सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १५ ः राहुल गांधी आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’चे दुसरे -तिसरे काही नसून सत्तापरिवर्तन हेच लक्ष्य असल्याची टीका भाजपने केली आहे. विद्यार्थी संघटनेशी संबंधित नेहा बोरा हिने बांगलादेशचा संदर्भ देत जे विधान केले आहे, त्यातून हीच बाब सिद्ध झाली असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
बांगलादेशाच्या आंदोलनाने जगातील युवकांना आंदोलनाचा मार्ग दाखवला. त्या देशाप्रमाणे भारतातील युवावर्ग लोकशाही आणि मतांच्या अधिकारासाठी लढत असल्याचे वादग्रस्त विधान ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या (एआयएसए) अध्यक्षा नेहा बोरा यांनी केले होते. राहुल गांधी यांची ‘पोस्टर गर्ल’ असलेल्या बोरा हिने देशातील लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा कट रचला असल्याचा आरोप भंडारी यांनी केला. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण ‘इकोसिस्टिम’चा विरोध हा राजकीय स्वरूपाचा नाही, तर त्यांना सत्ताबदल हवा आहे. बांगलादेशात झालेल्या सत्ताबदलातून आम्ही प्रेरित आहोत आणि भारतातही तसेच झाले पाहिजे, असे म्हणताना बोरा दिसून येते. यातून त्यांना सत्ताबदल हवा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गांधी आणि त्यांचे साथीदार लोकशाहीसाठी धोका बनले आहेत.
‘कोणाची नक्कल करण्याची गरज नाही’
बोरा हिच्या मुलाखतीची माहिती नसल्याचे माकपचे खासदार पी. संतोष कुमार यांनी स्पष्ट केले आहे. ‘‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटविण्यासाठी तसेच या देशासाठी आम्ही लढत आहोत. आमच्या विद्यार्थी संघटना सदैव सरकारच्या विरोधात लढतात. बांगलादेश, नेपाळ किंवा अन्य कोणा देशाची नक्कल करण्याची आम्हाला गरज नाही,’’ असे कुमार यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.