सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ ः तृणमूल काँग्रेसच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांना स्वतःच्या पक्षाचीही पुरेशी माहिती नसल्याचे दिसते,’ असा टोला भाजप प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी आज लगावला.
भाजप मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग मिळून विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता तृणमूल काँग्रेसला लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिवाद करताना त्रिवेदी म्हणाले, की राहुल गांधी यांना देशाबद्दल काही माहिती नाही, अशी लोकांची धारणा आहे. मात्र, आज त्यांनी केलेल्या पोस्टवरून त्यांना स्वतःच्या पक्षाचीही माहिती नसल्याचे दिसून येते. तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची स्थापना काँग्रेसपासून वेगळे होऊन झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
‘काँग्रेस नेते म्हणवून घेण्यास पात्र नाही’
‘‘सत्तेत असताना काँग्रेसने पक्षाने विरोधी पक्षांना कसे संपविले आणि त्यांची सरकारे कशी पाडली, हे पाहण्यासाठी राहुल गांधी यांनी त्यांच्याच पक्षाचा इतिहास पाहावा. जर राहुल गांधींना त्यांच्याच पक्षाचा इतिहास माहीत नसेल, तर ते पक्षाचे नेते राहण्यास पात्र नाहीत, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राहणे तर दूरच,’’ अशी टीकाही त्रिवेदी यांनी केली.