सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ : ‘‘भारतीय निवडणूक आयोग मतदारांची दिशाभूल करत असून मतांची चोरी हे एक राष्ट्रविरोधी कृत्य आहे,’’ असा आरोप आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रात झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाच्या वेळी मतदारांच्या बोटांना लावलेली शाई सहजपणे मिटत असल्याच्या प्रकारावर राहुल गांधी यांनी ही टिपणी केली. ‘‘बोटावर लावलेली शाई मिटण्यासारख्या प्रकारामुळेच लोकांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होत आहे. निवडणूक आयोगाकडून जनतेची दिशाभूल होणे, हा लोकशाहीवरील विश्वास कमी होण्यास कारणीभूत ठरला आहे,’’ असे राहुल यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. राहुल यांनी बोटांना लावलेली शाई मिटत असल्याचे दावे आणि त्या संबंधातील व्हायरल झालेले व्हिडिओंबाबत बातम्यांच्या स्क्रीनशॉटसह हा आरोप केला.
‘खानदानी चोर’ म्हणत भाजपची टीका
नवी दिल्ली : ‘खानदानी चोर आता ठाकरे कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यांची पुनरावृत्ती करीत आहे,’ अशा शब्दांत आज भाजपने राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बोटांना लावलेली शाई मिटली जात असल्याच्या प्रकारावरुन निवडणूक आयोग जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ‘एक्स’वर प्रत्युत्तर दिले आहे. ‘‘बहाणा ब्रिगेड परत आली आहे. मतमोजणी पूर्ण होण्याआधीच पराभव मान्य केला आहे. राहुल गांधी पुन्हा तेच करीत आहे : बदनाम करणे, विपर्यास करणे आणि चुकीची माहिती पसरविणे. खानदानी चोर आता ठाकरे कुटुंबीयांच्या दाव्यांची पुनरावृत्ती करीत आहे. बिहारमध्ये मतांच्या चोरीवरून राहुल गांधींनी जे आरोप लावले त्यातून काय निष्पन्न झाले?’’, असे पूनावाला यांनी सुनावले.
‘ते ११० लोकशाहीवादी देश कोणते?’
निवडणुकीच्या मार्गाने सत्तेत येण्याची आशा मावळल्याने राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करण्यासाठी परदेश दौरे करतात, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘‘राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत काँग्रेसचा खरा चेहरा नकळत उघड केला. कथितपणे लोकशाही असलेल्या ११० देशांची आघाडी असलेल्या ग्लोबल प्रोगेसिव्ह अलायन्समध्ये काँग्रेस सामील असून त्यात भाग घेण्यासाठी राहुल गांधी जर्मनीला गेले होते, असे पित्रोदा यांनी सांगितले. या आघाडीने भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. या दौऱ्यात जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फौंडेशनकडून आर्थिक मदत घेणाऱ्या सेंट्रल युरोपियन विद्यापीठाच्या अध्यक्ष कॉर्नेलिया वुल यांची राहुल गांधींनी भेट घेतली. राहुल गांधी ग्लोबल प्रोगेसिव्ह अलायन्सच्या अध्यक्षीय मंडळात असून आपण सदस्य असल्याचे पित्रोदा यांनी सांगितले. जगातील १९० देशांपैकी ५७ मुस्लिम देशांमध्ये लोकशाही नाही किंवा खूपच क्षीण आहे. ३० -४० देशांमध्ये राजेशाही आहे. अनेक देशांमध्ये हुकूमशाही आहे. त्यामुळे जगात लोकशाही असलेले ११० देश कोणते आहेत हे आधी काँग्रेसने सांगावे,’’ असा सवाल त्रिवेदी यांनी केला. लोकशाहीच्या बुरख्याआड वास्तविक लोकशाहीवर आघात करणारा हा कोणत्या देशांचा समूह आहे, असेही त्रिवेदी यांनी विचारले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.