राहुल हे देशविरोधींच्या हातातले बाहुले
केंद्रीय मंत्री गोयल; गांधी कुटुंबीयांवरही टीका
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २५ ः ‘‘काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे नेते राहुल गांधी हे देशविरोधी शक्तींच्या हातातले बाहुले बनले असून, गांधी कुटुंबाने देशहिताच्या मुद्द्यावर कायम समझोता केला आहे,’’ असा आरोप केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
‘‘राहुल हे नकारात्मक राजकारणाचे पोस्टर बॉय बनले आहेत. २४७ वेळा विदेश दौऱ्यावर गेलेले गांधी हे शिष्टाचाराकडे दुर्लक्ष करत देशहिताच्या मुद्द्यावर तडजोड करत असतात. ते किती गलिच्छ प्रकारचे राजकारण करतात हे देशाला माहीत आहे,’’ असा दावाही गोयल यांनी केला.
काँग्रेसचा इतिहास असो वा वर्तमान किंवा भ्रष्टाचाराशी संबंधित विविध प्रकरणे असोत, यातून विदेशी शक्तींच्या प्रभावाखाली जनहित आणि राष्ट्रहिताशी तडजोड करण्याचे काँग्रेसचे धोरण दिसून आले आहे, असा आरोपही गोयल यांनी केला. ‘‘राहुल गांधी हे कधी जॉर्ज सोरोस तर कधी पाकिस्तानच्या मुद्द्यावर आपल्याच देशाच्या विरोधात मत प्रदर्शन करताना दिसून आले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. लडाखसारख्या संवेदनशील भागामध्ये गांधी यांनी अशा लोकांशी संपर्क साधला की जे देशाच्या हिताच्या विरोधात काम करीत होते. बोफोर्स प्रकरणातील आरोपी ओतावियो क्वात्रोची याला वाचवण्यासाठी निष्पक्ष चौकशी करू देण्यात आली नाही आणि त्यावेळी गांधी कुटुंबाने देशहिताशी समझोता केला,’’ असे आरोप गोयल यांनी केले.
‘कुटुंबीयांवर गंभीर आरोप’
‘‘केवळ राहुल गांधीच नव्हे तर सोनिया आणि राजीव गांधी तसेच जवाहरलाल नेहरू यांच्याविरोधातही गंभीर आरोप झाले आहेत. भारत-पाकिस्तानच्या युद्धानंतर पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांना बंदी करण्यात आले होते, मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने या कैद्यांना सोडून दिले. त्यावेळी पाकव्यााप्त काश्मीर का परत घेतला गेला नाही?’’ असा सवाल गोयल यांनी केला.
तसेच मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधानांचा अपमान करणे, राष्ट्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून सरकार चालवणे आणि देशावर डावी विचारसरणी लादण्याचे काम गांधी कुटुंबाने केले, असे ते म्हणाले.
चौकट
अडचणीत आणणारे प्रश्न नको असतात
‘‘राहुल गांधी यांना अडचणीत आणणारे कोणताही प्रश्न पत्रकार विचारू शकत नाही. तसा एखादा प्रश्न विचारला गेला तर राहुल संबंधित पत्रकाराला भाजपशी जोडला गेलेला पत्रकार म्हणून घोषित करतात. लेखी देण्यात आलेल्या प्रश्नाशिवाय अन्य प्रश्नावर गांधी उत्तर देत नाहीत,’’ असा आरोप गोयल यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.