडीसाठी योग्य वाणांची वैशिष्ट्ये.
वाण --- पक्व होण्याचा कालावधी (दिवस) --- एकरी धान्य उत्पादन (क्विंटल) --- एकरी कडब्याचे उत्पादन (क्विंटल) --- वैशिष्ट्ये
परभणी मोती --- १२० --- १८-२० --- ६५-७० --- मोत्यासारखे टपोरे व चमकदार दाणे. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम. खोडमाशी व खोडकिड्याला प्रतिकारक्षम. कोरडवाहूसाठी शिफारस. चमकदार दाण्यांमुळे इतर वाणांपेक्षा अधिक बाजारभाव.
परभणी सुपर मोती (एसपीव्ही २४०७) --- ११८ - १२० --- ३२-३५ --- ११०-११५ --- अधिक उत्पादन देणारा व मोत्यासारखे टपोरे व चमकदार दाणे. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम. हा वाण खोडमाशी, खोडकीड व खडखड्या रोगास मध्यम सहनशील आढळून आला आहे.
परभणी सुपर दगडी (एसपीव्ही २७३५) --- ११५-११८ --- २२-२५ (कोरडवाहू) --- ७०-७५ ---
कोरडवाहू लागवडीसाठी उपयुक्त, दगडी या स्थानिक वाणापासून निर्माण केलेला, अधिक उत्पादन देणारा, दाणे व कडब्याची उत्तम प्रत असणारा वाण.
परभणी वसंत (पीव्हीआरएसजी १०१) --- ९०-१०० दिवसांत हुरडा अवस्थेत येतो --- प्रति हेक्टरी हुरडा --- ३२-३५ --- १२५ - १३० --- वनामकृवि, परभणी विद्यापीठातून हुरडा लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला. दुधाळ अवस्थेत या वाणाचे दाणे अतिशय मऊ, गोड व रुचकर असून कणसापासून दाणे सहज वेगळे करता येतात. हा वाण खोडमाशी, खोडकीड व खडखड्या रोगास मध्यम सहनशील आढळून आला आहे.
फुले यशोदा --- १२२-१२५ --- १०-१२ --- २८-३० --- धान्य व कडब्याचे भरपूर उत्पादन देणारा वाण. भाकरी व कडब्याची प्रत उत्तम. खोडमाशीस व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
सीएसएच २२ --- १२०-१२२ --- २४-२८ --- ६५-७० --- कोरडवाहू तसेच बागायतीसाठी शिफारस. कडब्याची प्रत चांगली. खोडमाशीस व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
फुले वसुधा --- १२०-१२२ --- १७-१९ --- ६५-७० --- कोरडवाहू व बागायतीसाठी उत्तम वाण. खतास चांगला प्रतिसाद. कडब्याची प्रत मालदांडी सारखी सरस. खोडमाशीस व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम.
अकोला क्रांती --- ११५-१२० --- १९-२० --- ६५-७० --- कोरडवाहू आणि ओलितासाठी वाण. टपोरा चमकदार दाणा. भाकरीची प्रत उत्तम. कडब्याची प्रत उत्तम.

बागायती लागवडीसाठी योग्य वाण
वाण --- पक्व होण्याचा कालावधी (दिवस) --- एकरी धान्य उत्पादन (क्विंटल) --- एकरी कडब्याचे उत्पादन (क्विंटल) --- वैशिष्ट्ये
परभणी ज्योती --- १२२-१२५ --- ३८-४० --- ८८-९० --- बागायती लागवडीसाठी शिफारस. मावा किडीस प्रतिकारक्षम. उंच वाढणारे पण जमिनीवर लोळण्यास प्रतिकारक्षम. भाकरी व कडब्याची प्रत उत्तम.
फुले रेवती --- ११८-१२० --- ४०-४५ --- ९०-१०० --- ओलितासाठी वाण, टपोरा दाणा. भाकरीची प्रत उत्तम, कडब्याची प्रत उत्तम.
----------------------------
जमीन
कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य निचरा होणारी, ६.५ ते ७.५ सामू (pH) असलेली जमीन निवडावी. हलक्या जमिनीत (३० सेमी पेक्षा कमी खोल) नेमके वाढीच्या अवस्थेत ओलावा कमी होऊन पिकांची योग्य वाढ होत नाही, पर्यायाने उत्पादन घटते.

पूर्व मशागत
१) ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मूग, उडीद सारखे द्विदल पीक घेतले आहे, त्यांनी उभ्या पिकात पाच ते सहा ओळींनंतर पिकाच्या दोन ओळींमध्ये कोळप्याच्या साहाय्याने हलक्या सऱ्या करून ठेवाव्यात. त्यामुळे पडलेले पावसाचे पाणी मुरण्यास मदत होईल. पीक काढल्यानंतर वखराच्या साहाय्याने उतारास आडवी मशागत करावी. म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी ओलाव्याच्या रूपात जमिनीत साठवले जाईल. ही पीक पद्धती अवलंबली असता २०-३० किलो नत्राची बचत होते. जमिनीचा पोत सुधारतो.

२) सोयाबीन - कोरडवाहू रब्बी ज्वारी दुबार पीक पद्धत घेतल्यास :
सोयाबीन पिकानंतर रब्बी ज्वारी लागवड करावयाची झाल्यास आताच सोयाबीनचे शेत कोळप्याच्या साहाय्याने किंवा खुरपणी करून तणाविरहित करावे. कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन पीक काढल्यानंतर जमिनीची मशागत करून ज्वारीची पेरणी केल्यास ओलाव्याच्या अभावामुळे ज्वारीची उगवण कमी होते.
त्यामुळे सोयाबीन काढल्यानंतर कसलीही जमिनीची मशागत न करता (झिरो टिलेज) रब्बी ज्वारीची पेरणी केली, तर ज्वारीची उगवण व उत्पादकता वाढण्यास मदत होते.

पेरणीची वेळ
पश्चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड करत नसल्यामुळे गोकुळाष्टमीनंतर लगेचच रब्बी ज्वारीची पेरणी केली जाते. याउलट मराठवाड्यात दोन्ही हंगामात ज्वारीचे पीक घेत असल्यामुळे रब्बी ज्वारीसाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा पेरणीसाठी योग्य आहे. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो.

बीजप्रक्रिया
कीड नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केल्याने एक ते दीड महिन्यापर्यंत पीक कीडमुक्त राहते. बीजप्रक्रियेमुळे पिकाची उगवणशक्ती सुद्धा ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे आढळून आले आहे.
- काणी रोग प्रतिबंधासाठी : गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्याला लावावे.
- खोडमाशीचे व्यवस्थापन : थायामेथोक्झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रति किलो किंवा इमिडाक्लोप्रिड (४८ टक्के एफ.एस.) १४ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया केल्यास खोडमाशीमुळे होणारी पोंगेमर कमी होऊन आर्थिकदृष्ट्या अधिक फायदा होतो.
जैविक प्रक्रिया : ॲझोटोबॅक्टर व पीएसबी (PSB) या जिवाणू संवर्धकांची प्रत्येकी २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.

पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण आणि अंतर
कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी एकरी ४ किलो तर ओलितासाठी (बागायती) ५ किलो बियाण्याची शिफारस करण्यात आली आहे.
कोरडवाहू लागवडीसाठी : दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १५ सेंमी ठेवून हेक्टरी झाडांची संख्या १.३५ लाख राखावी.
ओलितासाठी (बागायती): दोन रोपांतील अंतर १२ सेमी (ओळींतील अंतर ४५ सेमी) ठेवून हेक्टरी झाडांची संख्या १.८० लाख ठेवावी.
यामुळे जमिनीतील ओलाव्याचा कार्यक्षम वापर होतो. बहुतांश शेतकरी ३० सेंमी (एक फूट) अंतरावर पेरणी करतात किंवा आडवी-उभी पेरणी करून ताटांची संख्या जास्त ठेवतात. त्यामुळे आंतर-मशागत करता येत नाही. तणांची वाढ होऊन पिकासोबत ओलाव्यासाठी स्पर्धा होऊन उत्पादनात घट येते.

खताची मात्रा
- कोरडवाहूसाठी : हेक्टरी ४० किलो नत्र + २० किलो स्फुरद ही मात्रा १०० किलो २०:२०:० मिश्रखत व ४० किलो युरियाच्या माध्यमातून द्यावी.
- ओलितासाठी (बागायती) : शिफारस केलेली हेक्टरी ८० किलो नत्र + ४० किलो स्फुरद + ४० किलो पालाश ही मात्रा, अर्थात अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश १५० किलो १०:२६:२६ मिश्रखत व ५० किलो युरियाच्या माध्यमातून पेरणीच्या वेळी द्यावी. उर्वरित ५०% नत्र (८५ किलो युरिया) पेरणीनंतर ३० दिवसांनी १२ सेमी खोल पेरून द्यावे.

आंतरमशागत व जल संधारण तंत्र (ओलावा टिकवणे)
- सऱ्या पाडणे : पेरणीनंतर जलसंधारणासाठी दर ३ ते ४ ओळींनंतर किंवा १० ते १२ मीटरवर ‘डेड फरो’ (सऱ्या) पाडाव्यात, ज्यामुळे पाऊस पडल्यास पाणी जमिनीत मुरेल.
- आच्छादन : पेरणीनंतर सुमारे ३० ते ३५ दिवसांनी पिकाच्या ओळींमध्ये सोयाबीन, तूर, मूग, उडीद सारख्या पिकाचा भुसा, धसकटे, वाळलेले गवत, गव्हाचे काड इ. चा हेक्टरी ५ ते १० टन या प्रमाणात प्रत्येक ओळीमध्ये आच्छादनाचा वापर करावा.
- कोळपणी : पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांच्या आत दोन ते तीन वेळेस कोळपण्या कराव्यात
पहिली कोळपणी – पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी
दुसरी कोळपणी – पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी
तिसरी कोळपणी – पेरणीनंतर ४० ते ५० दिवसांनी
यामुळे तणाचा बंदोबस्त होतो व जमिनीतील भेगा बुजतात आणि बाष्पीभवन थांबते. उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

आणीबाणीच्या काळात पानांवर फवारणी
ज्वारी पिकाची वाढ होत असताना पाण्याचा तीव्र ताण पडल्यास पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) २ टक्के म्हणजेच १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.

पाण्याचे व्यवस्थापन
रब्बी ज्वारीचे पीक कोरडवाहू पद्धतीने घेतले जाते. परंतु सिंचनाची सोय असल्यास पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जर कमी पाळ्या उपलब्ध असतील तर पोटऱ्याच्या अवस्थेत किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत अथवा या दोन्ही अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाळ्या द्याव्यात. सारा पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याचा योग्य विनियोग होतो.
ज्वारीच्या पिकाला खालील अवस्थेत पाणी देणे आवश्यक आहे.
जोरदार वाढीचा काळ: (पेरणीनंतर २५ ते ३० दिवस)
पोटरीत येण्याचा काळ: (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवस)
फुलोऱ्यात येण्याचा काळ: (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवस)
कणसात दाणे भरण्याचा काळ: (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस)

कापणी व मळणी
ज्वारीच्या पिकाची शारीरिक पक्व अवस्थेत (पूर्ण पक्वतेच्या ८-१० दिवस अगोदर) कणसाचा दांडा पिवळा झाला असता कापणी करावी. अशा वेळेस दाण्यांमध्ये सर्वसाधारणपणे २५-३० टक्के ओलाव्याचे प्रमाण असावे. तसेच साठवणुकीत धान्य चांगले राहण्यासाठी धान्यात ओलाव्याचे प्रमाण ९-१० टक्के असावे. मळणीनंतर धान्य उन्हात चांगले वाळवून मगच साठवण करावी. अशा सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे अवलंब केल्यास ज्वारीच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३५ टक्के वाढ मिळू शकते.

डॉ. अंबिका मोरे, ९७६४०२२५३३
ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
----------------
PNE25V71907 : ज्वारी हे पीक धान्य व कडबा दोन्हीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी आणले गट्टा मतदान; मुश्रीफांचेही शक्तिप्रदर्शन, तालुकानिहाय मतदान जाणून घ्या

पोलिसांनी भारत सोडायला सांगितल्यावर इम्रान खान म्हणतो, 'हा टोकाचा निर्णय'; ते काही बंदी घातलेलं क्षेत्र नव्हतं...

Navratri Day Eight: महाअष्टमीला कशी करावी देवी महागौरीची पूजा? जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

VAIBHAV SOORYAVANSHI: वैभव सूर्यवंशीला संघात घेऊनही खेळवलं नाही! चाहत्यांच्या नाराजीवर श्रेयस अय्यरने दिलं उत्तर; नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT