पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत
पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन
अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस नसल्याने पेरणीबाबत चिंता
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीची पेरणी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. साधारण ५ लाख ५४ हजार ०८५ हेक्टरवर पेरणी होईल, असे गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने बियाणे आणि खताचे नियोजन केले आहे. मात्र, यंदा अजूनही बहुतांश भागात पाऊस नाही. खरीप तर गेलाच, पण रब्बीतही पेरण्या होतील की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे सरासरी ४ लाख १५ हजार २४७ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात रब्बीत ४ लाख ३९ हजार २३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदाच्या रब्बीच्या पेरणीबाबत कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. तीन वर्षांची सरासरी धरून यंदा रब्बीत ५ लाख ५४ हजार ०८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरून बियाण्यांची मागणी केली आहे. यंदा खासगीचे ७९ हजार ५०९ क्विंटल, तर सार्वजनिकचे १८ हजार ३३३ क्विंटल असे एकूण ९७ हजार ८४२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. ज्वारी, हरभरा, गव्हाचे क्षेत्र जेमतेम आहे. मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा अधिक मक्याची पेरणी होईल, असे गृहीत धरून बियाण्यांची मागणी केली आहे.
या वर्षी जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा वेगळी स्थिती आहे. अकोले तालुक्यातील घाटमाथा वगळता जिल्ह्याच्या कोणत्याही भागात पाणी साठेल असा पाऊस झाला नाही. दुष्काळी पट्टा असलेल्या काही भागात तर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. जेथे पेरण्या झाल्या, तेथेही पावसाच्या खंडाने खरिपातील बहुतांश पिके करपली आहेत. खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस नाही. परतीचा पाऊस पडेल की नाही, याबाबत चिंता आहे. त्यामुळे रब्बीतील पेरण्या होतील की नाही, याची खात्री दिसत नाही. साधारणपणे गोकुळ अष्टमीला ज्वारीच्या पेरणीला सुरुवात होत असते. यंदा मात्र रब्बीच्या पेरण्या सुरू होण्यासारखी कोणत्याच भागात स्थिती नाही. त्यामुळे कृषी विभागाने रब्बीचे नियोजन केले असले, तरी पेरण्या होतील की नाही, याबाबत मात्र साशंकताच आहे.
रब्बीतील प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)
ज्वारी ः १२०,००० (१६२९०९)
गहू ः १,६०,००० (१२८४६२)
हरभरा ः १,०७,००० (९२९७५)
सूर्यफूल ः ४५ (८३)
करडई ः ४० (१९७)
मका ः १,६७,००० (३०,६२१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.