कोथरूड, ता. १७ : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पुण्यात होणाऱ्या ‘छात्रोंकी गुंज’ कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत आणि कार्यक्रमाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, अरविंद शिंदे यांच्यासह कोथरूडमधील विद्यार्थी प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.