-------------------------------फोटो--------63774----------------------
लीड---------------
निवडणुका जिंकायच्या असतील तर जनतेमध्ये सातत्याने जावे लागते. प्रश्न समजावून घ्यावे लागतात. राहुल गांधींकडे काँग्रेसचे नेतेपद वारशाने चालत आले आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षसंघटनेत एक दिवसही काम केलेले नाही. मतदारांचा विश्वास संपादन करण्याऐवजी मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या राहुल गांधींना मतदारांनी केव्हाच ओळखले आहे.
---------------------------------------------------------
अपयश झाकण्यासाठीच ‘एसआयआर’ला विरोध !
- चंद्रशेखर बावनकुळे
देशाचे राजकीय चित्र २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर पूर्णपणे बदलले. भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळालेला विजय एवढ्या एकाच बाजूतून २०१४नंतरच्या बदललेल्या राजकीय चित्राकडे पाहणे योग्य ठरणार नाही. गेल्या १२ वर्षांत मतदारांनी निवडणुकीत कोणाला मत द्यायचे याचे निकष बदलून टाकल्याचे दिसते. मतदारांना आपल्यासाठी काम करणारे सरकार हवे आहे. एकाच घराण्याची पुण्याई सांगत त्या जोरावर मत मागणाऱ्यांना मतदार थारा देत नाहीत. जाती-पातीचे निकषही मतदारांना महत्त्वाचे वाटत नाहीत, ही गेल्या १२ वर्षांतील मतदारांच्या बदललेल्या मानसिकतेची वैशिष्ट्ये आहेत. मतदारांची ही मानसिकता राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी लक्षात घेऊ न शकल्याने हताश झाले आहेत. मतदारांची मानसिकता अशीच राहिली तर आपल्याला काहीच भवितव्य उरणार नाही, हे दिसू लागल्याने राहुल गांधीसारखा खुशालचेंडू नेता आपल्या पराभवासाठी वेगवेगळी कारणे शोधू लागला आहे.
निवडणुका जिंकायच्या असतील तर जनतेमध्ये सातत्याने जावे लागते. जनतेचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. राहुल गांधींकडे काँग्रेसचे नेतेपद वारशाने चालत आले आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत एक दिवसही काम केलेले नाही. निवडणुकीत मतदार सहजासहजी कोणाला पसंती देत नसतात. मतदार चाणाक्ष आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना पूर्णपणे पारखून घेत कोणाला मतदान करावयाचे याचा निर्णय मतदार घेतात.
२००२पासून मतदार याद्यांचे संपूर्ण नवीनीकरण न झाल्यामुळे मतदारयादीत मोठ्या प्रमाणात मयत, दुबार आणि तिबार नावे समाविष्ट झाली आहेत. उदाहरणार्थ, एकट्या नागपुरात दोन ते अडीच लाख मयत किंवा दुबार नावे आढळली आहेत. यामुळेच अचूक मतदारयादी तयार करण्यासाठी आणि बोगस मतदान रोखण्यासाठी ‘एसआयआर’ प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी काँग्रेसच्या सत्तेच्या काळातही दर १०, १५ किंवा २० वर्षांनी ‘एसआयआर’ प्रक्रिया राबवली गेली आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, याचा उद्देश मतदारयादी अचूक करणे हाच असतो.
खोटी माहिती पसरविली
कॉँग्रेस आणि ‘इंडिया आघाडी’ला बोगस मतदान करून निवडून येण्याची जुनी सवय आहे. ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे ही बोगस मतदानाची सवय बंद होणार असल्यानेच विरोधकांकडून या प्रक्रियेबद्दल संभ्रम व अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारयाद्या दुरुस्त करताना एकाच व्यक्तीची नावे वेगवेगळ्या वॉर्डात किंवा मतदारसंघांत असणे टाळले पाहिजे, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकाला अचूकपणे एकदाच मतदान करता येईल. १९७७ मध्ये आणीबाणीतील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस आणि इंदिरा गांधींचाही पराभव केला. मात्र, इंदिरा गांधींना पर्याय म्हणून निवडलेल्या जनता पक्षाकडून स्थिर सरकारची अपेक्षा पूर्ण न झाल्याने अवघ्या अडीच वर्षांत मतदारांनी पुन्हा इंदिरा गांधी यांना सत्तेवर बसवले.
राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला १९८४मध्ये ५४२ पैकी ४१४ जागी विजयी करून मतदारांनी कौल दिला. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनाही असा विजय मिळवता आला नव्हता. असे प्रचंड बहुमत देऊनही राजीव गांधींकडून निराशा झाल्याने मतदारांनी १९८९च्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेतून खाली खेचले. १९८४च्या निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, हेमवतीनंदन बहुगुणा, जॉर्ज फर्नांडिस यासारखे रथी महारथी पराभूत झाले होते. मात्र, विरोधकांनी त्यावेळी बोगस मतदानामुळे पराभूत झालो, यासारखी कारणे कधी दिली नाहीत. भाजपला १९८४च्या निवडणुकीत अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. अपयश पदरी येऊनही भाजप नेतृत्वाने पराभवाचे खापर सत्ताधारी पक्षावर, सरकारी यंत्रणेवर फोडले नाही. भाजप नेतृत्वाने देशभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या पराभवाची कारणे जाणून घेतली. त्यानुसार पक्षाच्या ध्येयधोरणात बदलही केला.
आत्मपरीक्षणाचा अभाव
काँग्रेस नेतृत्वाने आणि राहुल गांधींनी गेल्या १२ वर्षांत आपल्या पक्षाची कामगिरी का खराब होत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला नाही. पक्षातील अनुभवी, जाणत्या नेत्यांची फळी बाजूला सारत राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे स्वतःकडे केंद्रित केली आहे. पक्ष संघटनेची बांधणी करण्याऐवजी ‘ईव्हीएम’, मतदार याद्यातील दुरुस्ती यासारख्या कारणांचे निमित्त करत राहुल गांधी आपल्या अपयशी नेतृत्वावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी खोटीनाटी माहिती बिनधास्त सांगितली जात आहे. मतदार यादी दुरुस्ती अभियानात १३ कोटी मतदारांची नावे काढून टाकली, अशी खोटी माहिती राहुल गांधींसह अभ्यास नसलेले अनेक नेते पसरवीत आहेत.
मतदारयादी दुरुस्ती अभियानात तीन कोटी मृत मतदारांची नावे वगळली गेल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्याचबरोबर यादीमध्ये दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असलेल्या सुमारे दोन कोटी मतदारांची नावे वगळली गेली आहेत. अशाच दुबार मतदारांच्या संख्येवरून याच राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगावर टीका केली होती. मतदारयादी दुरुस्ती अभियान म्हणजे जगावेगळे अभियान नसून यादीतील चुका दुरुस्त करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या मतदारांना आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध करता येणार नाही, त्या घुसखोर मतदारांची नावे मतदारयादीतून काढून टाकली जाणार आहेत. मतदारयादीत नाव असलेले घुसखोर भारतीय नागरिकांच्या रोजगाराच्या आणि अन्य संधी हिरावून घेतात. हे घुसखोर देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्यांना देशाबाहेर हुसकावणे हे सरकारचे कर्तव्य असले पाहिजे. या घुसखोरांची कोट्यवधींच्या संख्येत असलेली नावे मतदार यादीतून काढून टाकली गेली तर आपल्याला मतदान कोण करणार, अशी भीती राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्यांना वाटते आहे.
यंत्रणाच शिल्लक नाही
आसाममध्ये १९८३-१९८४च्या सुमारास बांगलादेशी घुसखोरांविरोधात प्रचंड आंदोलन झाले होते. त्यावेळी आंदोलकांनी बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी केली होती. १९८५मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाममधील आंदोलकांशी शांतता करार करून बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याची मागणी मान्य केली होती. दुर्दैवाने याच राजीव गांधींचे सुपुत्र घुसखोरांची नावे मतदारयादीत राहावीत यासाठी मतदारयादी दुरुस्ती अभियानाला विरोध करत आहेत.
मतदारयादीतून खऱ्याखुऱ्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळली गेली असती तर तशा तक्रारी निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात आल्या असत्या. अपुऱ्या कागदपत्रांमुळे कोणाचे नाव वगळले गेले असेल तर अशा मतदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क साधून त्यांच्या नोंदणीसाठी, नवमतदार नोंदणीसाठी पक्ष कार्यकर्त्यांनी चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक असते. निवडणूक आयोग अधिकारी सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावून मतदार यादी दुरुस्ती अभियानात सहभागी करून घेतात. काँग्रेस पक्षाकडे अशा पद्धतीने चिकाटीने काम करणारी कार्यकर्त्यांची यंत्रणाच शिल्लक राहिली नसल्याने हा पक्ष मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाही. याच मतदारयाद्यांच्या आधारावर झालेल्या निवडणुकीत राहुल गांधी दोन मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयी झाले. केरळमध्ये डाव्या आघाडीला पराभूत करत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवले. महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. झारखंडमध्ये काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने बहुमत मिळवले. मात्र, राहुल गांधींना केरळ, झारखंडचा विजय लोकशाहीचा विजय वाटला. मतदारयादी दुरुस्ती अभियान, त्यापूर्वी ‘ईव्हीएम’ अशी पराभवाची कारणे शोधणारे राहुल गांधी संपूर्ण सरकारी यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करत आहेत. मतदारांचा विश्वास संपादन करण्याऐवजी मोदी सरकारविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या राहुल गांधींना मतदारांनी केव्हाच ओळखले आहे. त्यामुळेच मतदार यादी दुरुस्ती अभियान (एसआयआर) विरोधी अभियानावर सामान्य माणूस विश्वास ठेवण्यास तयार नाही.
...................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.